पिंपरी चिंचवड: धुळीच्या साम्राज्यात पालिका आयुक्तांचे वास्तव्य!

महानगरपालिकेचे आयुक्त शेखर सिंह यांच्या निवासस्थानासमोर एका कंपनीचे तीन महिने झाले खोदकाम सुरू आहे. हे खोदकाम दिवस -रात्र सुरू असून माती, दगड, मुरुम घेऊन रस्त्यावरून जाणा-या अवजड वाहनाची वर्दळ प्रचंड वाढली आहे.

पिंपरी चिंचवड: धुळीच्या साम्राज्यात पालिका आयुक्तांचे वास्तव्य!

तीन महिने सुरू आहे रस्त्यावर खोदकाम, माती, मुरुम, दगड वाहतूक करणाऱ्या वाहनांना नाही संरक्षक जाळी, वाहनचालकांना डोळे, घशाचे विकार

महानगरपालिकेचे आयुक्त शेखर सिंह यांच्या निवासस्थानासमोर एका कंपनीचे तीन महिने झाले खोदकाम सुरू आहे. हे खोदकाम दिवस -रात्र सुरू असून माती, दगड, मुरुम घेऊन रस्त्यावरून जाणा-या अवजड वाहनाची वर्दळ प्रचंड वाढली आहे. माती, मुरुम, दगडाची वाहतूक करताना वाहनांवर संरक्षक जाळी पसरली जात नसल्याने वाहनचालकांना त्रास सहन करावा लागत आहे. त्यातच टू व्हीलरवरून प्रवास करणा-या नागरिकांच्या नाका, तोंडासह डोळ्यात धूळ जाऊ लागली आहे. सदरची धूळ हवेत पसरून हवा प्रदूषणदेखील वाढले आहे. याकडे महापालिकेच्या पर्यावरण विभागाचे दुर्लक्ष झाले आहे.

पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे (PCMC) आयुक्त तथा प्रशासक शेखर सिंह यांच्या राहत्या बंगल्यासमोर एमआयडीसी हद्दीत एका कंपनीचे खोदकाम आणि बांधकाम सुरू आहे. हे खोदकाम मागील तीन महिन्यांपासून सुरू झाले असून खोदकाम मोठ्या प्रमाणावर पूर्ण झाले आहे. हे खोदकाम करताना दिवस - रात्र काम सुरू आहे. पिंपरी ते चिखली, कुदळवाडी, मोशी, देहू, आळंदीकडे जाणाऱ्या वाहनांची या रस्त्यावर वर्दळ असते. परंतु, खोदकाम करताना धूळ हवेत उडत आहे. तेथील बीआरटी रस्त्यावर मोठ्या प्रमाणात धूळ साचली आहे. अवजड वाहन रस्त्यावरून जाताना धुळीचे लोट आकाशात उडतात. परिणामी टू व्हीलर वाहनावरील नागरिकांना श्वास घेण्यासही अडचण येत आहे. त्याचबरोबर कपड्यांवर धूळ साचून मळत आहेत.

कंपनीचे खोदकाम करणा-या कंत्राटदाराने नागरिकांची होणारी गैरसोय, रस्त्यावर उडणाऱ्या धुळीवर प्रतिबंधक उपाययोजना केलेल्या नाहीत. वाहनचालकांच्या आरोग्यावर धुळीचा परिणाम होऊ लागला आहे. धुळीचा रस्त्यावर तर त्रास होतोच, शिवाय रामनगर, विद्यानगर परिसरातील स्थानिक नागरिकांच्या घरावरदेखील धूळ साचल्याने, छोटे दुकानदारही त्रस्त झाले आहेत.  या धुळीचा परिणाम नागरिकांच्या आरोग्यावर होत आहे. काही वाहनचालकांना धुळीमुळे डोळ्याचा त्रास जाणवत आहे. धुळीचा प्रश्‍न ऐरणीवर आला असून मनपा प्रशासनाने याकडे लक्ष देण्याची गरज आहे.

"धुळीमुळे श्‍वसनाचे आजार वाढत आहेत. ज्यांना धुळीची ॲलर्जी आहे, त्यांना धूळ सहन होत नाही. त्यांच्यावर धुळीचा परिणाम लवकर होतो. श्‍वसनाचे आजार असलेल्यांनी आरोग्याची काळजी घ्यावी. ॲलर्जी, दम्याचा त्रास असलेल्या नागरिकांनी शक्‍यतो, बाहेर पडू नये. पडलेच तर नाकाला मास्क किंवा रुमाल वापरणे आवश्यक आहे."
- डॉ. प्रकाश जुकंटवार

"कंपनीकडून केलेल्या खोदकामामुळे रस्त्यावरील धुळीचा इतका त्रास वाढला की, मोटार सायकलवरून ये - जा करणे कठीण झाले आहे. धुळीचा श्‍वसनाला त्रास होत आहे. नाकावाटे, तोंडाद्वारे धूळ शरीरात जात आहे. याचा आरोग्यावर आम्हाला परिणाम जाणवतो. धुळीचा नाक आणि घशाला त्रास होतो. मनपाच्या कारभारामुळे रस्ते साफसफाई केले जात नाही, त्यामुळे धूळ वाढली. त्याबरोबर बांधकामामुळेही रस्ता धुळीने माखलेला आहे."
- प्रशांत राऊळ, पर्यावरणप्रेमी नागरिक

 

Join Civic Mirror Whatsapp Group for Latest Update

Share this story

Latest