पिंपरी-चिंचवड: ‘नाला, गटार सफाई मे अखेर पूर्ण करा’; मान्सूनपूर्व तयारी आणि आपत्ती व्यवस्थापन उपायांबाबतच्या आढावा बैठकीत आयुक्तांचे आदेश

पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर आपत्कालीन परिस्थिती उद्भवणार नाही, यासाठी शहरातील नालेसफाई व पावसाळी गटर सफाईची सर्व कामे मे अखेरपर्यंत पूर्ण करावीत. तसेच संभाव्य पूरपरिस्थितीत कोणतीही घटना घडल्यास संबंधित अधिकाऱ्यांनी प्रत्यक्ष घटनास्थळी उपस्थित

PCMC News

‘नाला, गटार सफाई मे अखेर पूर्ण करा’

विकास शिंदे
पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर आपत्कालीन परिस्थिती उद्भवणार नाही, यासाठी शहरातील नालेसफाई व पावसाळी गटर सफाईची सर्व कामे मे अखेरपर्यंत पूर्ण करावीत. तसेच संभाव्य पूरपरिस्थितीत कोणतीही घटना घडल्यास संबंधित अधिकाऱ्यांनी प्रत्यक्ष घटनास्थळी उपस्थित राहून सर्व विभागांनी समन्वयाने परिस्थिती हाताळावी, असे निर्देश आयुक्त तथा प्रशासक शेखर सिंह यांनी अधिकाऱ्यांना  दिले.

महापालिकेच्या (Pimpri Chinchwad Municipal Corporation) मुख्य प्रशासकीय इमारतीमध्ये आयुक्त तथा प्रशासक शेखर सिंह यांच्या अध्यक्षतेखाली मान्सूनपूर्व तयारी तसेच आपत्ती व्यवस्थापन उपाययोजनांसंबंधी आढावा बैठक पार पडली. या बैठकीत पावसाळ्यात उद्भवणाऱ्या विविध समस्या तसेच आपत्कालीन परिस्थितीबाबत सर्वंकष चर्चा करण्यात आली. त्या अनुषंगाने विविध विभागांकडे सोपविलेल्या कामकाजाचा आढावा आणि नियोजनाबद्दल माहिती घेण्यात आली. त्यावेळी आयुक्त शेखर सिंह यांनी संबंधित अधिकाऱ्यांना कामकाजाबाबत आदेश दिले. (PCMC News)

बैठकीस अतिरिक्त आयुक्त प्रदीप जांभळे पाटील, विजयकुमार खोराटे, उल्हास जगताप, सहआयुक्त चंद्रकांत इंदलकर, शहर अभियंता मकरंद निकम, मुख्य अभियंता रामदास तांबे, श्रीकांत सवणे, आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. लक्ष्मण गोफणे, सह शहर अभियंता बाबासाहेब गलबले, ज्ञानदेव जुंधारे, मनोज सेठिया, संजय कुलकर्णी, यशवंतराव चव्हाण स्मृती रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. राजेंद्र वाबळे, अतिरिक्त आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. अभय चंद्र दादेवार, मुख्य सुरक्षा अधिकारी मेजर उदय जरांडे,  उपआयुक्त अण्णा बोदडे, मनोज लोणकर, रविकिरण घोडके, क्षेत्रीय अधिकारी सुचिता पानसरे, डॉ. अंकुश जाधव, अमित पंडित, राजेश आगळे, उमेश ढाकणे, सीताराम बहुरे, कार्यकारी अभियंता देवन्ना गट्टूवार, बापूसाहेब गायकवाड, साहाय्यक आयुक्त यशवंत डांगे, मुख्य कामगार कल्याण अधिकारी प्रमोद जगताप, मुख्य आपत्ती व्यवस्थापन अधिकारी ओमप्रकाश बहिवाल, पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. अरुण दगडे यांच्यासह संबंधित अधिकारी उपस्थित होते. 

आयुक्त शेखर सिंह यांनी आपत्कालीन परिस्थितीच्या अनुषंगाने उपस्थित अधिका-यांना आदेश व सूचना दिल्या. पूर परिस्थितीत तातडीने घटनास्थळावर पोहोचून परिस्थिती नियंत्रणात आणावी. पूर परिस्थिती सहजतेने हाताळण्यासाठी सर्व विभागांनी अंतर्गत समन्वय ठेवावा. पावसाळ्यात पाण्याच्या  पातळीत वाढ होते, त्यामुळे सर्व यंत्रणा सुसज्ज असणे गरजेचे आहे. आपत्ती काळात कोणत्याही गंभीर परिस्थितीला सामोरे जाण्यासाठी  मार्गदर्शक सूचना तयार करून नागरिकांमध्येही त्याबाबत जनजागृती करावी. शहरातील नालेसफाईच्या कामाला गती द्यावी. पाणी कोठेही तुंबणार नाही याची काळजी घ्यावी. नदीकाठी असणा-या लोकवस्तीत पाणी शिरण्याच्या घटनांवर लक्ष ठेवावे. दुर्घटना टाळण्यासाठी सातत्याने या भागाची पाहणी करणे आवश्यक असून पूरबाधित व्यक्तींसाठी अन्न, निवास आदी सुविधांसह सर्व आवश्यक असणाऱ्या साधनसामग्रीची पूर्वव्यवस्था करावी, असे आदेश आयुक्त सिंह यांनी दिले.

पूर्वतयारी करा

ज्या भागात पावसाळ्यात आपत्कालीन परिस्थिती उद्भवते, त्यासाठी नागरिकांचे स्थलांतर कुठे करावे याबाबत पूर्वतयारी करावी. आपत्ती काळात त्वरित संपर्क करण्यासाठी विविध आवश्यक विभागांचे आणि संपर्क यंत्रणांचे संपर्क क्रमांक अद्ययावत ठेवावेत,  तसेच हे क्रमांक २४x७ सक्रिय असतील याची दक्षता घ्यावी. वेळप्रसंगी वायरलेस यंत्रणा सज्ज ठेवावी. धोकादायक इमारतींची पाहणी करावी तसेच अनधिकृत आणि धोकादायक होर्डिंग्ज पाहणी करून ते काढण्यात यावेत. धोकादायक वृक्षांची वेळेत छाटणी करावी आदी सूचनादेखील आयुक्त सिंह यांनी यावेळी दिल्या.

Join Civic Mirror Whatsapp Group for Latest Update

Share this story

Latest