पिंपरी-चिंचवड: अखेर अनधिकृत बांधकामांवर बुलडोझर; 'सीविक मिरर'च्या वृत्ताची दाखल घेत १३ रो हाऊस आणि ३ पत्राशेडवर केली कारवाई

महापालिका हद्दीतील बोऱ्हाडे वाडी (मोशी) येथील इंद्रायणी नदी पात्रालगत पुररेषेत विना परवाना रो हाऊस बंगलो बांधण्यात आले होते. पुररेषेत बांधलेल्या घरांबाबत हरित लवादाकडे तक्रार करण्यात आल्या होत्या. महापालिकेने मंगळवारी (२१) १३ रो हाऊस बंगलो, ४ पत्राशेडवर आणि एका तीन मजली बंगल्यावर बुलडोझर फिरवत अनधिकृत बांधकामे जमीनदोस्त केली आहेत.

अखेर अनधिकृत बांधकामांवर बुलडोझर; 'सीविक मिरर'च्या वृत्ताची दाखल घेत १३ रो हाऊस आणि ३ पत्राशेडवर केली कारवाई

विकास शिंदे

महापालिका हद्दीतील बोऱ्हाडे वाडी (मोशी) येथील इंद्रायणी नदी पात्रालगत पुररेषेत विना परवाना रो हाऊस बंगलो बांधण्यात आले होते. पुररेषेत बांधलेल्या घरांबाबत हरित लवादाकडे तक्रार करण्यात आल्या होत्या. महापालिकेने मंगळवारी (२१) १३ रो हाऊस बंगलो, ४ पत्राशेडवर आणि एका तीन मजली बंगल्यावर बुलडोझर फिरवत अनधिकृत बांधकामे जमीनदोस्त केली आहेत. दरम्यान, पुररेषेतील विनापरवानगी बांधकामाचे वृत्त 'सीविक मिरर'ने दिले होते. त्यावर महापालिका आयुक्त शेखर सिंह यांनी दखल घेऊन ही कारवाई केली आहे.

मोशीतील बोऱ्हाडे वाडी येथील स्वदेशा सोसायटीच्या पाठीमागील बाजूला इंद्रायणी नदी पात्रालगत बेकायदेशीर प्लाॅटींग करण्यात आले होते. सर्वसामान्य नागरिकांना २० ते २५ लाख रुपये गुंठ्याने जागा खरेदी करत त्या जागेवर १३ रो हाऊस बंगलो उभारण्यात आले होते. इंद्रायणी नदी पात्राच्या ब्लू लाईनमध्ये हे सर्व बंगले येत होते. पुररेषेत विना परवानगी सर्व बांधकामे होत असताना महापालिकेच्या अधिकारी डोळ्यावर पट्टी बांधून झोपेचे सोंग घेतले होते. नागरिकांना सदरचा प्लाॅट हा ग्रीन झोनमधून आर झोन झाला असून रेसीडेन्सील असल्याची जाहिरात करुन फसवणूक केली आहे.

पिंपरी-चिंचवड शहरातील कामगार, कष्टकरी, सर्वसामान्य नागरिकांनी ही घरे बांधली होती. आर झोन असल्याचे भासवून इंद्रायणी नदी पात्रात तसेच पुररेषेतच अर्धा, एक, दोन गुंठ्यांचे छोटे भुखंड तयार केले. ते भूखंड सर्वसामान्य नागरिकांनी विकत घेत त्या जागेवर घरे बांधली होती. पुररेषेत सर्व बेकायदेशीर प्लाॅटींगची विक्री झालेल्या जागेवर विनापरवानगी घरे बांधली.  आतापर्यंत १३ रो हाऊस तयार झाले होते. मात्र, काही जागा मालकांनी जागा घेऊन ठेवले होते. पण, त्या जागेवर बांधकामे केली नव्हती. त्या सर्व १३ रो हाऊस बंगलो, ३ पत्राशेड, एका तीन मजली इमारतीच्या सर्व आरसीसी बांधकामे बुलडोझर फिरवत जमीनदोस्त करण्यात आली आहेत.

