पिंपरी-चिंचवड: ठेकेदारांचा निष्काळजीपणा; नागरिकांचा जीव धोक्यात!

निगडी ते किवळे या बीआरटी मार्गावर उभारण्यात आलेल्या उड्डाणपुलाच्या उद्घाटनाच्या घाईत अनेक चुका झाल्या आहेत. त्यातील एक म्हणजे या पुलावर लावण्यात आलेले दिशादर्शक हे धोक्याचे अन् जीवघेणे ठरणार आहेत.

ठेकेदारांचा निष्काळजीपणा; नागरिकांचा जीव धोक्यात!

किवळे-निगडी उड्डाणपुलावरील प्रकार, उद्घाटनाच्या घाईमुळे केल्या 'या' चुका

पंकज खोले
निगडी ते किवळे या बीआरटी मार्गावर (Nigdi Kiwale BRT Route) उभारण्यात आलेल्या उड्डाणपुलाच्या उद्घाटनाच्या घाईत अनेक चुका झाल्या आहेत. त्यातील एक म्हणजे या पुलावर लावण्यात आलेले दिशादर्शक हे धोक्याचे अन् जीवघेणे ठरणार आहेत. कारण, हे उभारण्यासाठी ठेकेदाराने निष्काळजीपणा दाखवत दोनच बोल्टवर उभे केले आहे. भविष्यात ते पडून अपघात होण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. या परिसरातील एका दक्ष नागरिकाने ही समस्या निदर्शनास आणून दिली.

पिंपरी-चिंचवड महापालिकेने (PCMC) निगडीच्या भक्ती-शक्ती चौकापासून ते किवळे येथील मुकाई चौकापर्यंतचा बीआरटी मार्ग विकसित करीत आहे. यामुळे निगडी, आकुर्डी, भोसरी एमआयडीसी व आसपासच्या परिसरातील नागरिकांना महामार्गाकडे व किवळेला लवकर पोहोचता येईल. दरम्यान हा मार्ग व उड्डाणपूल सुरू झाल्यानंतर विविध कारणांनी व असंख्य चुकांमुळे नागरिकांकडून त्यावर टीका होत आहे.

प्रत्यक्षात हा मार्ग गेली आठ वर्ष रखडला होता. जागा ताब्यात न घेता महापालिकेने थेट बीआरटी मार्गाचे काम सुरू केले. त्यामुळे त्याला विरोध झाला होता. अखेर या ४५ मीटर रुंद मार्गाचे काम जानेवारी महिन्यात पूर्ण झाले आहे. या मार्गासाठी ८७ कोटी रुपये खर्च झाला. मात्र, हा पूल सुरू करण्याचे नादात व लवकर उद्घाटन उरकरण्यासाठी ठेकेदाराकडून चुका झाल्या आहेत. त्यामुळे त्या निस्तरण्याची वेळ महापालिकेवर आली आहे. अद्यापही या रस्त्याचे काम अपूर्ण आहे. तसेच बीआरटी देखील अद्याप सुरू नाही. रावेतकडील जागा ताब्यात नसल्याने अडचणी निर्माण झाल्या आहेत. किवळेपासून उड्डाणपूल सुरू होताना ठिकाणी चुकीचे वळण केल्याने अपघाताचे प्रमाण देखील वाढले आहे.

दरम्यान या बापदेव महाराज पुलावर दोन्ही बाजूला उभारण्यात दिशादर्शक धोकादायक ठरू लागले आहेत. दिशादर्शक उभारण्यासाठी चार ठिकाणी स्क्रू- बोल्ट लावणे आवश्यक आहे. मात्र, केवळ दोनच बोल्टवर हा दिशादर्शक उभा केला आहे. स्थानिक नागरिक प्रवीण पाटील यांनी ही बाब निदर्शनास आणून दिली. तो दिशादर्शक हलत असून, भविष्यात हवेने पडून अपघात होऊ शकतो. तर, खाली पडून दुचाकीस्वार अथवा पादचारी व्यक्तीला मोठी इजा होऊ शकते. मात्र त्या दृष्टीने एकही अधिकारी अथवा संबंधित ठेकेदाराने त्याकडे पाहिले नाही. केवळ काम उरकायचे या नादात तसाच बोल्ट ठेवला आहे. एक-दोन नव्हे तर या ठिकाणी उभ्या करण्यात आलेले बहुतांश दिशादर्शकांची ही स्थिती आहे. त्यामुळे हा उड्डाणपूल नागरिकांच्या विषयास चर्चेला ठरला आहे.

वाहतूक कोंडीचा नागरिकांना प्रचंड त्रास

रावेत येथील उड्डाणपूल खुला झाल्यानंतर किवळेतील बापदेव महाराज पुलाखालील वाहतूक कोंडीमध्ये भर पडली आहे. त्यामुळे, वाहनचालक पुरते त्रस्त झाले आहेत. यामुळे वरचेवर छोटे-मोठे अपघात देखील होत आहेत. वाहतूक नियंत्रित करताना स्थानिक वाहतूक पोलिसांच्या अपुरी पडत आहे. कोंडी होणार नाही, यादृष्टीने उपाययोजना कराव्यात, अशी मागणी किवळे रावेत सोसायटीचे पदाधिकारी व स्थानिक नागरिकांनी केली आहे.

जरा निवडणूक कामात आहे

उड्डाणपुलाच्या विषयाबाबत महापालिकेचे अधिकारी व वाहतूक नियोजन या विभागाशी संपर्क साधला. मात्र, जरा निवडणूक कामात असल्याचे सांगून, नंतर संपर्क करा, असे उत्तर मिळाले. त्यामुळे या कामाच्या नावाखाली जबाबदारी झटकत असल्याचे पाहण्यास मिळाले.

या उड्डाणपुलाचा संबंधित ठिकाणाची पाहणी करण्यात येणार आहे. त्यावरती उपाययोजना करण्याच्या सूचना करण्यात येतील.
-प्रमोद ओंबासे, सह-शहर अभियंता 

 

Join Civic Mirror Whatsapp Group for Latest Update

Share this story

Latest