Pimpri Chinchwad: तक्रारी कसल्या करता, पाणी जपून वापरा

शहरात उन्हाळ्याची तीव्रता वाढू लागल्याने पिण्याच्या पाण्याच्या तक्रारी वाढत आहेत. महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाकडे वेगवेगळ्या भागात पिण्याच्या पाण्यात तक्रारी वाढू लागल्या आहेत.

संग्रहित छायाचित्र

निवारण नव्हे तक्रारदारांनाच केली दटावणी, महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाचे तक्रारदार सोसायट्यांना पत्र, पाणी मीटरनुसार पुरवठ्याचा जोडला तक्ता

विकास शिंदे
शहरात उन्हाळ्याची तीव्रता वाढू लागल्याने पिण्याच्या पाण्याच्या तक्रारी वाढत आहेत. महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाकडे वेगवेगळ्या भागात पिण्याच्या पाण्यात तक्रारी वाढू लागल्या आहेत. पाणीपुरवठा कमी दाबाने होतोय, पुरेशा व उच्च दाबाने पाणी येत नाही. दिवसाआड पाणी येत असल्याने पाण्याची वेळ वाढवा, आम्हाला सरासरीपेक्षा कमी पाणी दिले जातेय, यासह अनेक तक्रारी शहरातील विविध सोसायटींकडून येऊ लागल्या आहेत. त्यामुळे पाणीपुरवठा विभागाने या सोसायट्यांच्या तक्रारींचे निवारण न करता उलट त्यांनाच पाणी काटकसरीने वापरण्याचे आवाहन केले आहे. पिण्याचे पाणी काटकसरीने व जपून वापरावे, पाण्याचा अपव्यय टाळावा, उन्हाळा असल्याने सोसायटी सभासदांत जागरुकता करून पाण्याची बचत करावी, असा सूचनावजा पत्र पाणीपुरवठा विभागाकडून दिले जात आहे.

पिंपरी-चिंचवड शहराला पवना आणि आंद्रा धरणातून पाणीपुरवठा केला जात आहे. धरणातील सध्याचा पाणीसाठा पाहता शहराला जूनअखेरपर्यंत पाणीसाठा पुरेल. मात्र, उन्हाची तीव्रता वाढू लागल्याने पाण्याची मागणी वाढत आहे. त्यामुळे शहरात पिण्याच्या पाण्याच्या तक्रारी वाढत चालल्या आहेत. शहरात सध्या दिवसाआड पाणीपुरवठा सुरू आहे. तरीही शहरातील विविध भागातून पाणीटंचाई जाणवू लागली आहे. अनेक सोसायट्यांमधून पाणीपुरवठा कमी होत असल्याच्या तक्रारी येत आहेत. काही सोसायटींनी पाण्याची वेळ वाढवावी, पिण्याचे पाणी पुरेशा व उच्च दाबाने करावे, म्हणून सोसायटींतील नागरिकांच्या तक्रार येत आहेत.  

महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाकडून प्रत्येक सोसायटीच्या तक्रारीची शहानिशा केली जात आहे. पाणीपुरवठा कमी होतोय का, हे पाहून पाणीपुरवठ्याच्या विहित मानांकनानुसार पुरेसे पाणी पुरवठा आहे का, त्यांना मीटर रीडिंगप्रमाणे सरासरीने किती पाणीपुरवठा केला आहे, त्यांचा तक्ता सोसायटी सभासदांना दिला जात आहे. तसेच आपल्या सोसायटीअंतर्गत काही त्रुटी आहेत का, त्या तपासून घ्याव्यात, भूमिगत टाक्या, टेरेसवरील टाक्यांची गळती, सोसायटीअंतर्गत नेटवर्कमधील गळती, याची पाहणी करावी, त्यात काही त्रुटी असतील तर योग्य त्या उपाययोजना सोसायटीकडून कराव्यात. सोसायटीअंतर्गत असलेल्या एसटीपी आणि बोअरवेलचे पाणी हे टाॅयलेट फ्लशिंग, उद्यान, तत्सम कामासाठी पिण्याचे पाण्या व्यतिरिक्त इतर पाण्याचा वापर करावा, जेणेकरून पाण्याची बचत होईल. याशिवाय उन्हाळा सुरू झाल्याने सोसायटी स्तरावर पाणी काटकसरीने व जपून वापरण्याबाबत सोसायटी सभासदांमध्ये जागरुकता करावी, त्यामुळे सोसायटीत पाण्याचा तुटवडा निर्माण होणार नाही. तथापि, महापालिका जलवाहिनी नेटवर्क, मनपा जलशुध्दीकरण केंद्र निगडी, चिखली आणि महावितरण कंपनीच्या विद्युत यंत्रणेत, पाटबंधारे विभागातील धरण क्षेत्रातील यंत्रणेमधील अचानक काही त्रुटी, दोष निर्माण झाल्यास संबंधित शासकीय संस्थांनी दुरुस्ती व सुधारणा कामे हाती घेणे अत्यावश्यक आहे. त्यामुळेच सदरची कामे करण्यासाठी तांत्रिक कारणास्तव पाणी पुरवठा बंद ठेवावा लागतो. यामुळे पाणी पुरवठा अनियमित, विस्कळीत राहतो.

दरम्यान, विविध कारणास्तव पाणी पुरवठा खंडीत झाल्यास किमान एक ते चार दिवसांपर्यंत पाणीपुरवठा विस्कळीत व अनियमित राहतो. तर महापालिका शट डाऊनमुळे पाणीपुरवठा सुरळीत व नियमित होण्यास कधी कधी आठवडा लागू शकतो. या कालावधीत सोसायटीधारकांनी महापालिकेस सहकार्य अपेक्षित आहे. तरीही महापालिकेकडून शहरात पाणीपुरवठा पुरेसा करण्यासाठी नेहमीच प्रयत्नशील राहील, असेही महापालिकेने दिलेल्या पत्रकात म्हटले आहे. 

 

Join Civic Mirror Whatsapp Group for Latest Update

Share this story

Latest