पिंपरी चिंचवड महापालिका
पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या कर संकलन विभागाने अवघ्या ८२ दिवसात ३०० कोटी रूपये कर वसुली केली आहे. आतापर्यंत सुमारे ४० टक्के मालमत्ताधारकांनी त्यांचा संपूर्ण कर जमा केला आहे. यात सर्वाधिक कर वसूली ऑनलाईन आणि बीबीपीएसद्वारे २१८ कोटी रुपयांची कर वसूली झाली आहे.
कर संकलन विभागाकडून निवासी व बिगरनिवासी मिळकतींना कर आकारून त्यांची विविध १७ विभागीय कर संकलन कार्यालयांकडून वसुली केली जाते. कर संकलन विभागाकडे सध्या शहरातील ६ लाख २ हजार २०३ मिळकतींची नोंद आहे. मिळकतधारकांना महापालिकेच्या माध्यमातून यंदा १०० टक्के बिलांचे वाटप करण्यात आले आहे. त्यामुळे विक्रमी कर वसूली झाली आहे.
महापालिकेकडून कर संकलनासाठी जनजागृती करण्यात आली होती. एसएमएस, टेलिकॉलिंग, आयव्हीआरएस यासह विविध माध्यमांद्वारे राबविण्यात आलेल्या जनजागृती मोहिमेचे आयोजन कर प्राप्तीसाठी यशस्वी ठरले आहे. तसेच महापालिकेकडून मालमत्ता कराच्या आगाऊ भरणासाठी ५ टक्के आणि ऑनलाइन कर भरणा करण्यासाठी ५ टक्के सूट देण्यात आली होती. या सवलतीचा करदात्यांनी मोठ्या प्रमाणात लाभ घेतला आहे. परिणामी, कर मोठ्या प्रमाणात ऑनलाइन भरला गेल्याने पेपरलेस आणि डिजिटल इंडिया मोहिमेला चालना मिळाली आहे.
गेल्या ८२ दिवसात जमा झालेला कर :
ऑनलाइन/ बीबीपीएस - २१८ कोटी रुपये
रोख रक्कम - ३९ कोटी रुपये
चेक/डीडी - २६ कोटी रुपये
इतर -आरटीजीएस / एनईएफटी/ आयएमपीएस/ ईडीसी - २० कोटी रुपये
© Civic Mirror - Lexicon Broadcasting.
Licensor - Bennet and Coleman Co Ltd.