निळ्या पूररेषेतील १८ हजार चौरस फूट बांधकामे निष्कासन

महापालिकेच्या 'क' क्षेत्रिय कार्यालयांतर्गत प्रभाग क्र.२ बोऱ्हाडेवाडी येथील गट क्र.२३३ व २३४ इंद्रायणी नदीपात्रातील निळ्या पूररेषेतील सुमारे १८ हजार चौरस फूटाची अनधिकृत बांधकामे निष्कासन करण्यात आली. या कारवाईसाठी महापालिकेने दोन पोकलेन, तीन जेसीबी यांच्या सहाय्याने केलेल्या कारवाईत नऊ दोन मजली बांधकाम, दोन तळमजल्यापर्यतची बांधकाम, दोन जोत्यापर्यंत बांधकामे अशी एकुण १२ हजार चौरस फुटांची आर.सी.सी. बांधकामे आणि चार पत्राशेडची एकूण ६ हजार चौरस फुट अशा १८ हजार चौरस फूटांचे विनापरवानगी बांधकाम पाडण्यात आली. आयुक्त शेखर सिंह यांच्या निर्देशानुसार अतिरिक्त आयुक्त प्रदीप जांभळे पाटील, शहर अभियंता मकरंद निकम यांच्या मार्गदर्शनाखाली कारवाई करण्यात आली. यावेळी अतिक्रमण  उप आयुक्त मनोज लोणकर, आण्णा बोदडे, उप अभियंता सूर्यकांत मोहिते,कनिष्ठ अभियंता संदीप वैद्य,किरण सगर, बीट निरीक्षक श्रीकांत फाळके त्याचप्रमाणे भोसरी एम.आय.डी.सी. पोलीस स्टेशनचे गणेश जामदार, किरण पठारे, ३० पोलीस कर्मचारी, महाराष्ट्र राज्य सुरक्षा महामंडळाचे २२ सुरक्षा रक्षक,अतिक्रमण आणि अग्निशामक पथकाचे जवान, वैद्यकीय विभागातील रूग्णवाहिकेचा समावेश होता.

हरित लवादाकडे होती तक्रार

इंद्रायणी नदी पात्राच्या ब्लू लाईन, रेड लाईनमध्ये बेकायदेशीर प्लाॅटींग करुन जागेची विक्री करण्यात आली. त्या जागेवर आता १० ते १३ रो हाऊस बांधण्यात आली. काही ठिकाणी पत्राशेड करण्यात आला. आणखी काही जागेवर घरे बांधण्यासाठी जागा विकत घेतलेले लोक वेट अॅन्ड वाॅच च्या भूमिकेत आहेत. इंद्रायणी नदीच्या निळ्या पुररेषेत अतिक्रमण व अनधिकृत बांधकामामुळे नद्यांचे पात्र अरुंद होवू लागले होते.पावसाळ्यात नदी पात्रालगत लोकांना पुरस्थितीचा सामना करावा लागणार होता. याबाबत हरित लवादाकडे तक्रार करण्यात आलेली होती. मात्र, हरित लवादाचे आदेश येण्यापुर्वीच महापालिकेने बोऱ्हाडेवाडी येथील अनधिकृत बांधकामावर कारवाई केली आहे.

जाहिरातीतून लोकांची फसवणूक

बोऱ्हाडेवाडी, मोशीसारख्या परिसरातील लोकांनी जाहिरातीला बळी पडून लोकांनी जागा विकत घेतल्या आहेत. सदरची जागा पुर्वी ग्रीन झोन होती, ती जागा आता 'आर' झोन झाली आहे, अशी जाहिरात करुन संपुर्ण जागेची विक्री केलेली आहे. इंद्रायणी नदी पात्रालगत वाॅल कंपाऊड करुन त्या जागेवर माती, मुरुमचा भराव टाकण्यात आले. जागेचे ले-आऊट करुन रस्ते, पथदिव्ये, पाण्यासाठी बोअर, शाळा, रुग्णालये जवळ असल्याचे भासवून इंद्रायणी नदी a जागेची विक्री करुन लोकांची फसवणूक करण्यात आलेली आहे. तरीही लोकांनी जागेची खातरजमा न करता एक, दोन, तीन गुंठे जागा विकत घेतल्या आहेत. जागेच्या व्यवहारातून स्थानिकांनी करोडो रुपये कमावले, पण सर्वसामान्य नागरिकांची लाखो रुपयांचे रुपयांचे नुकसान झाले आहे.

नागरिकांचे लाखो रुपयाचे नुकसान

इंद्रायणी नदी पात्रात आणि पुररेषेतील प्लाॅट विकत घेणाऱ्या नागरिकांची फसवणूक झाली आहे. स्थानिकांनी पूररेषेत माती, मुरुमाचे भराव टाकत बेकायदेशीर प्लॉटिंग केले होते. त्या प्लाॅटींग जाहिरात करत रेसिडेन्सल असल्याचे भासवून नागरिकांना २० ते २५ लाख रुपये गुंठ्याने जागा विकल्या होत्या. त्यानंतर त्या जागेवर नागरिकांनी १३ रो हाऊसची बांधकामे केली होती. काहीचे प्लाॅट रिकामे ठेवले होते. महापालिकेने पुररेषेत येणारी सर्व अनधिकृत बांधकामे जमीनदोस्त केल्याने नागरिकांचे लाखो रुपयाचे नुकसान झाले आहे. त्यामुळे 'तुपही गेले आणि तेलही गेले, हाती धुपाटने आले' अशी गत जागा विकत घेवून अनधिकृत बांधकामे करणाऱ्या नागरिकांची झाली आहे. 

Join Civic Mirror Whatsapp Group for Latest Update

Share this story

Latest