पिंपरी-चिंचवड: सायकल ट्रॅकवर फेरीवाल्यांसह वाहनांचे अतिक्रमण; स्मार्ट सिटीचा पब्लिक शेअरिंग उपक्रम बासनात

स्मार्ट सिटी असलेल्या पिंपरी-चिंचवड शहरात महापालिकेने विविध रस्त्यांवर आठ सायकल ट्रॅक तयार केले आहेत. त्याकरिता कोट्यवधींचा निधी खर्च केला आहे. शहरातील आणखी रस्त्यांवर सायकल ट्रॅक बनवण्यात येत आहे. मात्र, सायकल ट्रॅकवर फेरीवाले, फोर व्हीलर यांचे अतिक्रमण होऊ लागले आहे.

सायकल ट्रॅकवर फेरीवाल्यांसह वाहनांचे अतिक्रमण

स्मार्ट सिटी असलेल्या पिंपरी-चिंचवड (Pimpri Chinchwad) शहरात महापालिकेने विविध रस्त्यांवर आठ सायकल ट्रॅक तयार केले आहेत. त्याकरिता कोट्यवधींचा निधी खर्च केला आहे. शहरातील आणखी रस्त्यांवर सायकल ट्रॅक बनवण्यात येत आहे. मात्र, सायकल ट्रॅकवर फेरीवाले, फोर व्हीलर यांचे अतिक्रमण होऊ लागले आहे. त्यामुळे स्वतंत्र व सुरक्षित रस्ता नसल्याने सायकलस्वारांना अडथळ्यांची शर्यत पार करावी लागत आहे.  

पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या (PCMC) वतीने शहरात विविध सायकल ट्रॅक तयार केले आहेत. शहरात आणखी काही सायकल ट्रॅक बनवले जाणार आहेत. त्यावर महापालिका कोट्यवधी रुपये खर्च करू लागली आहे. आतापर्यंत विविध रस्त्यांवर ७५ किलोमीटर अंतराचे सायकल ट्रॅक तयार झाले आहेत. शहरात ४५ मीटर व त्यापेक्षा अधिक रुंदीच्या रस्त्यांवर स्वतंत्रपणे सायकल ट्रक बनवले आहेत. काही ठिकाणी रस्ते अरुंद आहेत. त्या भागात लाल रंगाचे पट्टे मारून सायकल ट्रॅक तयार केले आहेत. हे सायकल ट्रॅक महापालिका आणि स्मार्ट सिटी कंपनीने तयार केले आहेत. शहरातील विविध रस्त्यांवर आठ ठिकाणी ७५ किलोमीटरचे सायकल ट्रॅक तयार केले. त्याशिवाय अर्बन स्ट्रीट डिझाईननुसार रस्ता विकसित करताना सायकल ट्रॅक देखील बनवला आहे. (Pimpri Chinchwad Smart City)

शहरात रस्त्यावर बनविलेले सायकल ट्रॅक हे एक सलग नसल्याने अनेक ठिकाणी सायकलस्वारांना अडथळ्यांची शर्यत पार करावी लागत आहे. सायकल ट्रॅकवर मध्येच अनेक ठिकाणी झाडे, बैठकीचे बाक, कठडे, डीपी बाॅक्स, दिव्यांचे खांब, फोर व्हीलर, टू व्हीलरसह उभी केलेली अन्य वाहने, छोटे फेरीवाले, फळ विक्रेते, दुकान- व्यावसायिकांचे साहित्य, कचऱ्याचे ढीग, नामफलक, तुटलेले चेंबर, उघड्या वीज वाहक केबल, अशा प्रकारचे अतिक्रमण सायकल ट्रॅकवर पाहावयास मिळत आहेत.

दरम्यान, महापालिकेने शहरात बनवलेले सायकल ट्रॅकवर खऱ्या अर्थाने सायकलस्वारांना अडथळ्यांची शर्यत पार करावी लागत आहे. सायकल सुरक्षितपणे चालवता येत नाही. त्यामुळे सायकल ट्रॅकवर केलेला कोट्यवधींचा खर्च वाया गेला का? अशी भावना सायकलस्वारांकडून व्यक्त करण्यात येत आहे.

