Pimpri-Chinchwad Ganeshotsav 2024: गणेशोत्सवात भाविकांचा प्रवास खड्ड्यातूनच, दुरुस्त रस्ते दोन दिवसांत उखडले

लाडक्या बाप्पाच्या आगमनाने पिंपरी चिंचवडकरांचा आनंद द्विगुणीत झालेला असताना, रस्त्यावरील बुजवलेले खड्डे, अर्धवट टाकलेली माती, मुरुम आणि खडी काही तासांत उखडली आहे. यामुळे अशा खड्डेमय मार्गातून बाप्पांना घरी न्यावे लागणार आहे.

  • By PuneMirror Bureau
  • Reported By Desk User
  • Sat, 7 Sep 2024
  • 07:45 pm
Civic Mirror, सीविक मिरर, Pune Mirror, Pune Times Mirror, Pune, Pune News

गणेशोत्सवात भाविकांचा प्रवास खड्ड्यातूनच, दुरुस्त रस्ते दोन दिवसांत उखडले

सणासुदीमुळे घाईत खडी, माती, पेविंग ब्लॉक, मुरमाचा वापर

लाडक्या बाप्पाच्या आगमनाने पिंपरी चिंचवडकरांचा आनंद द्विगुणीत झालेला असताना,  रस्त्यावरील बुजवलेले खड्डे, अर्धवट टाकलेली माती, मुरुम आणि खडी काही तासांत उखडली आहे. यामुळे अशा खड्डेमय मार्गातून बाप्पांना घरी न्यावे लागणार आहे.

महापालिकेच्या अकार्यक्षमतेमुळे यंदाही बाप्पांचे आगमन खड्ड्यातून झाले. विशेष म्हणजे आयुक्तांच्या आदेशांना शहरातील ठेकेदारांनी एकप्रकारे केराची टोपली दाखवली आहे. 

शहरातील बहुतांश रस्त्यांवर अद्यापही खड्डे कायम आहेत. शनिवारी गणेशोत्सव साजरा करण्यासाठी बाहेर पडलेले भाविक, नागरिकांना या खड्ड्यांतून प्रवास करावा लागणार आहे. खरेदी आणि बाप्पाला घरी नेताना याच खड्ड्यातून मार्ग काढावा लागेल. 

आयुक्तांनी स्पष्ट आदेश देऊनही डांबरीकरणाऐवजी खडी, मुरुम, माती, पेव्हिंग ब्लॉक, कोल्डमिक्स, कॉंक्रिटच्या साहाय्याने खड्डे बुजवून रस्त्यांची डागडुजी केली आणि काही ठिकाणी सुरू आहे. पावसामुळे डांबरीकरणास अडथळे येत असल्याचे कारण सांगत सगळीकडे खड्डे बुजवण्याची घाई सुरू आहे. प्रत्यक्षात सकाळी बुजवलेला खड्डा पुन्हा सायंकाळी उखडलेला दिसून येत आहे.

जलवाहिन्या, सांडपाणी वाहिन्या टाकण्यासाठी महापालिकेने अनेक रस्ते खोदले होते. अद्यापही काही ठिकाणी मोठ्या प्रमाणावर खोदाई सुरू आहे. समाविष्ट गावांमध्ये आजही ही कामे सुरू आहेत. शिवाय, नागरिकांनीही खासगी कामासाठी अनेक ठिकाणी रस्ते खोदले आहेत. शिवाय, बीआरटी मार्गांवरील बसथांबे आणि स्मार्ट सिटीअंतर्गत बसथांब्यांवर लावलेल्या जाहिरात फलकांना वीजपुरवठा करण्यासाठीही रस्त्यांवर आडवे चर खोदून वीजवाहिन्या टाकल्या आहेत. मात्र, अनेक ठिकाणचे चर व्यवस्थित बुजवलेले नाहीत.

दुसरीकडे, उपनगरातही अंतर्गत भागात मोठ्या प्रमाणावर खड्डे पडले आहेत. काही व्यापाऱ्यांनी स्वतः खर्च करून खड्ड्यावरती माती, मुरुम, राडाराडा टाकला. मात्र, त्यामुळे रस्ते अधिकच निसरडे झाले होते. काही ठिकाणी माती निघून गेल्याने पुन्हा त्याच ठिकाणी मोठे खड्डे पडले. खोदकामांच्या ठिकाणी पक्के डांबरीकरण केलेले नव्हते. पावसामुळे रस्त्यांचे डांबरीकरण करणे अशक्य आहे. परिणामी, केवळ खड्डे बुजवण्यावर महापालिकेने भर दिला आहे.

