संग्रहित छायाचित्र
गुन्हेगारीकडे आकर्षित होणारी अल्पवयीन मुले आणि तरुण गुन्हेगार यांच्यावर आता पिंपरी-चिंचवड पोलिसांनी लक्ष केंद्रित केले आहे. अल्पवयीन मुलांना आणि नवतरुणांना गुन्हेगारीकडे वळण्यापासून रोखण्यासाठी पोलिसांनी आपला वाॅच वाढविला आहे. सोशल मीडियावरदेखील पोलीस ॲॅक्टिव्ह झाले असून सराईत गुन्हेगार, नामचीन भाई यांच्याजवळ जाणाऱ्या तरुणांकडे लक्ष ठेवले जात आहे.
सराईतांच्या प्रभावाखाली असलेली अल्पवयीन मुले आणि तरुण गुन्हेगार काय करतात, कोणत्या पोस्टला लाईक, कॉमेंट करतात, याचा डेटा पोलीस तयार करत आहेत. तसेच या उभरत्या गुन्हेगारांना बोलावून पोलीस त्यांना आपल्या भाषेत समज देत आहेत. ज्या तरुणांनी कधीही गुन्हा केलेला नाही. मात्र त्यांच्या मनात आपणही भाई व्हावे, अशी सुप्त इच्छा असते.
त्यामुळे हे उभरते गुन्हेगार मोठ्या गुन्हेगारांना फाॅलो करीत असतात. त्यांच्या पोस्टला लाइक आणि कमेंटही करीत असतात. भविष्यात त्यांच्याकडूनही अशा प्रकारचे गुन्हे घडण्याची शक्यता असते. त्यामुळे अशा उभरत्या गुन्हेगारांवर लक्ष ठेवण्यासाठी पोलीस ठाण्यानुसार यादी तयार करण्यात आली आहे.
या यादीतील उभरत्या गुन्हेगारांना बोलावून पोलीस त्याच्या भाषेत योग्य ती समज देत आहेत. एवढेच नव्हे तर सराईत गुन्हेगारांच्या मोबाइल फोनची यादीही पोलिसांनी या कक्षाकडे दिली आहे. कोणता गुन्हेगार कोणते स्टेट्स ठेवत आहे, याचीही दररोज माहिती घेतली जात आहे. जर कोणी धमकी देणारे किंवा आक्षेपार्ह स्टेट्स ठेवले तर गुन्हे शाखेचे पोलीस या सराईत गुन्हेगारास बोलावून त्याच्यावर प्रतिबंधात्मक कारवाई करतात. ज्याच्यावर किमान एक गुन्हा दाखल आहे, त्या सर्व गुन्हेगारापर्यंत पोलीस पोहोचले आहेत. यापैकी अनेकांनी कारवाईच्या भीतीने शहर सोडून पळ काढला होता, तर उर्वरित सराईत गुन्हेगारांवर पोलिसांनी मकोका, एमपीडीए, तडीपार अशा प्रतिबंधात्मक कारवाई करून त्यांना जेल अथवा जिल्ह्याबाहेरचा रस्ता दाखवला आहे.
तरुणांनी गुन्हेगारीकडे वळू नये, यासाठी पोलिसांकडून सातत्याने प्रयत्न सुरू असतात. अनेक तरुण एखाद्या गुंडाला फॉलो करताना दिसतात. असे तरुण गुन्हेगारीकडे वळण्याची शक्यता असते. त्यामुळे विविध प्रकारे लक्ष ठेवून त्यांना पोलिसांकडून समज दिली जात आहे.
- विनयकुमार चौबे, पोलीस आयुक्त, पिंपरी-चिंचवड
पोलीस ठाणेनिहाय नवगुन्हेगारांची संख्या
परिमंडळ एक : ८०
पिंपरी - २२, संत तुकारामनगर - ०, भोसरी - १२, दापोडी - ०, सांगवी - ११, चिंचवड - १६, निगडी - १५, रावेत -४
परिमंडळ दोन : १४४
देहूरोड - २१, तळेगाव - ३७, शिरगाव - ६, तळेगाव एमआयडीसी -७, वाकड - ११, काळेवाडी - २१, हिंजवडी - ४१, बावधन -०
परिमंडळ तीन : ९७
चाकण - २७, महाळुंगे - २०, आळंदी - ११, दिघी - ५, चिखली - १४, भोसरी एमआयडीसी - २०
© Civic Mirror - Lexicon Broadcasting.
Licensor - Bennet and Coleman Co Ltd.