ग्रेडसेपरेटरचा 'इन-आउट' मेळ, नागरिकांच्या आयुष्याशी खेळ
पंकज खोले
जुन्या पुणे-मुंबई मार्गावर वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी दापोडी ते निगडी या टप्प्यात ग्रेड सेपरेटर उभारण्यात आला आहे. या माध्यमातून वाहनचालकांना अगदी कमी वेळात अंतर कापता येते. मात्र, सध्या सुरू असलेल्या या मार्गातील बदलामुळे नागरिकांना मनस्ताप होत आहे. या मार्गाची 'सीविक मिरर'च्या प्रतिनिधीने पाहणी केली असता, या मार्गातील 'इन' आणि 'आऊट' हे वाहनचालकाच्या दृष्टीने धोक्याचे असल्याचे दिसून आले. प्रत्यक्षात याला व्यवस्थेचा वापर उलट पद्धतीने होत असून 'इन' आणि 'आऊट' हे नावालाच असल्याचे स्पष्ट झाले आहे.
या मार्गातून बाहेर पडण्यासाठी आवश्यक असलेले 'इन' आणि 'आउट' मार्ग परस्पर बदलण्यात येत आहे. मात्र, वाहनचालक जेथे 'आऊट' आहे तेथून 'इन' तर, जेथे 'इन' आहे तिथून 'आऊट' होत आहेत. या कारभारामुळे बीआरटी मार्गाला मोठा अडथळा निर्माण झाला असून, यामुळे ग्रेड सेपरेटरच्या मूळ उद्देशाला हरताळ फासली जात आहे. विशेष म्हणजे वाहतूक नियोजनमध्ये पीएमएलचा बीआरटी विभाग आणि शहरातील वाहतूक पोलिसांना खरेच सामावून घेतले आहे का, अशी शक्यता व्यक्त करण्यात येत आहे.
शहरातील या रस्त्याकडे प्रामुख्याने सुरक्षित आणि सोयीस्कर म्हणून पाहिले जायचे. पिंपरीपासून ते निगडीपर्यंत अगदी विना अडथळा आणि कमी वेळेत वाहन पोहोचत होते. त्यानंतर मेट्रोच्या कामामुळे या ग्रेड सेपरेटर तोडण्यात आले होते. त्यामुळे अडथळे निर्माण झाल्याने मार्गावर त्याचा परिणाम झाला होता. आता मेट्रोची कामे पूर्ण झाली आहेत. यानंतर महापालिकेने या मार्गाचा सर्व्हे केला होता. मात्र, अद्यापही या मार्गातील त्रुटी दूर झाल्या नाहीत. उलटपक्षी मेट्रोनंतर या मार्गातील वाहतूकीच्या समस्या आणि अडचणींत वाढ झाली आहे. या मार्गाची पाहणी केली असता, आकुर्डी या चौकातून पुढे टिळक चौकात जाण्यासाठी तीन आऊट होते. पण, ग्रेड सेपरेटर आत येण्यास 'इन' नसल्याने टिळक चौकाच्या अलीकडे 'आउट' बंद करून 'इन' मार्ग करण्यात आला. प्रत्यक्षात वाहनचालकांना निगडी प्राधिकरण अथवा संभाजीनगर या ठिकाणी जावयाचे असल्यास पुलाच्या अलीकडून बाहेर पडावे लागते. मात्र, चांगला मार्ग सोडून जवळपास अर्धा किलोमीटर सेवा रस्त्यावर यावे लागते. परिणामी, या ठिकाणी बाहेर पडणारी वाहनांची संख्या तुलनेने अधिक आहे. त्यामुळे ग्रेड सेपरेटर असूनही वाहनांच्या रांगा लागतात.
प्रत्यक्षात या ग्रेड सेपरेटरमध्ये बदल केल्यानंतर अपघातांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. तसेच, येत्या पावसाळ्यात या मार्गावर पाणी साचून वाहतूकीचा खोळंबा होतो. याबाबत कार्यवाही करणे अपेक्षित असताना महापालिका 'इन' आणि 'आउट' बदलण्याच्या भानगडीत पडत आहे. यामुळे वाहतूक कोंडी सुटेल अन् वाहन चालकांना शिस्त लागेल असे सांगण्यात येते. प्रत्यक्षात मात्र या बदलामुळे वाहनचालकांना मनस्ताप सहन करावा लागणार आहे.
मार्गातील दुभाजकाची तोडफोड; सळई बाहेर
काहीच महिन्यापूर्वी निगडी उड्डाणपुलाच्या अलीकडचा बाहेर पडणारा मार्ग बंद करण्यात आला. या मार्गात सलग तीन आऊट असल्याने एक मार्ग बंद करण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे. मात्र, याच मार्गातून बाहेर पडणाऱ्या वाहनांची संख्या सर्वाधिक आहे. या ठिकाणी बांधण्यात आलेल्या दुभाजकाची वाहने वळण घेत असताना तोडफोड झाली आहे. त्यातून लोखंडी सळई बाहेर आली आहे. त्यामुळे भविष्यात या ठिकाणी अपघात होण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे. याबाबत वाहनचालकांमधून संतप्त प्रतिक्रिया उमटत आहेत. सोयीस्कर वळण असलेल्या रस्ता बंद केल्याने पुढे वळसा घालून अर्धा ते एक एक किलोमीटर अंतर वाढत असल्याचे वाहनचालक सांगतात.
एकाच ठिकाणी 'इन' आणि 'आऊट'
निगडीपासून दापोडीच्या रस्त्यावर चिंचवड स्टेशन येथून बाहेर पडताना 'इन' दिला आहे. मात्र, त्याचा दुभाजक तुटलेल्या अवस्थेत असून, सद्यस्थितीत या मार्गाचा 'इन' आणि 'आऊट' अशा दोन्ही प्रकारे वापर वाहनचालकांकडून होत आहे. प्रत्यक्षात पुढे मोरवाडी चौकाच्या अलीकडे असलेल्या 'आऊट' मार्गाचा वापर अगदीच कमी होत असल्याचे निदर्शनास आले.
असा होणार बदल
निगडी ते दापोडीच्या दिशेने जाणारा मार्ग
एम्पायर इस्टेट उड्डाणपूल या ठिकाणी असणारा 'इन' हा 'आऊट' केला जाणार आहे.
फुगेवाडीच्या जवळ असणारा 'आऊट' बंद करण्यात येणार आहे
फिनोलेक्स चौक अलीकडे असलेला 'आऊट' बदलून तो 'इन' केला जाणार आहे
दापोडी ते निगडीच्या दिशेने जाणारा मार्ग
वल्लभ नगरच्या उड्डाणपूलाच्या अलीकडे असलेला मार्ग केवळ 'इन' ठेवण्यात येणार आहे
गंगानगर रस्त्याच्या दिशेने असणारा 'आऊट' हा मार्ग मूळ जागेपेक्षा १०० मीटरने मागे घेण्यात येणार आहे.
दापोडी बीआरटीजवळ असलेला मार्ग बंद असून तो सुरू करण्यात येणार नाही
© Civic Mirror - Lexicon Broadcasting.
Licensor - Bennet and Coleman Co Ltd.