पिंपरी-चिंचवड: डॉक्टर, वकीलही पोलीस भरती रांगेत!

डॉक्टर, वकील, शिक्षक, इंजिनिअर यांच्यासह वेगवेगळ्या क्षेत्रात मास्टर डिग्री असलेले ६ हजार ९०७ तरुण पिंपरी-चिंचवड पोलीस शिपाईपदाच्या रांगेत असल्याचे भीषण वास्तव समोर आले आहे. पिंपरी-चिंचवड पोलीस दलात भरती होण्यासाठी राज्याच्या कानाकोपऱ्यातून तब्बल पंधरा हजार अर्ज आले आहेत.

संग्रहित छायाचित्र

विविध क्षेत्रात 'मास्टर डिग्री' असलेले सात हजार तरुण आजमावताहेत नशीब, पिंपरीत तब्बल १५ हजार अर्ज

डॉक्टर, वकील, शिक्षक, इंजिनिअर यांच्यासह वेगवेगळ्या क्षेत्रात मास्टर डिग्री असलेले ६ हजार ९०७ तरुण पिंपरी-चिंचवड पोलीस शिपाईपदाच्या रांगेत असल्याचे भीषण वास्तव समोर आले आहे. पिंपरी-चिंचवड पोलीस दलात भरती होण्यासाठी राज्याच्या कानाकोपऱ्यातून तब्बल पंधरा हजार अर्ज आले आहेत. (Police Recruitment 2024)

पिंपरी- चिंचवड शहर पोलीस (Pimpri-Chinchwad Police) दलातील २६२ शिपाईपदासाठी भरती प्रक्रिया सुरू केली आहे. शिपाईपदासाठी एकूण पंधरा हजार जणांनी अर्ज दाखल केले आहेत. बुधवार (दि. १९) पासून भोसरीतील इंद्रायणीनगर मैदानावर प्रत्यक्ष भरती प्रक्रिया सुरू करण्यात आली. बुधवारी ५०० तर, गुरुवारी १ हजार जणांना शारीरिक चाचणीसाठी बोलावण्यात आले. मैदानी चाचणीसाठी आलेले बहुतांश तरुण उच्चशिक्षित असल्याचे दिसून येत होते. तरुणांनी दाखल केलेल्या अर्जावरून माहिती घेतली असता डॉक्टर, वकील, शिक्षक यांच्यासह वेगवेगळ्या क्षेत्रात मास्टर डिग्री असलेले तरुणही शिपाईपदासाठी आपले नशीब आजमावत असल्याचे धक्कादायक वास्तव समोर आले.

वाढती बेरोजगारी, अस्थिरता

उच्चशिक्षितांमधील वाढती बेरोजगारी, व्यवसायांमध्ये असलेली अस्थिरता या कारणांमुळे सरकारी नोकरीकडे तरुणांचा कल वाढू लागला आहे. मिळेल ती सरकारी नोकरी पदरात पाडून घेण्यासाठी धडपड सुरू असल्याचे चित्र सध्या सर्व शासकीय भरतीमध्ये पाहावयास मिळत आहे.

भरतीवर पावसाचे सावट
राज्‍याच्‍या विविध जिल्‍ह्यातून भरतीसाठी तरुण आले आहेत. त्यांची राहण्याची सोय नसल्याने अतिरिक्त पोलीस आयुक्त वसंत परदेशी यांनी महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त प्रदीप जांभळे पाटील यांच्याशी संपर्क केला. त्‍यांनी गवळीमाथा येथील हॉल निवासाकरिता उपलब्ध करून दिला. त्या ठिकाणी गादी, उशी, आंघोळीसाठी पाणी उपलब्ध करून देण्यात आले आहे.

अशी होते शारीरिक चाचणी
मुख्य प्रवेशद्वारावर बारकोड स्कॅनरने हजेरी घेतली जाते. या हजेरीपत्रकावर फोटो, स्वाक्षरी घेतली जाते. त्‍यानंतर उंची, छातीचे मोजमाप होते. त्‍यानंतर दस्तऐवज तपासासाठी येथील बॅडमिंटन हॉलममध्ये पाठविण्यात येते. तिथे पात्र झालेलल्या  उमेदवारांची यादी तयार करून आरएफआयडी टॅग व चेस्‍ट क्रमांकाचे वाटप केले जाते. त्यानंतर मुख्य मैदानात १०० मीटर धावणे , गोळाफेक, १६०० मीटर धावणे चाचणी घेतली जाते. वरीलपैकी एकाही चाचणीत अपात्र झाल्यास त्यास अपात्र टेबलकडे पाठविण्यात येते. अपात्र झालेला उमेदवार प्रथम आणि द्वितीय अपील करू शकतो.

सशस्त्र सेनेतील १०१ इच्छुक
पिंपरी- चिंचवड पोलीस दलात भरती होण्यासाठी विविध क्षेत्रातील उच्च शिक्षित तरुणांसोबत भारतीय सशस्त्र सेनेतील १०१ जवानांनी अर्ज दाखल केले आहेत. त्यांनाही पोलीस बनण्यासाठी सर्व चाचण्यांमध्ये उत्तीर्ण व्हावे लागणार आहे.

विविध रंगाचे ओळखपत्र
पोलिसांनाही विविध रंगाच्या ओळखपत्राचे वाटप करण्यात आले आहे. भरती प्रक्रियेत कर्मचाऱ्यांनी हस्तक्षेप करू नये म्‍हणून सफेद, नारंगी, पिवळ्या व इतर  रंगाच्या पासचे वाटप केले आहे. मैदानातील पोलीस बाहेर येऊ शकत नाहीत. तसेच, बाहेरील इतर ठिकाणी असलेले पोलीस कर्मचाऱ्यांना जागा सोडून जाता येणार नाही, अशी सक्त सूचना भरती प्रमुख अपर पोलीस आयुक्त डॉ. वसंत परदेशी यांनी दिली आहे.

Pimpri Chinchwad Police Recruitment

Join Civic Mirror Whatsapp Group for Latest Update

Share this story

Latest