पिंपरी-चिंचवड: गेरा बिल्डरवर गुन्हा - वृक्षांची कत्तल भोवली

विनापरवाना झाडांची कत्तल केल्याप्रकरणी कुमार गेरा आणि गेरा इम्पेरियल गेटवे गेरा डेव्हलपमेंट प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीशी संबंधित दोघांवर भोसरी पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पिंपरी-चिंचवड: गेरा बिल्डरवर गुन्हा - वृक्षांची कत्तल भोवली

नाशिक फाटा येथील बांधकामासाठी भूमिगत विद्युतवाहिनी टाकण्याकरिता खड्डे खोदताना विनापरवाना झाडे तोडल्याने भोसरी पोलिसांची कारवाई

विनापरवाना झाडांची कत्तल केल्याप्रकरणी कुमार गेरा आणि गेरा इम्पेरियल गेटवे गेरा डेव्हलपमेंट प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीशी संबंधित दोघांवर भोसरी पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. नाशिक फाटा येथे सुरू असलेल्या बांधकाम साईटकरिता भोसरी येथून भूमिगत विद्युत वाहिनी टाकताना केलेल्या खड्डे खोदाईसाठी ही वृक्षतोड झाल्याचा प्राथमिक अंदाज वर्तविला जात आहे.

गेरा इम्पेरियल गेटवे गेरा डेव्हलपमेंट प्रायव्हेट लिमिटेडचे कुमार गेरा, बालाजी खांडेकर, विजय कल्याणकर यांच्या विरोधात पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या उद्यान विभागाचे उद्यान साहाय्यक सुरेश घोडे यांनी तक्रार दिली आहे. तर भोसरी पोलीस ठाण्यात महाराष्ट्र झाडे तोडणे (नियमन) अधिनियम १९६४ चे कलम ३ (१), ४ महाराष्ट्र (नागरी क्षेत्रे) झाडांचे संरक्षण व जतन अधिनियम १९७५ चे कलम २१ (१) अन्वये गुन्हा दाखल केला आहे. संशयितांनी वृक्ष प्राधिकरण समितीची कोणतीही परवानगी न घेता सुमारे दहा मोठी झाडे आणि काही झाडांच्या फांद्या तोडल्याचे महापालिकेने दिलेल्या फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे.

अखेर पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या वतीने गेरा इम्पेरियल गेटवे गेरा डेव्हलपमेंट प्रा. लि.चे कुमार गेरा आणि अन्य दोन संबंधितांविरोधात फिर्याद देण्यात आली. आरोपींनी वृक्षतोड करून ३ लाख रुपयांच्या दंडात्मक चलनानुसार नुकसान केले, असे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे. भोसरी पोलीस ठाण्यातील पोलीस उपनिरीक्षक श्रीकांत गुरव या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.

गेरा इम्पेरियल गेटवे गेरा डेव्हलपमेंट प्रायव्हेट लिमिटेडचे नाशिक फाटा येथे बांधकाम सुरू आहे. या बांधकाम साईटकरिता अतिरिक्त विद्युत पुरवठा हवा असल्याने संबंधितांनी भोसरी येथील सबस्टेशनपासून २२ केवी व्हॅटची विद्युत वाहिनी टाकण्याकरिता खोदाई केली आहे. ही खोदाई करताना या लोकांनी वृक्षतोड केल्याचेही निदर्शनास आल्याने मी महापालिकेच्या अधिकाऱ्यांना बोलावून घेत याबाबत पाठपुरावा केला. अखेर महापालिकेने संबंधित बांधकाम व्यवसायिकावर गुन्हा दाखल केला आहे, अशी माहिती वृक्षमित्र संजय औसरमल यांनी ‘सीविक मिरर’ला दिली.

वृक्षमित्राने तक्रार दिल्यानंतर महापालिकेला जाग

वृक्षमित्र संजय औसरमल यांनी हा प्रकार पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या निदर्शनास आणून दिल्यानंतर महापालिकेच्या उद्यान विभागाला याची माहिती झाली. १७ मे रोजी घडलेल्या या प्रकरणी महापालिकेने प्राथमिक चौकशी केल्यानंतर ३१ मे रोजी या प्रकरणी भोसरी पोलीस ठाण्यात वरील संबंधितांविरोधात फिर्याद देण्यात आली आहे.

औसरमल हे काही कामानिमित्त नाशिक फाटा येथून भोसरीच्या दिशेने जात होते त्यावेळेस त्यांना रस्त्याच्या डाव्या बाजूला केंद्र सरकारची संस्था असलेल्या ‘सीआयआरटी’ कंपाउंड बाहेरील मोकळ्या जागेत मोठ्या प्रमाणात वृक्षतोड झाल्याचे दिसून आले. जेसीबी लावून या ठिकाणी काम सुरू होते. १७ मे रोजी रात्री १२ ते १८ मे च्या सकाळी साडेअकरापर्यंत हा सर्व प्रकार सुरू होता.

एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये वृक्षतोड झाल्याचे पाहून औसरमल आणि वृक्षमित्र सागर कसबे यांनी उद्यान साहाय्यक घोडे यांना घटनास्थळी पाचारण केले. झाडे लावणे, निगा राखणे, देखभाल करणे, धोकादायक झाडांचे सर्वेक्षण आदी स्वरूपाची जबाबदारी घोडे यांच्यावर आहे. त्यामुळे घोडे हे अन्य कर्मचाऱ्यांसह घटनास्थळी दाखल झाले त्यावेळेस प्रथमदर्शनी तरी कोणत्याही स्वरूपाची परवानगी न घेता ही वृक्षतोड झाल्याचे घोडे यांनी वृक्षमित्र औसरमल यांना सांगितले त्याचबरोबर उद्यान साहाय्यक असणारे घोडे यांनी तत्काळ वृक्षतोडीचा पंचनामा केला.

त्यानंतर पुढील आठ ते दहा दिवस याबाबत महापालिकेच्या उद्यान विभागाशी संबंधित असणाऱ्या अनेक अधिकाऱ्यांनी चौकशीचे सोपस्कार पार पाडले. दरम्यान आठ दिवसांनंतरदेखील याबाबत गुन्हा दाखल न झाल्याने वृक्षमित्र औसरमल हे संबंधित विविध अधिकाऱ्यांकडे पाठपुरावा करीत होते.

मी कामानिमित्त भोसरीकडे जात होतो. तेव्हा जेसीबी लावून काम सुरू असताना दिसले. पुढे गेल्यावर मला झाडांची मोठी कत्तल सुरू असल्याचे दिसून आले. तेव्हा मी महापालिका अधिकाऱ्यांशी संपर्क करून त्यांना घटनास्थळी बोलावले. परवानगी न घेता ही वृक्ष कत्तल सुरू असल्याचे दिसून आले. या प्रकरणाचा सातत्याने पाठपुरावा केल्यानंतर अखेर महापालिकेने संबंधित बांधकाम व्यवसायिकावर गुन्हा दाखल केला आहे.
- संजय औसरमल, वृक्षमित्र


महापालिकेने याबाबतचा आवश्यक असलेला प्राथमिक पंचनामा करून आमच्याकडे फिर्याद आणून दिली आहे. महापालिकेने दिलेल्या फिर्यादीनुसार संबंधितांवर गुन्हा दाखल केला असून या प्रकरणाचा तपास आम्ही करीत आहोत.

- नितीन फटांगरे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, भोसरी ठाणे

 

Join Civic Mirror Whatsapp Group for Latest Update

Share this story

Latest