महत्त्वाच्या मार्गावरही तीच रड
गणेशोत्सवात शहरातील महत्त्वाच्या मिरवणुका पिंपरी, चिंचवड, भोसरी, सांगवी, वाकड, दापोडी, थेरगाव, आकुर्डी-निगडी प्राधिकरण भागात निघतात. दापोडी, सांगवीतील मंडळे मुळा व पवना नदीमध्ये मूर्ती विसर्जन करतात. याच मार्गावर छोटे, मोठे मिळून असे भरपूर खड्डे पडले आहेत. यापैकी काही खड्डे बुजवूनदेखील पुन्हा खड्डे पडले आहेत पिंपरीतील सुभाषनगर घाट, पिंपरी गाव घाट, चिंचवडमधील मोरया घाटावर विसर्जन करतात. प्राधिकरणातील मंडळे गणेश तलाव, भोसरीतील मंडळे इंद्रायणी नदी किंवा विहिरीत मूर्ती विसर्जन करतात.

बाजारपेठात तात्पुरती डागडुजी
पिंपरी-चिंचवड शहरातील खरेदीसाठी नागरिक पिंपरी, काळेवाडी, चिंचवड स्टेशन, डांगे चौक, आकुर्डी येथे जातात. मात्र, या ठिकाणी पडलेल्या खड्ड्यांवर तात्पुरती डागडुजी करण्यात आली होती. शुक्रवारी पडलेल्या हलक्या पावसामुळे त्यावरील माती वाहून गेली. त्यामुळे खरेदी करतानाही खड्ड्यांचा त्रास सहन करावा लागला.

डागडुजीचा दिखावा
ठिकठिकाणी रस्त्यावर पडलेल्या खड्ड्याबाबत क्षेत्रीय अधिकाऱ्यांनी संबंधित उप अभियंतांना सूचना केल्या होत्या. त्यानंतर नेमलेल्या ठेकेदाराकडून ऐन पावसात तर, वाहनांची वर्दळ असलेल्या ठिकाणी घाईमध्ये खड्डे बुजवण्यात आले. त्यानंतर त्याची माहिती संबंधित अधिकाऱ्यांना देण्यात आली. त्यामुळे केवळ दिखाव्यासाठी ही डागडुजी केल्याचे दिसून आले.

या खड्ड्यांमुळे अपघाताची शक्यता नाकारता येत नाही. खड्डे इतके आहेत की, त्यामधून मार्ग काढणे वाहनचालकांना जीकिरीचे जात आहे. खड्ड्यात वाहने आदळून वाहनांचेही नुकसान होत आहे. शिवाय किरकोळ अपघातात अनेक वाहनचालक जखमी झाले आहेत. या खड्ड्यांत आदळून, हादरे बसून पीएमपी प्रवासी त्रस्त झाले आहेत. दापोडी, नाशिक फाट्यावर तर रस्त्यात खड्डे आहेत की, खड्ड्यांत रस्ता आहे हेच समजत नाही. याबाबत महापालिकेच्या संबंधित अधिकाऱ्यांशी संपर्क साधला असता, त्यांनी वरिष्ठांशी बोला असे सांगितले. 

पावसामुळे डांबर उखडत असून रस्त्यावरील खड्डे बुजविण्याच्या सूचना दिलेल्या आहेत. लवकरच खड्डे बुजवले जातील, असे उत्तर शहर अभियंता मकरंद निकम यांनी दिले .

बीआरटी मार्गावर चालकांची कसरत
शहरात रस्त्यावर खड्डे बुजवण्याचे काम सुरू आहे. सार्वजनिक वाहतूक म्हणून प्रवाशांना सेवा बीआरटी मार्गावरील खड्ड्यांकडे दुर्लक्ष झाले आहे. शहरात चार बीआरटी मार्ग सुरू आहेत. या मार्गामध्ये खड्डे पडले असून, त्यातूनच प्रवाशांना प्रवास करावा लागत आहे. प्रवास करताना बस चालकाला मोठी कसरत करावी लागत आहे. एवढेच नाही तर, पीएमपी बस खड्ड्यांमध्ये आदळून प्रवाशांचे कंबरडे मोडत आहे. दापोडी ते निगडी बीआरटी मार्गावर पीएमपी बसची सतत वर्दळ असते. त्याचप्रमाणे किवळे ते औंध आणि काळेवाडी देहू आळंदी या मार्गाचा मोठ्या प्रमाणात वापर प्रवासी करतात.  सकाळ आणि सायंकाळी प्रवास करणाऱ्या विद्यार्थी, कामगारांची संख्या बरीच आहे. मात्र, या मार्गावरील खड्ड्यांमुळे बसचालकांचीही तारांबळ उडत आहे. वेगवान प्रवासासाठी उभारलेला हा बीआरटी मार्ग खड्ड्यांमुळे अडथळ्याचा ठरू लागला आहे.

Join Civic Mirror Whatsapp Group for Latest Update

Share this story

Latest