संग्रहित छायाचित्र
पिंपरी चिंचवड: क्रिएटिव्ह अकॅडमी (Creative Academy) या निवासी शाळेच्या हॉस्टेलसाठी आवश्यक असलेली समाजकल्याण विभागाची परवानगी नौशाद शेख याने घेतली नसल्याचे आता महापालिकेने केलेल्या चौकशीत उघड झाले आहे. तसेच या शाळेची शिक्षण उपसंचालकांकडे असलेली मान्यता आणि धर्मादाय आयुक्तांकडे असलेली ट्रस्टची नोंदणी रद्द करण्यात यावी, असे पत्र पिंपरी-चिंचवड महापालिकेने (PCMC) दिले आहे.
क्रिएटिव्ह ॲकॅडमी या निवासी शाळेचा संचालक नौशाद शेख (Naushad Shaikh) याने अल्पवयीन विद्यार्थिनीवर वारंवार बलात्कार केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आल्यानंतर पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या शिक्षण विभागाकडून या सगळ्या प्रकरणाची समांतर चौकशी सुरु करण्यात आली होती. दहा वर्षांपूर्वी शेख याने येथीलच एका विद्यार्थिनीचे लैंगिक शोषण केल्याची घटना घडली होती. पोलिसांनी नौशाद शेख याच्यासह त्याला मदत करणाऱ्या माजी विद्यार्थिनीला नुकतीच अटक केली आहे. या ॲकॅडमीमधील संस्थाचालकांने केलेले आणखी गैरप्रकार समोर येण्याची शक्यता पोलिसांनी वर्तविली होती. त्यानंतर अन्य एका अल्पवयीन विद्यार्थिनीने पुढे येऊन शेख याच्या विरोधात तक्रार दिली आहे. तसेच या ठिकाणच्या सर्वच आजी माजी विद्यार्थिनींची चौकशी पोलिसांच्या विशेष पथकाकडून आणि महापालिकेकडून करण्यात येत आहे.
३० जानेवारीला हा प्रकार समोर आल्यानंतर पोलीस आयुक्त विनय कुमार चौबे यांनी या प्रकरणी विशेष तपास पथक स्थापन करून महिला अधिकाऱ्याची विशेष तपास अधिकारी म्हणून नियुक्ती केली. रावेत कॉर्नर येथे किएटिव्ह ॲकॅडमी आहे. या निवासी शाळेमध्ये आठवी ते बारावीच्या विद्यार्थ्यांना शिक्षण दिले जाते. नाशिक, अहमदनगर, मुंबई, विदर्भ, मराठवाडा तसेच राज्यभरातील अनेक जिल्ह्यातील पालकांनी या निवासी शाळेत पाल्यांना ठेवले आहे. त्यासाठी वर्षाकाठी प्रत्येकी किमान ३ लाख रुपये फी पालक भरत आहेत. मात्र, असे असतानाही निवासी शाळेत मुली सुरक्षित नसल्याचे समोर आले आहे.
गुन्हा दाखल झाल्यानंतर शहरातील हिंदू संघटना देखील एकवटल्या आहेत. शेख यांच्या घरावर बुलडोझर फिरवा अशी मागणी बजरंग दलाचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली आहे. दरम्यान, याबाबत महापालिकेच्या शिक्षण विभागाकडून करण्यात आलेल्या समांतर चौकशीचा अहवाल अतिरिक्त आयुक्त प्रदीप जांभळेपाटील यांनी शिक्षण विभागाच्या उप संचालकांना सादर केला आहे. तसेच क्रिएटीव्ह एज्युकेशनल सोसायटी संचलित पब्लिक स्कूल अॅन्ड ज्युनिअर काॅलेजच्या संस्था चालकांकडे सी.बी.एस.ई. चे ना हरकत प्रमाणपत्र बोगस असल्याचे आढळून आले आहे. त्यामुळे शिक्षण उप संचालक कार्यालयाने सूचित केल्यावर मागील वर्षी महापालिकेच्या शिक्षण विभागाने रावेत पोलिसांना शेख याच्याकडील बोगस ना हरकत प्रमाणपत्र बाबत गुन्हा दाखल करावा असे पत्र दिले आहे.
क्रिएटिव्ह अकॅडमीच्या संचालक नौशाद शेख याच्यावर गुन्हा दाखल झाल्यानंतर आमच्या शिक्षण विभागाने याबाबत समांतर चौकशी सुरु केली होती. त्यानंतर शेख याच्याकडे हॉस्टेलसाठी आवश्यक असलेली समाज कल्याण विभागाची परवानगी नसल्याचे आमच्या चौकशीतून उघड झाले आहे. त्यामुळे समाज कल्याणला पत्र देऊन आवश्यक कारवाई करावी असे सूचित करण्यात आले आहे. तसेच शिक्षण उप संचालकांना सविस्तर अहवाल सादर करण्यात आला असून, मान्यता रद्द करण्याची विनंती करण्यात आली आहे. त्याच बरोबर धर्मादाय आयुक्तांकडे असलेली ट्रस्टची नोंद रद्द करण्यासाठी पत्रव्यवहार करण्यात आला आहे.
- प्रदीप जांभळे पाटील, अतिरिक्त आयुक्त, पिंपरी-चिंचवड महानगरपालिका
© Civic Mirror - Lexicon Broadcasting.
Licensor - Bennet and Coleman Co Ltd.