पिंपरी-चिंचवड : गृह प्रकल्पातील बाराशेहून अधिक घरे रिकामी

पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाकडून (पीएमआरडीए) उभारण्यात आलेल्या सेक्टर १२ आणि सेक्टर ३० आणि ३२ या दोन्ही गृह प्रकल्पांतील जवळपास बाराशेहून अधिक घरे रिकामी आहेत. नुकतीच लोकसभा निवडणूक आचारसंहिता संपुष्टात आली. त्यामुळे गेल्या अनेक महिन्यांपासून रखडलेली सोडत मार्गी लागणार आहे. मात्र, आता तरी त्या घरांना प्रतिसाद मिळणार का, असा प्रश्न उपस्थित केला आहे.

  • By PuneMirror Bureau
  • Reported By Admin
  • Edited By Admin
  • Mon, 17 Jun 2024
  • 11:37 am
PMRDA, pimpri chinchwad news

संग्रहित छायाचित्र

महिनाअखेरपर्यंत सोडत काढण्याचे नियोजन, 'पीएमआरडीए'च्या वाल्हेकरवाडी येथील गृहयोजनेस यंदा तरी प्रतिसाद मिळणार का?

पंकज खोले :
पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाकडून (पीएमआरडीए) उभारण्यात आलेल्या सेक्टर १२ आणि सेक्टर ३० आणि ३२ या दोन्ही गृह प्रकल्पांतील जवळपास बाराशेहून अधिक घरे रिकामी आहेत. नुकतीच लोकसभा निवडणूक आचारसंहिता संपुष्टात आली. त्यामुळे गेल्या अनेक महिन्यांपासून रखडलेली सोडत मार्गी लागणार आहे. मात्र, आता तरी त्या घरांना प्रतिसाद मिळणार का, असा प्रश्न उपस्थित केला आहे.

प्राधिकरणाकडून (पीएमआरडीए) वाल्हेकरवाडी गृहयोजना आणि पेठ क्रमांक १२ येथील गृहप्रकल्पातील शिल्लक राहिलेल्या सदनिकांसाठी महिनाअखेरपर्यंत सोडत काढण्याचे नियोजन सुरू आहे. त्या दृष्टीने सध्या आवश्यक हालचाली सुरू आहेत. येथील उरलेल्या घरांसाठी तिसरी सोडत काढण्यात येणार आहे. त्यात प्रतिसाद न मिळाल्यास हे सर्वांसाठी खुली राहणार आहेत. वाल्हेकरवाडी येथील पेठ क्रमांक ३० व ३२ येथे पीएमआरडीएच्या वतीने ७९८ घरांचा प्रकल्प साकारला आहे. या गृहप्रकल्पात आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील (ईडब्ल्यूएस) नागरिकांसाठी ३७८ वन रूम किचन सदनिका साकारल्या आहेत, तर अल्प उत्पन्न गटातील (एलआयजी) नागरिकांसाठी ४१४ वन बीएचके सदनिका आहेत.

येथील घरांसाठी यापूर्वी एकदा सोडत काढण्यात आली होती. त्या वेळी ११५ जणांनी पूर्ण पैसे भरले होते. त्यापैकी ३६ कुटुंबांना निवडणूक आचारसंहितेपूर्वी ताबे देखील देण्यात आलेले आहेत. दरम्यान, या गृहप्रकल्पातील बहुतांश घरे शिल्लक आहेत. त्यासाठी आता पुन्हा एकदा सोडत काढली जाणार आहे. ही सोडत दुसरी असणार आहे. यातूनही काही घरे शिल्लक राहिल्यास त्याची तिसऱ्यांदा सोडत काढली जाईल. तर, प्रधानमंत्री आवास योजनेमधील पेठ क्रमांक १२ येथील गृहप्रकल्पामध्ये पहिल्या टप्प्यात ४ हजार ८८३ घरे उभारण्यात आली. या गृहप्रकल्पात आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील नागरिकांसाठी ३३१७ तर, अल्प उत्पन्न गटासाठी १५६६ सदनिका आहेत. या गृहप्रकल्पामध्ये ईडब्ल्यूएसमध्ये असणाऱ्या  सर्व वन बीएचके सदनिका वितरित झालेल्या आहेत. तथापि, अल्प उत्पन्न गटातील नागरिकांसाठी उभारलेल्या २ बीएचके घरांपैकी देखील बऱ्याच घरांचे वितरण बाकी आहे. त्यासाठी देखील नव्याने सोडत काढली जाणार आहे. यातून देखील घरे शिल्लक राहिल्यास ती सर्वांसाठी खुली असून, पहिले येतील त्यास घरे देण्यात येतील.

पीएमआरडीएने वाल्हेकरवाडी आणि पेठ क्रमांक १२ येथे उभारलेल्या दोन गृहप्रकल्पांमधील शिल्लक सदनिकांच्या वाटपासाठी नव्याने सोडत काढली जाणार आहे. त्या दृष्टीने आवश्यक कार्यवाही सध्या सुरू आहे. सध्या सुरू असलेल्या महिन्यातील शेवटच्या आठवड्यात ही सोडत काढण्याचे नियोजन आहे. त्या अनुषंगाने प्रक्रिया सुरू आहे.
-अभिजित जगताप, तहसीलदार, जमीन व मालमत्ता विभाग, पीएमआरडीए

Join Civic Mirror Whatsapp Group for Latest Update

Share this story

Latest