पिंपरी-चिंचवड : पालिकेतील 'ठाण'बहाद्दरांच्या बदल्यांचा मुहूर्त हुकला

महापालिकेच्या आस्थापनेवरील विभाग प्रमुखाच्या मर्जीतील अधिकारी, कर्मचारी हे वर्षानुवर्षे एकाच विभागात ठाण मांडून कार्यरत आहेत. या कर्मचाऱ्यांचे लागेबांधे तयार होऊन अर्थपूर्ण वाटाघाटीत वाढल्या आहेत.

PCMC transfers

पिंपरी-चिंचवड : पालिकेतील 'ठाण'बहाद्दरांच्या बदल्यांचा मुहूर्त हुकला

प्रस्ताव तयार मात्र आयुक्तांना मिळेना वेळ, ३१ आॅगस्टची डेडलाईनही उलटून गेली

महापालिकेच्या आस्थापनेवरील विभाग प्रमुखाच्या मर्जीतील अधिकारी, कर्मचारी हे वर्षानुवर्षे एकाच विभागात ठाण मांडून कार्यरत आहेत. या कर्मचाऱ्यांचे लागेबांधे तयार होऊन अर्थपूर्ण वाटाघाटीत वाढल्या आहेत. यामध्ये स्थापत्य, आरोग्य, वैद्यकीय, करसंकलन, भांडार, उद्यान यासह अन्य विभागातील अधिकारी-कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. (PCMC transfers)

मात्र, महापालिकेच्या सामान्य प्रशासनाकडून कर्मचाऱ्यांच्या बदल्यांचा प्रस्ताव तयार केला आहे. ३१ आॅगस्ट अखेरपर्यंत पात्र अधिकारी-कर्मचाऱ्यांच्या बदली होतील, असे सांगण्यात आले. परंतु, आयुक्त शेखर सिंह यांना वेळ मिळत नसल्याने अधिकारी-कर्मचाऱ्यांच्या बदल्यासाठी मुहूर्त लागत नसल्याचे दिसून येत आहे. यामुळे बदलीस पात्र असलेल्या अधिकारी-कर्मचाऱ्यांचे चांगलेच फावले आहे.

महापालिका आयुक्तांनी विभागातील गट अ ते गट ड मधील जे अधिकारी व कर्मचारी हे एप्रिल व मे २०२४ या महिन्यात बदलीस पात्र ठरतात. त्यांची यादी व ज्या अधिकारी, कर्मचा-यांना वैयक्तिक, वैद्यकीय कारणास्तव बदलीचे अर्ज द्यायचे असतील. असे अर्ज हे ८ आॅगस्ट पर्यंत विभाग प्रमुखांकडून सामान्य प्रशासनाकडे आवश्यक त्या कागदपत्रासह सादर करावेत, असे आवाहन आदेश आयुक्त शेखर सिंह यांनी दिले होते. (Pimpri chinchwad  municipal corporation transfers)

त्यानुसार महापालिकेच्या गट अ आणि ब मधील ३६ अधिकारी तर गट क मधील तब्बल ३२९ कर्मचारी आणि टेक्निकल संवर्गातील ७१ कर्मचारी हे बदलीसाठी पात्र झालेले आहेत. त्यामुळे  महापालिकेत बदलीसाठी ४३६ अधिकारी-कर्मचाऱ्यांची उचलबांगडी कधी होणार याकडे सर्वांचे लक्ष लागले होते. महापालिकेच्या सामान्य प्रशासन विभागाने आस्थापनेवरील अधिकारी व कर्मचारी एकाच विभागात ६ वर्षांपासून अधिक काळ कार्यरत आहेत. त्या अधिकारी, कर्मचाऱ्यांची  प्रशासन विभागाने दिलेल्या माहितीनुसार कार्यकारी अभियंता, उपअभियंता, कनिष्ठ अभियंता, ज्येष्ठ वैद्यकीय अधिकारी, मुख्य लिपिक, लिपिक, साहाय्यक भांडारपाल, लेखापाल, उपलेखापाल या सारख्या पदांवर अनेक वर्षे ठाण मांडून बसलेल्या अधिकारी, कर्मचारी आढळून येत आहेत.

