पिंपरी-चिंचवड: सांगवीतील उद्यानांमध्ये दुरवस्थांचा 'खेळ'

महापालिकेच्या सांगवी येथील संत शिरोमणी सावता माळी उद्यानाची दुरवस्था झाली आहे. उद्यानामधील लहान मुलांची खेळणी व बसण्यासाठी असणारी काही बाकेही तुटली आहेत. ज्येष्ठ नागरिकांसह बच्चे कंपनीचा हिरमोड होत आहे.

Parks in Sangvi

सांगवीतील उद्यानांमध्ये दुरवस्थांचा 'खेळ'

'अस्वच्छ' स्वच्छतागृह, कचरा, झाडांकडे दुर्लक्ष अन् तुटकी खेळणी

विकास शिंदे
महापालिकेच्या सांगवी येथील संत शिरोमणी सावता माळी उद्यानाची (Sant Shiromani Savata Mali Udyan) दुरवस्था झाली आहे. उद्यानामधील लहान मुलांची खेळणी व बसण्यासाठी असणारी काही बाकेही तुटली आहेत. ज्येष्ठ नागरिकांसह बच्चे कंपनीचा हिरमोड होत आहे. उद्यानातील पुरेशा देखभालीअभावी झाडे सुकू लागली आहेत. सर्वत्र गवत उगवले असून मैदानात झुडपे तयार झाली असून खेळणी तुटली आहेत. त्याचप्रमाणे जागोजागी कचरा पसरला आहे. त्यामुळे उद्यानात येणाऱ्या अबालवृध्दासह नागरिक संताप व्यक्त करत आहेत.

पिंपरी-चिंचवड (Pimpri-Chinchwad) शहरात उद्यानांची संख्या सर्वाधिक आहे. काही उद्याने सोडल्यास अनेक लहान-सहान उद्यानांकडे पालिका उद्यान विभागाचे अक्षम्य दुर्लक्ष होत आहे. अनेक उद्यानांना अवकळा आली आहे. अशीच अवस्था सांगवीतील संत शिरोमणी सावता माळी उद्यानाची झाली आहे. हे उद्यान सांगवी आणि पिंपळे गुरव परिसरातील ज्येष्ठ नागरिक, महिला, लहान मुलांच्या विरंगुळ्यास उपयुक्त ठरत आहे. सध्यस्थितीत उद्यानाची झालेली दुरावस्था पाहून नागरिक नाराजी व्यक्त करत आहेत. उद्यानातील लहान मुलांच्या खेळण्यांची प्रचंड दुरवस्था झाली आहे. झोके नादुरुस्त अवस्थेत आहेत. त्यामुळे खेळण्यास येणाऱ्या लहान मुलांचा हिरमोड होत आहे. मैदानावर गवत, झुडपे उगवली आहेत. त्याच ठिकाणी सांडपाणी डबक्यात साचत आहे. त्या पाण्याने दुर्गंधी सुटली आहे. त्या पाण्यामुळे डासांची उत्पत्ती होऊन सायंकाळी नागरिकांना मच्छरचा प्रचंड त्रास होत आहे.  उद्यानात जागोजागी कचरा पसरल्याचे दिसत आहे. उद्यानाची देखभाल दुरुस्ती करणाऱ्या ठेकेदारांकडून काहीच कामे होताना दिसत नाहीत. उद्यानाची योग्य देखभाल दुरुस्ती होत नसल्याचे दिसून येत आहे.

खेळणी तुटली, मुलांच्या जीवितास धोका

संत शिरोमणी सावता माळी उद्यानात महापालिकेने बसवलेली सर्व खेळणी तुटलेली आहेत, तर लहान मुलांना खेळण्यासाठी बसवलेले काही साहित्य मोडकळीस आलेले आहे. उद्यानात लहान मुले-मुली खेळण्यास येतात. कुतूहलापोटी एखादे लहान मूल त्या खेळण्याच्या साहित्यावर पडल्यास त्याला इजा होऊ शकते. हाता-पायाला देखील जखमा होऊ शकतात.  त्याचप्रमाणे साचलेल्या पाण्यामध्ये डासांची उत्पत्ती होऊन डेंग्यूसारख्या आजारालादेखील निमंत्रण देत आहे.

संत शिरोमणी सावता माळी उद्यानाची दयनीय अवस्था झाली आहे. सध्या शाळांच्या परीक्षा संपून सुट्टी लागली आहे. दररोज लहान मुले उद्यानात खेळण्यास येत असतात. अबालवृध्द नागरिक देखील फिरण्यास येत असतात, पण उद्यानांची तुटलेली खेळणी, अस्वच्छता, वाढलेले गवत आणि सुकलेली झाडे पाहून नागरिकांसह लहान मुलांचा हिरमोड होत आहे. त्यामुळे उद्यानातील खेळणी तत्काळ बदलण्यात यावी. मैदानाची झालेली दुरवस्था दूर करावी, याबाबत पालिका उद्यान विभागप्रमुखांना पत्र देऊन तत्काळ उद्यान सुसज्ज करा
- अमित पसरणीकर,  सामाजिक कार्यकर्ता

उन्हाळ्यामुळे झाडांची पानगळ सुरू आहे. त्यामुळे उद्यानात अस्वच्छता दिसत आहे. पण, उद्यानाची साफसफाई दररोज केली जात आहे. लहान मुलांची खेळणी नादुरुस्त झाली आहे. ती सर्व खेळणी तातडीने बदलून नवीन अथवा दुरुस्ती करण्याच्या सूचना केल्या आहे. त्यानुसार दोन दिवसात लहान मुलांची सर्व खेळणी दुरुस्ती केली जातील. उद्यानातील वाढलेली झुडपे, गवत देखील काढण्यात येईल
-  रविकांत घोडके, उपायुक्त, उद्यान विभाग, महापालिका, पिंपरी-चिंचवड

Join Civic Mirror Whatsapp Group for Latest Update

Share this story

Latest