पिंपरी-चिंचवड: काम पूर्ण होऊनही विद्युतदाहिनी बंदच, उद्घाटनासाठी महापालिका ताटकळली बड्या नेत्याच्या प्रतीक्षेत!
निगडीतील अमरधाम स्मशानभूमीत जुनी विद्युतदाहिनी वारंवार नादुरुस्त होत असल्याने मृतदेहांवरील अंत्यसंस्कारास विलंब होत आहे. त्यामुळे महापालिकेने नवीन विद्युतदाहिनी बसवली आहे. त्या विद्युतदाहिनीचे काम दोन महिन्यांपूर्वीच पूर्ण झाले. मात्र, एका बड्या राजकीय नेत्याच्या हस्ते उद्घाटन करण्याच्या अट्टहासापोटी विद्युतदाहिनी बंद ठेवण्यात आली आहे. यामुळे मृतदेहावर अंतिम संस्कार करण्यासाठी आलेल्या नागरिकांतून प्रचंड संताप व्यक्त होत आहे.
पिंपरी-चिंचवड महापालिकेने निगडीतील अमरधाम स्मशानभूमीत नवीन विद्युतदाहिनी बसवली आहे. त्या विद्युतदाहिनीचे काम दोन महिने झाले पूर्ण झाले आहे. मात्र, विद्युतदाहिनी उद्घाटन अभावी बंद ठेवण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे. सामाजिक कार्यकर्ते सचिन काळभोर यांनी महापालिका आयुक्त शेखर सिंह यांना विद्युतदाहिनी तत्काळ सुरू करण्यासाठी निवेदन दिले आहे. जुनी विद्युतदाहिनी वारंवार नादुरुस्त होऊ लागल्याने मृतदेहावर अंत्यसंस्कार करण्यास विलंब लागत होते. अनेक मृतदेहाची विटंबना झाल्याचे प्रकार देखील समोर आले होते. त्यामुळे नागरिकांना विनाकारण त्रास सहन करावा लागत होता. जुन्या विद्युतदाहिनी कॉईल नादुरुस्त असल्याने खूप गरम होऊ लागली होती. मृतदेहावर अंत्यसंस्कार करण्यास विलंब लागून नातेवाईकांना खूप वेळ ताटकळत बसावे लागत होते. त्या ठिकाणी नवीन विद्युतदाहिनी बसवण्यात यावी, अशी मागणी नागरिकांकडून केली जात होती.
महापालिका प्रशासन नवीन विद्युतदाहिनी बसवण्याचे काम दोन वर्षांपूर्वी सुरू केले होते. सध्या नवीन विद्युतदाहिनीचे काम पूर्ण झाले आहे. तरीही तिचा वापर सुरू करण्यात आलेला नाही. केवळ राजकीय नेते मंडळी यांच्या उपस्थितीत स्मशानभूमीतील विद्युतदाहिनीचे उद्घाटन कार्यक्रम घेण्यासाठी दोन महिन्यांपासून खटाटोप सुरू आहे. दरम्यान, नवीन विद्युतदाहिनी बंद असल्याने निगडी, गावठाण, यमुनानगर, त्रिवेणीनगर, तळवडे, चिखली, कुदळवाडी, आकुर्डी, प्राधिकरण या ठिकाणच्या नागरिकांना गैरसोय होत आहे. अनेकांना निगडी भागातील अमरधाम स्मशानभूमी ठिकाण मृत व्यक्तीवर अंत्यसंस्कार करण्यासाठी सोयीचे आहे. नागरिक अंत्यसंस्कार करण्यासाठी येतात, पण नवीन विद्युतदाहिनी सुरू न केल्याने मृतदेह घेऊन आलेल्या नागरिकांना ताटकळत बसावे लागत आहे.
"निगडी गावठाण, यमुनानगर, त्रिवेणीनगर, तळवडे, चिखली, कुदळवाडी, मोशी, आकुर्डी, प्राधिकरण या परिसरातील नागरिक या स्मशानभूमीत अंत्यसंस्कारासाठी येतात. जुन्या विद्युत दाहिनीवर कॉईल नादुरुस्त झाल्याने अंत्यसंस्कारास विलंब लागत असून नागरिकांना मनस्ताप सहन करावा लागत आहे. नवीन विद्युतदाहिनीचे काम पूर्ण झाले आहे. त्या कामाच्या उद्घाटनासाठी राज्यातील वरिष्ठ नेत्यास बोलविण्यात येणार आहे. त्यांची वेळ मिळत नसल्याने उद्घाटन रखडले आहे. त्यामुळे ही विद्युतदाहिनी गेल्या दोन महिन्यांपासून बंद स्थितीत आहे. त्यामुळे अंत्यसंस्कारासाठी येणाऱ्यांची गैरसोय होत आहे. नवीन विद्युतदाहिनी लवकर सुरू करावी."
- सचिन काळभोर, तक्रारदार नागरिक
© Civic Mirror - Lexicon Broadcasting.
Licensor - Bennet and Coleman Co Ltd.