पिंपरी चिंचवड: लिपिकांच्या आड, वरिष्ठांचा भ्रष्टाचार?

पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या विविध विभागात मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचाराला खतपाणी घातले जात आहे. महापालिकेचे विभाग प्रमुख आणि प्रतिनियुक्तीवर आलेल्या वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून महापालिकेचे आर्थिक नुकसान केले जात आहे.

संग्रहित छायाचित्र

पायबंद घालण्यासाठी महापालिका आयुक्त शेखर सिंह यांना लिहिले पत्र, महाराष्ट्र राज्य शासकीय लिपिक संवर्गिय हक्क परिषदेचा 'लेटरबाॅम्ब'

विकास शिंदे
पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या (PCMC) विविध विभागात मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचाराला खतपाणी घातले जात आहे. महापालिकेचे विभाग प्रमुख आणि प्रतिनियुक्तीवर आलेल्या वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून महापालिकेचे आर्थिक नुकसान केले जात आहे. पालिकेच्या आस्थापनेवरील लिपिक, मुख्य लिपिक कर्मचाऱ्यांना हे वरिष्ठ अधिकारी पुढे करून भ्रष्टाचार करू लागले असून त्यांचा हस्तक म्हणून वापर करण्यात येत आहे, असा गंभीर आरोप महाराष्ट्र राज्य शासकीय लिपिक संवर्गीय हक्क परिषदेकडून पत्राद्वारे केला आहे.

महापालिकेचे आयुक्त तथा प्रशासक शेखर सिंह (Shekhar Singh) यांच्याकडे तक्रार अर्ज दिला आहे. त्या तक्रार अर्जात म्हटले आहे की, महापालिकेच्या आस्थापनेवर काम करणाऱ्या  लिपिक आणि मुख्य लिपिकांना भ्रष्ट कारभारात पुढे करून वरिष्ठ अधिकारी भ्रष्टाचाराला खतपाणी घालू लागले आहेत. महापालिकेच्या तिजोरीवर डल्ला मारण्यासाठी हेच वरिष्ठ अधिकारी हाताखालील कर्मचाऱ्यांना नाहक वेठीस धरून आणि त्यांचे हस्तक म्हणून वापर करण्यात येऊ लागला आहे. जो कोणी लिपिक या प्रकारास विरोध करत असेल, त्याला जाणीवपूर्वक कार्यालयीन कामकाजात त्रास देणे, त्यांच्याकडील असलेल्या कामकाजात नाहक चुका काढणे, त्यांच्या फाईलवर पुढील कार्यवाही न करणे, त्यांना मानसिक त्रास देणे अशा पध्दतीने वागणूक देण्यात येत आहे. तसेच त्यांना भ्रष्ट काम करण्यास प्रवृत्त करण्याचे काम महापालिकेच्या अनेक विभागातील वरिष्ठ अधिकारी वर्गाकडून होत आहे. महापालिकेच्या विविध विभागातील लिपिक, मुख्य लिपिकांना जाणीवपूर्वक त्रास देऊन त्यांना आपल्या मर्जीपणे काम करण्यास भाग पाडले जात आहे.

विभागातील वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या जाचाबद्दल अनेकदा लिपिकांकडून लिखित स्वरूपात देखील सामान्य प्रशासन, अतिरिक्त आयुक्त, आयुक्त यांच्याकडे तक्रारी दिलेल्या आहेत. पण, या प्रकाराची साधी दखल न घेता तक्रारदार कर्मचाऱ्यांनाच कात्रीत पकडले जात आहे. त्यांच्यावर कारवाईचा बडगा उगारला जात आहे.

दरम्यान, अनेक विभागातील भ्रष्ट कारभारात लिपिकवर्ग जर दोषी आढळत असतील, तर त्यांच्यापेक्षा त्यांच्यावर नियंत्रण ठेवणारे वरिष्ठ अधिकारीसुध्दा दोषी आहेत. अशा अधिकारीवर्गामुळे महापालिकेतील कर्मचारी शिस्त बिघडत चालली आहे. तसेच वरिष्ठ अधिकारीवर्ग पालिकेत कोणती संस्कृती रुजवत आहेत. हा आमच्या संघटनेला प्रश्न पडला आहे. आयुक्त साहेब, या प्रकरणाची वेळीच दखल घेऊन आपल्या स्तरावरून लवकरात लवकर उपाययोजना करण्यात याव्यात. अन्यथा महाराष्ट्र राज्य शासकीय लिपिक संवर्गिय हक्क परिषदेकडून महापालिकेतील या सर्व विभागात चालणाऱ्या  भ्रष्ट कारभाराचा, त्यांची यादीचा भांडाफोड केल्याशिवाय राहणार नाही, असा इशारा देखील पत्राद्वारे दिला आहे.

'एसीबी'कडे वरिष्ठांचा नव्हे लिपिकांचा बळी... 

महापालिकेच्या अनेक विभागात ठेकेदार, नागरिकांच्या तक्रारीवरून लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडून छापा टाकण्यात आला आहे. या एसीबीच्या छाप्यात अनेकांना अटक झाली आहे. पण, सर्वात जास्त लिपिक वर्गाचाच बळी गेला आहे. वास्ताविक पाहता कार्यालयाच्या व कर्मचारी वर्गाच्या सर्व कामकाजावर वरिष्ठ अधिकाऱ्यांचे नियंत्रण असते. यामुळे विभागातील काम करणारे कर्मचारी काय करतात. याची सर्व माहिती वरिष्ठांना असते. परंतु, कर्मचाऱ्यांकडून इच्छित फळ हे वरिष्ठ अधिकारीवर्गांना बिनबोभाट मिळत असल्याने त्या सर्व प्रकरणाकडे डोळेझाकच नाही तर प्रोत्साहन दिले जात आहे.

महापालिकेतील काही वरिष्ठ अधिकारी हे भ्रष्ट कारभाराला खतपाणी घालत आहेत. पण, हाताखालील कर्मचाऱ्यांना बळीचा बकरा बनवून त्यांच्या आडून ठेकेदार, नागरिक, बिल्डरासह अनेकांची कामे अडवण्याची कामे केली जात आहे. अनेक विभागात एसीबीच्या छाप्यात लिपिकांवर कारवाई होऊन त्यांना अटक झाली. परंतु, एकाही वरिष्ठ अधिकाऱ्याला अटक झालेली नाही. वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या दबावाखाली येऊन लिपिक कर्मचारी करत आहेत. याबाबत महापालिका आयुक्तांकडे तक्रार करण्यात आली असून वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या भ्रष्टवृत्तीला आळा घालण्यात यावा.
- संजय जगदाळे , अध्यक्ष, महाराष्ट्र राज्य लिपिक संवर्गीय हक्क परिषद, पिंपरी-चिंचवड

Join Civic Mirror Whatsapp Group for Latest Update

Share this story

Latest