स्मार्ट पब्लिक शेअरिंग बंद..

पिंपरी-चिंचवड स्मार्ट सिटी कंपनीने शहरात २०० पेक्षा अधिक ठिकाणी पब्लिक बायसिकल शेअरिंग उपक्रम राबवला होता. शहरातील अनेक चौका-चौकात स्मार्ट सायकल स्टॅण्ड तयार केले होते. स्मार्ट मोबाईलद्वारे भाडे भरल्यानंतर त्या सायकल चालवण्यास सुविधा होती. शेकडो सायकली उपलब्ध केल्याने हा उपक्रम यशस्वी होऊन नागरिकांना सायकल चालवण्याची आवड निर्माण होऊन आरोग्य सुदृढ बनवण्यास मदत होईल, अशी स्थिती होती. पण, त्या उपक्रमास चांगला प्रतिसाद मिळाला नाही. काही सायकलींची तोडफोड झाली. काही चोरीस देखील गेल्या. त्यामुळे स्मार्ट सिटीने तो उपक्रम तीन-चार महिन्यातच गुंडाळून ठेवला.

अतिक्रमणावर कारवाई नाही..

शहरात सायकल आणि पादचाऱ्यांसाठी महापालिकेने अर्बन स्ट्रीट डिझाईननुसार रस्ते विकसित केले जात आहे. नागरिकांना पायी चालता यावे, सायकलवर प्रवास करता यावा, याकरिता अर्बन स्ट्रीटने रस्ते विकसित होत आहेत. तसेच जवळच्या अंतरासाठी नागरिकांनी सायकल वापरावी, शहरातील वायू व ध्वनिप्रदूषण कमी होऊन स्वच्छ व शुध्द हवा निर्माण व्हावी, महापालिकेचा प्रयत्न आहे.  मात्र, सायकल ट्रॅकवर होणाऱ्या अतिक्रमणांवर कधीच कारवाई होत नाही. सायकल मार्गावरील अडथळे दूर केल्याशिवाय सायकलस्वारांना नीटपणे सायकल चालवता येणार नाही. याकरिता महापालिका अतिक्रमण करणाऱ्यांवर कारवाई कधी करणार, असा प्रश्न निर्माण होत आहे. (PCMC Cycle Tracks)

असे आहेत सायकल ट्रॅक

 सांगवी फाटा ते साई चौक

 नाशिका फाटा ते वाकड

 काळेवाडी फाटा ते एमएम स्कूल

 चिंचवड ते वाल्हेकरवाडी चौक

 केएसबी चौक ते कुदळवाडी

 एम्पायर इस्टेट ते ऑटो क्लस्टर चौक

 भक्ती शक्ती चौक ते रावेत पूल

 पिंपळे सौदागर ते पिंपळे गुरव चौक

"महापालिकेच्या लिनिअर गार्डन मार्गावर सायकल ट्रॅकवर सायकल चालविण्यास गर्दी होत आहे. लहान मुलासह ज्येष्ठ नागरिकांचादेखील प्रतिसाद मिळत आहेत. काही प्रशस्त रस्त्यावर सायकलस्वार दिसून येत आहेत. मात्र, काही सायकल ट्रॅकवर अतिक्रमण व अडथळा आहे. त्या मार्गावरील अतिक्रमणे लवकरच महापालिकेकडून काढण्यात येतील. नागरिकांना सायकल ट्रॅकवरील सर्व अडथळे दूर करून सुरक्षित सायकल चालविण्यासाठी सायकल मार्ग व्यवस्थित केले जातील."

-बापूसाहेब गायकवाड, कार्यकारी अभियंता, वाहतूक विभाग, पिंपरी-चिंचवड महापालिका.

Join Civic Mirror Whatsapp Group for Latest Update

Share this story

Latest