संग्रहित छायाचित्र
पिंपरी चिंचवड: ताथवडे येथील ‘यशदा’ च्या जागेवर प्रस्तावित अतिउच्चदाबाचे (२२०/२० केव्ही) उपकेंद्र उभारण्यास महावितरणकडून नुकतीच मंजुरी देण्यात आली आहे. ताथवडे, पुनावळे, चिंचवड, किवळे, वाकड व हिंजवडी परिसरातील वीजग्राहकांना त्याचा फायदा होणार आहे. (Pimpri Chinchwad News)
पुणे परिमंडळातील भविष्यातील वीजपुरवठ्याची स्थिती लक्षात घेता महावितरणकडून यापूर्वीच चऱ्होली , मोशी येथील हे दोन नवीन अतिउच्च उपकेंद्र उभारण्यास तसेच एका उपकेंद्राची क्षमतावाढ करण्यास मंजुरी मिळाली आहे. आता ताथवडे येथील तिसरे अतिउच्चदाब उपकेंद्र देखील मंजूर झाले आहे. पिंपरी विभाग अंतर्गत हिंजवडी, ताथवडे पुनावळे, किवळे, वाकड व चिंचवड तसेच भोसरी विभागातील रावेत व आकुर्डी परिसरातील सुमारे २ लाख २९ हजार ७०० वीजग्राहकांना चिंचवड व हिंजवडी अतिउच्चदाब उपकेद्रांद्वारे वीजपुरवठा केला जातो. या परिसरात विजेची व नवीन वीजजोडण्यांची वाढती मागणी तसेच सद्यस्थितीत असलेल्या चिंचवड व हिंजवडी अतिउच्चदाब उपकेंद्रावरील भार कमी करण्यासाठी ताथवडे येथे अतिउच्चदाबाचे नवीन उपकेंद्र प्रस्तावित करण्यात आले. या उपकेंद्र उभारणीची पुढील कार्यवाही महापारेषणकडून होणार आहे. विशेष म्हणजे या उपकेंद्रासाठी ‘यशदा’ने ताथवडे येथील चार एकर जागा देण्याचे मान्य केले आहे.
८५ हजार ग्राहकांना फायदा
ताथवडे येथील अतिउच्चदाबाच्या नवीन (२२०/२२ केव्ही) यशदा उपकेंद्रातून २२ केव्ही क्षमतेच्या १० नवीन वीजवाहिन्या निघतील, तर ५० एमव्हीए क्षमतेचे दोन पॉवर ट्रान्सफॉर्मर लावण्यात येतील. या १० वीजवाहिन्यांद्वारे ताथवडे, पुनावळे, चिंचवड, किवळे, वाकड व हिंजवडी परिसरातील सुमारे ८५ हजार ग्राहकांना वीजपुरवठा करण्यात येईल, अशी माहिती मुख्य अभियंता राजेंद्र पवार यांनी दिली आहे.
© Civic Mirror - Lexicon Broadcasting.
Licensor - Bennet and Coleman Co Ltd.