पिंपरी चिंचवड : पब, बार आणि रेस्टॉरंटवर धडक कारवाई
पंकज खोले :
पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाकडून (पीएमआरडीए) गुरुवारी सकाळीच हिंजवडी येथील अनधिकृत १० बार अँड रेस्टो आणि रूफ टॉप हॉटेलवर बुलडोझर फिरवण्यात आला. गेल्या सहा महिन्यांपासून थंड असलेल्या प्राधिकरणाच्या अतिक्रमण विरोधी पथकाने ही कारवाई केली कारण याबाबत जिल्हाधिकाऱ्यांनी त्यांची कानउघडणी केली आहे. कान टोचल्यानंतर प्राधिकरणाला जाग आली असून कारवाईचा धडाका सुरू केला आहे. आज केलेल्या कारवाईत जवळपास ९७ हजार ८१५ चौरस फुटाचे बांधकाम जमीनदोस्त करण्यात आले.
दरम्यान, 'सीविक मिरर'ने हिंजवडी परिसरातील अतिक्रमणचा मुद्दा उपस्थित केला होता. गेल्या अनेक दिवसांपासून पीएमआरडीए अतिक्रमण विरोधी पथकाला पूर्ण वेळ अधिकारी मिळत नव्हता. परिणामी, सुनावण्या आणि अतिक्रमण कारवाई थंड झाली होती. पीएमआरडीएचे अधिकाऱ्यांना तात्पुरता चार्ज प्राधिकरणातील दोन अधिकाऱ्यांना देण्यात आला होता. त्यामुळे या विभागास कोणीही वाली नव्हता. दरम्यान, निवडणुकीच्या काळात या अतिक्रमण विभागास अधिकाऱ्याची नियुक्ती करण्यात आली आहे. त्यानुसार गेल्या आठवड्यात संबंधित अधिकाऱ्यांनी याची माहिती घेतली. निवडणुकीच्या काळात आचारसंहितेमुळे कारवाई करता येत नव्हती. मंगळवारी मतमोजणी पार पडली. गुरुवारी सकाळपासून सात पासून ही कारवाई करण्यात आली.अतिक्रमण विभागाचे सर्व अधिकारी व कर्मचारी या ठिकाणी उपस्थित होते. जानेवारी महिन्यामध्ये महाळुंगे परिसरातील अतिक्रमण व कारवाई केली होती. तर, ऑक्टोबर २०२३ मध्ये हिंजवडी परिसरातील लक्ष्मी चौक या ठिकाणी अतिक्रमण काढले होते. त्यानंतर आता म्हणजे जवळपास सहा महिन्यांनी कारवाई करण्यात आली. त्यात हिंजवडी (ता. मुळशी) येथील गट नंबर २१, २८, २९ मधील ०८ अनधिकृत बार अँड रेस्टो व २ रूफ टॉप बार अँड रेस्टोवर निष्कासन कारवाई सुरू करण्यात आली. कारवाई पूर्ण दिवस सुरू होती. या ठिकाणचे ९७, ८१५ चौ.फूट क्षेत्रावरील अनधिकृत पब, रेस्टॉरंट व बार पोकलेन, जेसीबी व मनुष्यबळाच्या साहाय्याने पाडण्यात आले. अशीच कारवाई इथून पुढे सुरू राहणार असल्याचे सांगण्यात आले. पीएमआरडीएचे महानगर आयुक्त राहुल महिवाल व अति. महानगर आयुक्त दीपक सिंगला यांचे मार्गदर्शनाखाली कारवाई केली. यावेळी उपस्थित पीएमआरडीएच्या अनधिकृत बांधकाम निर्मूलन विभागाच्या अधिकाऱ्यांनी अनधिकृत बांधकाम करू नये, असे आवाहन केले आहे.
ही आहेत कारवाई केलेली हॉटेल्स
१) हॅपी दा पंजाब
२) हशश कॅफे बार
३) रिओ किचन अँड बार
४) फवेरा गॅस्ट्रो बार
५) मरिन ड्राईव्ह स्काय बार
६) हॉटेल एफ एम एल
७) बिलेनियर रेस्टो बार
८) द कम्युनिटी टेबल
९) एजंट जॅक्स
१०) डी हेम्स
आज सकाळपासून या ठिकाणी कारवाई सुरू होती. प्राधिकरण हद्दीतील उर्वरित सर्व पब, बार व रेस्टॉरंट्स यांचा सर्व्हे चालू असून अनधिकृत बांधकामांवर निष्कासनाची कारवाई सुरूच राहणार आहे.
- अनिल दौंडे, सह-आयुक्त ,अतिक्रमण व निर्मूलन पथक, पीएमआरडीए
© Civic Mirror - Lexicon Broadcasting.
Licensor - Bennet and Coleman Co Ltd.