पिंपरी-चिंचवड: उष्णता वाढली, प्राणी संग्रहालयात 'ठंडा-ठंडा,कूल-कुल'

शहरातील वातावरण वाढलेली उष्णता, उन्हाळ्याच्या झळ्यांनी नागरिकांच्या अंगाची लाही लाही होवून सर्वजण उकाड्याने त्रस्त झाले आहे. सरपटणारे प्राणी, पशू-पक्ष्यांनाही उष्णतेच्या झळा बसू लागल्या आहेत.

उष्णता वाढली, प्राणी संग्रहालयात 'ठंडा-ठंडा,कूल-कुल'

प्राण्यांची घेतली जातेय विशेष काळजी, फॅन, कुलरसह मारला जातोय पाण्याचा फवारा

विकास शिंदे

शहरातील वातावरण वाढलेली उष्णता, उन्हाळ्याच्या झळ्यांनी नागरिकांच्या अंगाची लाही लाही होवून सर्वजण उकाड्याने त्रस्त झाले आहे. सरपटणारे प्राणी, पशू-पक्ष्यांनाही उष्णतेच्या झळा बसू लागल्या आहेत. त्यामुळे महापालिकेच्या संभाजीनगर येथील बहिणाबाई चौधरी प्राणी संग्रहालयात पशू-पक्षी व सरपटणाऱ्या प्राण्यांना गारवा निर्माण करण्यासाठी कुलर, टेबल फॅनसह पाणी मारुन थंडावा निर्माण केला जात आहे. यामुळे पशु- पक्षी आणि सरपटणाऱ्या  प्राण्यांना 'थंडा-थंडा, कुल-कुल' ची अनुभूती येत आहे.

केंद्रीय चिडिया घर प्राधिकरणाच्या देखरेखीखाली आणि राज्य प्राणी संग्रहालय प्राधिकरणात समाविष्ठ झालेले संभाजीनगर येथील बहिणाबाई चौधरी प्राणी संग्रहालय आहे. या प्राणी संग्रहालयात वन्यजीवांची उन्हाळ्यात विशेष काळजी घेतली जात आहे. महापालिकेच्या पशू वैद्यकीय विभागातंर्गत प्राणी संग्रहालयात वन्यजीव सरपटणाऱ्या प्राण्यांसह पशू-पक्ष्यांना वाढत्या उष्णतेची झळ बसू नये, याकरिता कर्मचाऱ्यांनी वेगवेगळ्या कल्पना राबवून त्यांच्या हवेत गारवा निर्माण केला आहे.

पशु वैद्यकीय विभागाने सरपटणाऱ्या प्राण्यांसाठी वेगळी, पशू-पक्ष्यांना वेगळी सुविधा उपलब्ध केली आहे. प्राणी संग्रहालयात सर्पालयात १३ विविध जातीचे साप उपलब्ध आहेत. उष्णतेपासून त्यांचा बचाव व्हावा, परंतू, साधारण १७ ते २० डिग्री सेल्सियस तापमान ठेवणे अपेक्षित आहे. तसेच ३० डिग्रीच्या आत तापमान ठेवावे लागते. सरपटणाऱ्या प्राण्यांच्या हवेत गारवा राहावा, यासाठी एका ठिकाणी दिवसातून दोन वेळा पाण्याचा फवारा मारला जात आहे. त्याशिवाय एका जागेवर कुलर बसवला असून चार ठिकाणी टेबल फॅन लावण्यात आल्याने सापांच्या घराभोवती थंड हवा पसरली जात आहे. विशेष म्हणजे सापांच्या प्रत्येक घरात लाल मातीच्या भांड्यात पाणी ठेवून वडांच्या पारब्या लावण्यात आल्या आहेत. तर गोल्डन सॅन्डची पाणी शोषून ठेवणारी माती खाली पसरल्याने हवेत गारवा राहून उष्णतेचा फटका त्यांना बसत नाही. सर्पालयातील १३ प्रकारचे साप आहेत. त्यात विषारी व बिनविषारी असा समावेश आहे. यामध्ये नाग, चापडा, मण्यार, धामण, तरस, डूरक्या, घोणस, मांडूळ, धूळ, नागिण, कवड्या यांचा समावेश आहे. हवेत थंडावा राहावा म्हणून विशेष प्रयत्न केले जात आहेत.

त्याचबरोबर पशू पक्ष्यांना देखील लाल मातीच्या भांड्यात पाण्याची व्यवस्था केली आहे. प्राणी संग्रहालयात सतत सर्व बाजूने दिवसातून एकदा पाण्यांचा फवारा मारला जातो. यामुळे उष्णतेच्या झळा कमी प्रमाणात लागून आजू बाजूचा परिसर थंड राहत आहे.  तसेच कासव, घुबड, घार, पाहाटी पोपट, करकोचा, बदक, मोर यांचीही जबाबदारी कर्मचारी व्यवस्थित आणि नीटनेटकी काळजी घेत आहेत, अशी माहिती डॉ.शैलेजा कोळेकर यांनी दिली.

मण्या अन् सगुणाची विशेष काळजी

प्राणी संग्रहालयातील असलेल्या मगरींची देखील तेवढीच काळजी घेतली जात आहे. दर आठवड्यातून एकदा मण्या व सगुणा मगरींच्या घरात थंड पाणी सोडले जात आहे. तर त्यांच्या खाण्या- पिण्याची देखील वेळीच दक्षता घेतली जात आहे. पाण्याचा प्लॅन्ट तयार करुन त्यांना ठेवले जात आहे.

हे आहेत प्राणी

विविध जातीचे साप      ५२
कासव ४७
पक्षी  ८६
मगर 
एकूण  १८७

सरपटणाऱ्या प्राण्यांसह व पशू, पक्ष्यांना देखील उष्णतेच्या झळा बसत आहेत. त्यांच्या आरोग्यावर देखील परिणाम होण्याची शक्यता असते. उन्हाच्या झळा कमी बसवाव्यात म्हणून प्राणी संग्रहालयात तीन महिने विशेष काळजी घेतली जाते. पशू-पक्षी व प्राण्यांसाठी हवा थंड राहावी, अन्य सोयी-सुविधांची व्यवस्था केली आहे. सध्यस्थितीत फॅनची व्यवस्था केलेली आहे. तर उष्णता पाहून त्यात बदल देखील केला जातो. आता आणखी कुलर देखील मागवले असून प्राण्यांसाठी  थंडावा निर्माण व्हावा म्हणून प्रयत्न केला जात आहे. 
- संदीप खोत, उपायुक्त, पशु वैद्यकीय विभाग, पिंपरी-चिंचवड महापालिका

 

Join Civic Mirror Whatsapp Group for Latest Update

Share this story

Latest