पिंपरी-चिंचवड :वाढत्या अतिक्रमणाने आयटी पार्क बकाल!
पंकज खोले
हिंजवडी आयटी परिसरात ठिकठिकाणी रस्त्यालगत होत असलेल्या अतिक्रमणामुळे ‘आयटी पार्क’ चा बकालपणा वाढला आहे. तसेच रस्त्याला लागून असलेल्या अनधिकृत दुकानामुळे वाहतूक कोंडीत भर पडत असून, त्यामुळे अनेक प्रश्न प्रलंबित राहिले आहेत. पीएमआरडीए , एमआयडीसी, सार्वजनिक बांधकाम विभाग आणि ग्रामपंचायत या वेगवेगळ्या विभागामुळे रस्ता रुंदीकरण आणि पायाभूत सुविधांचा प्रश्न सुटला नाही. परिणामी, बेकायदेशीरपणे थाटलेल्या दुकानांमुळे आयटी पार्कचे अशाप्रकारे विद्रूपीकरण झाले आहे.
हिंजवडी आयटी पार्कमध्ये शेकडो कंपन्या आहेत. त्याकडे जाणारे रस्ता प्रशस्त आहे. मात्र, अनेक ठिकाणी रस्त्यालगतच्या मोकळ्या जागेचा टपरी, हातगाडी आणि दुकानमालकांनी ताबा घेतला आहे. हळूहळू त्यांचे बिऱ्हाड रस्त्यावर येऊन पोहोचले आहे. त्यामुळे जाणाऱ्या येणाऱ्या वाहनचालकांना वाहतूक कोंडीचा सामना करावा लागत आहे. गेल्या अनेक महिन्यापासून या समस्येमुळे वाहन चालक त्रस्त झाले आहेत. ग्रामपंचायत याकडे दुर्लक्ष करत असून, यावर कारवाई करणार कोण असा प्रश्न उपस्थित होत आहे.
संबंधित व्यापारी आणि ग्रामपंचायत अधिकारी यांची मिलीभगत असल्याने यावर कारवाई होत नसल्याचा आरोप स्थानिक नागरिक करत आहेत. त्यामुळे ही समस्या दिवसेंदिवस वाढत आहे. हिंजवडी टप्पा १ ते टप्पा ३ रस्ता, हिंजवडी ते छत्रपती शिवाजी महाराज चौक रस्ता, लक्ष्मी रोड ते हिंजवडी रस्ता या प्रमुख रस्त्यांवर मोठ्या प्रमाणात दुकान आणि टपरीधारकांनी अतिक्रमण केले आहे. यामुळे आधीच अरुंद असलेल्या रस्त्यावर मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होते.
गेल्या वर्षी ऑक्टोंबर महिन्यात लक्ष्मी चौक परिसरात मोठ्या प्रमाणावर अतिक्रमणविरोधी कारवाई करण्यात आली होती. पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरण, वाहतूक विभाग व सार्वजनिक बांधकाम विभागाने संयुक्तपणे ही कारवाई केली होती. यात साडेसात हजार चौरस फुट बांधकामे जमीनदोस्त केली होती. त्यामुळे काही प्रमाणात रस्ता मोकळा झाला होता. मात्र अर्धीच कारवाई करून पीएमआरडीएचे पथक माघरी फिरले होते. मात्र त्यानंतर एकही कारवाई झालेली नाही. त्यामुळे कारवाई केलेल्या जागेवर पुन्हा दुकाने उभी राहिली आहेत. ही दुकाने रस्त्यावर येऊ लागल्याने वाहतूक कोंडीची समस्या आणखीन बिकट होत आहे.
समन्वयाचा अभाव
हिंजवडी परिसरातील रस्ते ताब्यात न आल्याने या ठिकाणी रुंदीकरणाची कामे अडली आहेत. परिणामी, रस्त्यांवर अतिक्रमण फोफावू लागले आहे. पीएमआरडीए, पीडब्ल्यूडी आणि स्थानिक पोलीस या विभागाचा समन्वय असणे आवश्यक आहे. पीएमआरडीने पत्रव्यवहार करूनदेखील पीडब्ल्यूडी विभागाकडून कारवाई होत नसल्याने हा प्रश्न दुर्लक्षित राहिलेला आहे.
या परिसरातील अतिक्रमणाबाबत सर्वेक्षण करण्यात आले आहे. आयुक्तांच्या आदेशानुसार कारवाई करण्यात येणार आहे. त्याबाबत लवकरच बैठकही होणार आहे.
- मनीषा तेलभाते, तहसीलदार, अतिक्रमण विभाग, पीएमआरडीए
हिंजवडी येथून छत्रपती शिवाजी महाराज चौक या दिशेने जाणाऱ्या रस्त्यावर मोठ्या प्रमाणात कोंडी होते. या रस्त्यालगत वाहनेही उभी केली जातात. ही समस्या सोडवल्यास वाहने कोंडीत अडकणार नाहीत.
- सुरज केंद्रे, आयटी अभियंता, हिंजवडी
© Civic Mirror - Lexicon Broadcasting.
Licensor - Bennet and Coleman Co Ltd.