संग्रहित छायाचित्र
विकास शिंदे
ऐन पावसाळ्याच्या तोंडावर शहराला वाऱ्यावर सोडून महापालिकेचे आयुक्त शेखर सिंह हे तब्बल १८ दिवस सुट्टीवर गेले आहेत. त्यांनी ११ ते २८ जून या कालावधीत अर्जित रजा घेतली आहे. या काळात पीएमआरडीएचे आयुक्त राहुल महिवाल यांच्याकडे महापालिकेचा अतिरिक्त पदभार सोपवला आहे.
राज्य शासनाच्या सामान्य प्रशासन विभागाकडे महापालिका आयुक्त तथा प्रशासक शेखर सिंह यांनी अर्जित रजेसाठी अर्ज केला होता. त्यानुसार सामान्य प्रशासन विभागाने त्यांची अर्जित रजेसाठी मान्यता दिली असून त्यांचा अतिरिक्त पदभार पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाचे आयुक्त राहुल महिवाल यांच्याकडे अतिरिक्त कार्यभार सोपवण्याचे आदेश सामान्य प्रशासनाचे कार्यासन अधिकारी शिवाजी चव्हाण यांनी दिले आहे. पीएमआरडीएचे आयुक्त राहुल महिवाल यांनी स्वतःकडील कार्यभार सांभाळून आयुक्त, पिंपरी-चिंचवड महानगरपालिका या पदाचे कर्तव्य पार पडणार आहेत. शेखर सिंह हे रजेवरून परत आल्यावर राहुल महिवाल यांच्याकडील अतिरिक्त कार्यभार आपोआप संपुष्टात येणार आहे. (Shekhar Singh On Leave)
दरम्यान, महापालिकेतील नगरसेवकांचा पाच वर्षांचा कार्यकाळ १३ मार्च २०२२ रोजी संपुष्टात आला. त्यापूर्वीच निवडणूक प्रक्रिया पूर्ण होणे आवश्यक होते. परंतु, कोरोना, ओबीसी समाजाच्या राजकीय आरक्षणामुळे महापालिका निवडणूक वेळेत झाली नाही. त्यामुळे मागील दोन वर्षांपासून महापालिकेत प्रशासक राजवट असून प्रशासक हेच महापालिकेचा कारभार पाहात आहेत.
लोकप्रतिनिधी नसल्यामुळे शहराचा विकास मोठ्या प्रमाणावर खुंटला आहे. अशातच नुकतीच लोकसभा निवडणूकदेखील पार पडली, या कालावधीत सुरू असलेल्या आचारसंहितेचा फटका देखील कामांना बसला आहे. ऐन पावसाळ्यात तोंडावर आयुक्त तब्बल १८ दिवस सुट्टीवर गेल्यामुळे आपत्कालीन परिस्थिती उद्भवल्यास त्याला जबाबदार कोण? असा सवाल नागरिक उपस्थित करत आहेत.
© Civic Mirror - Lexicon Broadcasting.
Licensor - Bennet and Coleman Co Ltd.