पिंपरी-चिंचवड: अग्निशमन जवानांना शहीद दर्जा, कुटुंबीयाला दिल्या सवलती

दापोडी येथील जलनिस्सारण कामात मातीच्या ढिगा-या खाली अडकलेल्यांचे बचाव कार्य करताना वीरमरण आलेल्या अग्निशमन विभागातील जवानाला शासनाने शहीद दर्जा आणि त्यांच्या कुटुंबीयांना विविध सवलती देण्याची घोषणा केली. त्यानुसार महापालिकेच्या अग्निशमन विभागाने त्या सवलती दिल्या आहेत.

विशाल जाधव

पिंपरी वाघेरे येथे म्हाडा इमारतीमध्ये मिळणार सदनिका, दापोडीतील बचावकार्यात विशाल जाधव यांना आले होते वीरमरण

विकास शिंदे
दापोडी येथील जलनिस्सारण कामात मातीच्या ढिगा-या खाली अडकलेल्यांचे बचाव कार्य करताना वीरमरण आलेल्या अग्निशमन विभागातील जवानाला शासनाने शहीद दर्जा आणि त्यांच्या कुटुंबीयांना विविध सवलती देण्याची घोषणा केली. त्यानुसार महापालिकेच्या अग्निशमन विभागाने त्या सवलती दिल्या आहेत.  

महापालिकेच्या अग्निशमन दलातील जवान विशाल हनुमंतराव जाधव यांना १ डिसेंबर २०१९ रोजी दापोडी येथील एका बचाव कार्यादरम्यान वीरमरण आले. अग्निशमन विभागाने त्यांना शहीद दर्जा आणि त्यासोबत अन्य सवलती मिळण्याबाबत पाठपुरावा केला. १ जुलै २०२१ रोजी शासनाने विशाल जाधव यांना शहीद दर्जा आणि त्यांच्या कुटुंबीयांना सवलती देण्याची घोषणा केली. त्या सवलती अग्निशमन विभागाकडून दिल्या आहेत.

विशाल जाधव हे २४ डिसेंबर २०१२ रोजी अग्निशमन दलात रुजू झाले. १ डिसेंबर २०१९ रोजी दापोडी येथे २५ फूट खोल खड्ड्यात एक व्यक्ती अडकली होती. त्या व्यक्तीला वाचविण्यासाठी अग्निशमन दलाचे बचाव कार्य सुरू होते. विशाल जाधव त्या व्यक्तीला वाचवण्यासाठी खोल खड्ड्यात उतरले होते. दरम्यान वरून मातीचा मोठा ढिगारा ढासळला आणि त्याखाली अडकून कर्तव्य बजावताना त्यांना वीरमरण आले.

अग्निशमन विभागाकडून सर्वसाधारण सभेची मान्यता घेऊन विशाल जाधव यांना शहीद दर्जा व शहिदांच्या कुटुंबीयांना मिळणाऱ्या सवलती मिळण्यासाठी शासनाकडे प्रस्ताव सादर करण्यात आला. तो प्रस्ताव मंजूर करत १ जुलै २०२१  रोजी शासनाने जवान विशाल हनुमंतराव जाधव यांना शहीद दर्जा दिला. तसेच त्यांच्या कुटुंबीयांना सवलती जाहीर केल्या. त्यामध्ये पिंपरी वाघेरे येथे म्हाडा इमारतीमध्ये ६६० चौरस फूट सदनिका उपलब्ध करून देण्यात आली आहे. शहीद विशाल जाधव यांच्या दोन अपत्यांच्या माध्यमिक शिक्षणाचा खर्च अग्निशमन विभागाकडून करण्यात येत आहे. शहीद विशाल जाधव यांच्या पत्नी प्रियंका जाधव यांना महापालिका येथे लिपिक पदावर नियुक्ती देण्यात आलेली आहे. तसेच २५ लाख रुपयांचे दहा वर्षाकरिता फिक्स डिपॉझिट करून त्यावरील व्याज शहीद विशाल जाधव यांच्या वारसांना अग्निशमन विभागाकडून देण्यात येत आहे. शहीद विशाल जाधव हे त्यांच्या सेवानिवृत्तीच्या दिनांकापर्यंत कार्यरत आहेत असे समजून त्यांना मासिक वेतन अदा करण्यात येत आहे. ज्यामध्ये ३० टक्के वेतन शहीद विशाल जाधव यांचे आई-वडील आणि ७० टक्के वेतन त्यांच्या पत्नीस दिले जात आहे.

Join Civic Mirror Whatsapp Group for Latest Update

Share this story

Latest