Pimpri Chinchwad News: वाकलेली इमारत पाडली; बिल्डरवर दाखल होणार गुन्हा

पिंपरी चिंचवड: तीन मजली बांधकाम सुरू असताना वाकड (Wakad) भागातील झुकलेली इमारत बुधवारी पाडण्यात आली. याबाबत महापालिकेकडून बिल्डरला नोटीस बजावण्यात येणार असून, गुन्हा देखील दाखल केला जाणार आहे.

Wakad Building Destroyed

संग्रहित छायाचित्र

परवानगीपेक्षा अधिकचे बांधकाम, चार ऐवजी दोन पिलरवर उभारण्यात आली होती इमारत, बांधकाम विभागाचे अधिकारी मोकाटच

पिंपरी चिंचवड: तीन मजली बांधकाम सुरू असताना वाकड (Wakad) भागातील झुकलेली इमारत बुधवारी पाडण्यात आली. याबाबत महापालिकेकडून बिल्डरला नोटीस बजावण्यात येणार असून, गुन्हा देखील दाखल केला जाणार आहे. मात्र, या बांधकामाला महापालिकेने परवानगी दिली असल्याचे आणि परवानगीपेक्षा अधिकचे बांधकाम केल्याचेही आता उघड झाले आहे. (Building Destroyed in Wakad)

वाकड पोलीस ठाणे ते थेरगाव या रस्त्याला जोडणाऱ्या ठिकाणी बांधकाम व्यावसायिक सुनील दोलवानी यांच्या तीन मजली इमारतीचे बांधकाम सुरू आहे. इमारतीचे जवळपास सर्व काम पूर्ण होत आले आहे. काही लोक येथे राहायला देखील येणार होते. मात्र, मंगळवारी रात्री साडे दहाच्या सुमारास या इमारतीच्या बांधकाम एका बाजूला झुकले. त्यामुळे इमारत वाकली गेली. या भागात मोठ्या प्रमाणात लोकवस्ती असल्याने परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले. (Pimpri Chinchwad News)

या इमारतीच्या शेजारी राहणारे राहुल सरोदे यांनी ही बाब लक्षात येताच महापालिकेच्या थेरगाव उप अग्निशमन केंद्राला याबाबत माहिती दिली. त्यानंतर पिंपरी आणि थेरगाव येथील अग्निशमन दलाचे बचाव पथक घटनास्थळी तत्काळ दाखल झाले. दरम्यान पोलिसांना देखील पाचारण करण्यात आले होते. वाकलेली इमारत पाहण्यासाठी बघ्यांनी मोठी गर्दी केली होती. इमारत पडणार अशी भीती सर्वजण व्यक्त करत होते.

अवघ्या काही वेळात ही माहिती सर्वत्र पसरल्याने एकच खळबळ उडाली. महापालिका बांधकाम विभागाचे अधिकाऱ्यांनी रात्री घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. बांधकाम वाय पद्धतीचे म्हणजेच चार ऐवजी दोन पिलरवर उभारण्यात आल्याने अशी परिस्थिती उदभवल्याचे दिसून आले आहे. तळमजला अधिक तीन मजले या बांधकाम पद्धतीवर उभारणे जीवघेणे ठरणार, असा निष्कर्ष अधिकाऱ्यांनी काढला. त्यानंतर दुसऱ्या दिवशी सकाळी महापालिकेच्या अतिक्रमण विभागाने हे बांधकाम जमीनदोस्त केले.

मात्र, महापालिकेच्या संबंधित क्षेत्रीय कार्यालयाने परवानगी देताना जागा किती आहे आणि बांधकाम किती होणार आहे याची खातरजमा केली नसल्याचे दिसून येत आहे. त्याचबरोबर अनधिकृत बांधकाम होत असताना संबंधित विभाग काय करत होता, असा सवाल उपस्थित होत आहे.

अतिरिक्त आयुक्त प्रदीप जांभळे पाटील म्हणाले, आज दुपारी महापालिकेच्या वतीने सर्व बाबींची पुर्तता केल्यानंतर धोकादायक इमारत पाडण्यात आली. सदर इमारतीचे बांधकाम सुरू होते परंतु इमारतीच्या आरसीसी डिझाइनमध्ये काही त्रुटी होत्या. योग्यरित्या बांधकाम न केल्यामुळे इमारत एका बाजूला झुकली होती. या इमारतीमुळे आजूबाजूच्या इमारतींना आणि रहिवाशांना धोका निर्माण झाला होता.

झुकलेल्या इमारतीमुळे आजूबाजूच्या परिसरात भितीचे वातावरण निर्माण झाले होते. सार्वजनिक सुरक्षा विचारात घेऊन महापालिकेच्या वतीने योग्य ती खबरदारी घेऊन इमारत पाडण्यात आली. सदर जागेवर बांधकाम करण्यासाठी ग क्षेत्रिय कार्यालयाकडून ३ नोव्हेंबर २०२२ रोजी बांधकाम चालू करण्यासाठी दाखला देण्यात आला होता. तसेच याबाबत पुढील तपास करण्यात येत असल्याची माहिती शहर अभियंता मकरंद निकम यांनी दिली आहे.

संबंधित बांधकाम व्यावसायिकावर गुन्हा दाखल केला जाणार आहे. त्याच बरोबर युडीसीपीआर च्या नव्या नियमावलीनुसार आता बांधकाम सुरू असताना भेट देऊन पाहणी करणे बंद करण्यात आले आहे. मात्र, यापुढे प्रत्येक ठिकाणी चौकशी केली जाणार आहे. तसेच या बांधकामाच्या आर्किटेक्ट आणि स्ट्रक्चरल ऑडिटरचे लायसन रद्द करण्यासाठी शिफारस केली जाणार आहे.

- प्रदीप जांभळे पाटील, अतिरिक्त आयुक्त, पिंपरी-चिंचवड महापालिका  

दुर्घटना टळली

इमारतीचे बांधकाम जेथे सुरू होते तो रहदारीचा रस्ता आहे. रहदारी सुरू असताना ही इमारत पडली असती तर मोठी दुर्घटना घडली असती. त्यामुळे महापालिकेच्या दोषी अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी आता केली जात आहे.

Join Civic Mirror Whatsapp Group for Latest Update

Share this story

Latest