पालिकेच्या गचाळ कारभाराचा राष्ट्रवादीकडून निषेध
विकास शिंदे
पिंपरी-चिंचवड: शहरात रविवारी अचानक ढगफुटी सदृश पाऊस झाला. त्याने महापालिकेचा गचाळ कारभार चव्हाट्यावर आला. शहरातील अनेक भागात कंबरेएवढे पाणी साचले. अनेकांच्या घरात पाणी शिरुन जीवनावश्यक वस्तूचे नुकसान झाले. पावसाळ्यापूर्वी ड्रेनेज वहिनी स्वच्छता न केल्याने, आपत्कालीन यंत्रणा सज्ज नसल्याने नागरिकांना नाहक त्रासाला सामोरे जायला लागले, महापालिकेच्या ढिसाळ कारभाराचा राष्ट्रवादी काॅग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाने निषेध व्यक्त केला.
निगडी येथील अ प्रभाग आणि फ प्रभाग क्षेत्रीय कार्यालयात जनसंवाद सभेत अधिकाऱ्यांना चांगलेच धारेवर धरले, दोन दिवसात संत तुकाराम महाराजांचे व संत तुकाराम महाराजांचे पालखी प्रस्थान शहरातून मार्गस्थ होणार असताना लाखो वारकरी बांधवांना महापालिकेच्या गलथान कारभाराचा त्रास होण्याची शक्यता असल्याची भीती त्यांनी यावेळी व्यक्त केली.
सत्ताधारी पुढाऱ्यांनी आजवर कोट्यवधींचा भ्रष्टाचार केला असून, इथे नागरिकांना सध्या मुलभूत सुविधा महापालिका प्रशासन देऊ शकत नाही, एकीकडे शहर विकासाच्या नावाने मोठमोठ्या प्रकल्पांच्या घोषणा करायच्या आणि दुसरीकडे एका पावसाने नागरिकांच्या घरांमध्ये पाणी शिरावे अशी दयनीय अवस्था सत्ताधारी व महापालिका प्रशासनाच्या गलथानपणामुळे झाली आहे,
पावसाळ्याच्या व पालखी प्रस्थान सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर शहरात कोणतीही दुर्घटना होऊ नये यासाठी महापालिका प्रशासनाने तात्काळ उपाययोजना कराव्यात व आवश्यक त्या यंत्रणा उभाराव्यात, ड्रेनेज व्यवस्था स्वच्छ सुरळीत करणे, आपत्कालीन यंत्रणा बळकट करणे, त्याचबरोबर वारकरी बांधव व शहरवासीयांच्या सुरक्षेच्या दृष्टीने आवश्यक त्या सोयी सुविधा तात्काळ पुरविण्याच्या सूचना यावेळी तुषार कामठे यांनी उपस्थित अधिकाऱ्यांना केल्या.
यावेळी शहर राष्ट्रवादी काँग्रेस शहराध्यक्ष तुषार कामठे, माजी नगरसेविका सुलक्षणा शिलवंत धर, माजी नगरसेवक विनायक रणसुभे, राष्ट्रवादी महिला शहराध्यक्ष ज्योती निंबाळकर, उपाध्यक्ष रेखा मोरे, राष्ट्रवादी काँग्रेस प्रदेश युवक सरचिटणीस प्रशांत सपकाळ, शहर उपाध्यक्ष दिलीप पानसरे, अनिल भोसले, काशिनाथ जगताप, विनोद धुमाळ, शहर सरचिटणीस सचिन गायकवाड, शहर सचिव योगेश सोनवणे, चिंचवड विधानसभा अध्यक्ष सागर चिंचवडे,राष्ट्रवादी ओबीसी विभाग शहराध्यक्ष विशाल जाधव, उपाध्यक्ष सागर भुजबळ, भोसरी विधानसभा अध्यक्ष संतोष माळी, सामाजिक न्याय विभाग शहराध्यक्ष मयूर जाधव, सेवादल शहराध्यक्ष अरुण थोपटे, शरदचंद्र संजीवनी आरोग्य योजना भोसरी विधानसभा अध्यक्ष मंगेश उर्फ राजू खंडागळे व इतर सर्व शहर कार्यकारणी व पदाधिकारी यांचा समावेश होता.
© Civic Mirror - Lexicon Broadcasting.
Licensor - Bennet and Coleman Co Ltd.