दरम्यान, महापालिकेच्या आस्थापनेवरील वर्ग एक ते वर्ग चार मधील अधिकारी-कर्मचाऱ्यांनी वर्षानुवर्षे एकाच विभागात ठाण मांडून बसलेल्यांची तातडीने बदल्या कराव्यात. या वर्षी मात्र ३१ आॅगस्ट उजाडला तरीही बदल्या केलेल्या नाहीत. प्रशासनाने दिलेली डेडलाईन देखील हुकली आहे. त्यामुळे बदलीस पात्र असणाऱ्यांच्या बदल्या आता  तरी होईल का, की केवळ बदलीचा फार्स केला जाणार, असा प्रश्नही उपस्थित केला जात आहे.

बदली धोरणास हरताळ

मुंबई उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार, महापालिका सेवेतील ‘वर्ग- अ’ ते ‘ड’पर्यंतच्या अधिकारी, कर्मचाऱ्यांच्या बदल्यांसंदर्भात २०१५ मध्ये धोरण निश्चित केले आहे. त्यानुसार एप्रिल व मे महिन्यात बदल्या करणे अपेक्षित असते. महापालिकेच्या विविध विभागांत कार्यकारी अभियंता, उप-अभियंता, कनिष्ठ अभियंता, ज्येष्ठ वैद्यकीय अधिकारी, मुख्य लिपिक, लिपिक, साहाय्यक भांडारपाल, लेखापाल, उपलेखापाल यासारख्या पदांवर अनेक वर्षे ठाण मांडून बसलेले अधिकारी, कर्मचारी आहेत. यामध्ये वर्ग एक व दोन मधील अधिकाऱ्यांच्या तीन वर्षांत आणि वर्ग तीन आणि चार मधील कर्मचाऱ्यांच्या सहा वर्षे पूर्ण झाले आहेत. त्यांच्या बदल्या होणे अपेक्षित आहे. पण, या धोरणाकडे दुर्लक्ष करून अधिकारी-कर्मचाऱ्यांच्या बदली धोरणाला हरताळ फासला जात आहे.

करसंकलन विभागात अधिकारी-कर्मचारी मालामाल..

महापालिकेच्या धोरणानुसार बदली करणे आवश्यक असताना करसंकलनच्या १७ विभागीय कार्यालयातील प्रशासन अधिकारी, कार्यालयीन अधीक्षक, मुख्य लिपिक, लिपिकांच्या तातडीने अन्य विभागात बदल्या कराव्यात, त्या-त्या झोनच्या कर्मचाऱ्यांविरोधात नागरिकांच्या तक्रारी वाढल्या आहेत. त्यामुळे प्रशासन अधिकारी राजाराम सरगर, कार्यालयीन अधीक्षक चंद्रकांत विरनक, संगणकचालक प्रवीण मयेकर यांची पंधरा ते वीस वर्ष सेवा करसंकलन विभागात झालेली आहे. तर काही मुख्य लिपिक, लिपिक, शिपाई हे देखील दहा ते पंधरा वर्ष झाले करसंकलन विभागात कार्यरत आहेत. ह्या कर्मचारी-अधिकारी वर्षानुवर्ष कार्यरत असल्याने नागरिकांच्या प्रचंड तक्रारी वाढल्या आहेत. हे चिरीमिरी घेतल्याशिवाय कामच करत नाहीत. त्यामुळे अधिकारी–कर्मचारी मालामाल झाले असून त्यांच्या बदल्या कराव्यात, अशी मागणी नागरिकांतून होत आहे.

बदलीस पात्र असणाऱ्या अधिकारी-कर्मचाऱ्यांच्या प्रस्तावाची फाईल तयार आहे. येत्या दोन- चार दिवसांत सर्वांच्या बदल्या करण्यात येतील. यामध्ये वर्ग तीन आणि चारमधील कर्मचाऱ्यांच्या अगोदर करण्यात येतील. त्यानंतर वर्ग दोनमधील अधिकाऱ्यांच्या बदल्या केल्या जातील. तर क्षेत्रीय अधिकारी यांच्या बदल्या विधानसभा निवडणूक पार पडल्यानंतर करण्यात येणार आहेत. निवडणूक कालावधीत साहाय्यक आयुक्तांच्या देखील बदल्या होणार आहेत.

- शेखर सिंह, 

आयुक्त तथा प्रशासक, महापालिका   

Join Civic Mirror Whatsapp Group for Latest Update

Share this story

Latest