पिंपरी-चिंचवड: आयुक्तांचे तोंडी आदेश, पार्किंगमध्ये थाटले अनधिकृत कार्यालय; 'अ' क्षेत्रीय स्थापत्य कार्यकारी अभियंत्याचा प्रकार

शहरात सर्वसामान्य नागरिकांनी घरावर वाढीव बांधकाम केले, एखादे पत्राशेड उभारले तर महापालिकेच्या क्षेत्रीय कार्यालयातील अनधिकृत बांधकाम पथकाकडून नोटीस पाठवून त्या घर किंवा पत्राशेडवर बुलडोझर चालवला जातो.

पिंपरी-चिंचवड: आयुक्तांचे तोंडी आदेश, पार्किंगमध्ये थाटले अनधिकृत कार्यालय; 'अ' क्षेत्रीय स्थापत्य कार्यकारी अभियंत्याचा प्रकार

सलगच्या सुट्ट्यांचा फायदा घेत कार्यालय उभारणीला सुरुवात

विकास शिंदे

शहरात सर्वसामान्य नागरिकांनी घरावर वाढीव बांधकाम केले, एखादे पत्राशेड उभारले तर महापालिकेच्या क्षेत्रीय कार्यालयातील अनधिकृत बांधकाम पथकाकडून नोटीस पाठवून त्या घर किंवा पत्राशेडवर बुलडोझर चालवला जातो. पण, महापालिका इमारतीच्या प्रवेशद्वारावर थेट पार्किंगमध्ये आयुक्तांच्या तोंडी आदेशानुसार आपत्ती व्यवस्थापनाचे दुसरे कार्यालय थाटण्याचा धक्कादायक प्रकार सुरु आहे.

पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या (Pimpri-Chinchwad Municipal Corporation) मुख्य प्रशासकीय इमारतीच्या पार्किंगमध्ये आपत्ती व्यवस्थापनासाठी कार्यालय थाटण्यात येत आहे. महापालिकेच्या आपत्ती व्यवस्थापनाचे प्रमुख असलेल्या ओमप्रकाश बहिवाल यांच्या हट्टापाई हे कार्यालय थाटण्यात येत असल्याचे कर्मचारी सांगत आहेत. महापालिकेच्या आपत्ती व नियंत्रण कक्षाचे एक कार्यालय कार्यरत आहे. पण, ते कार्यालय अपुरे  पडत आहे. त्यात राज्य शासनाकडून मुख्यमंत्र्याच्या आदेशाने प्रत्येक महापालिका आपत्ती व नियंत्रण कार्यान्वित करण्याचा सूचना आल्याचे सांगितले जात आहे. त्यानूसार महापालिकेच्या पार्किंग जागेत आणि आयुक्तांच्या वाहन पार्किग तळाशेजारी हे कार्यालय थाटले आहे. विशेष म्हणजे महापालिकेचा राज्य शासनाने आकृतीबंध मंजूर केला. त्या आकृतीबंधानूसार महापालिकेने आपत्ती व्यवस्थापन व नियंत्रण कक्षासाठी स्वतंत्र कायम स्वरुपी अधिकाऱ्यांची नियुक्ती केलेली नाही. तसेच महापालिका आकृतीबंधात हे पद निर्माण केलेले नाही. दरम्यान, महापालिकेच्या आपत्ती व्यवस्थापन व नियंत्रण कक्षाचे स्वतंत्र आणि प्रशस्त कार्यालय करावे, म्हणून कक्षाचे प्रमुख असलेल्या मानधनावरील अधिका-यांनी आयुक्तांकडे हट्ट धरला होता. त्यांचा हट्ट पुर्ण करण्यासाठी चक्क पार्किंगमध्ये कार्यालय थाटले आहे.

हे कार्यालय थाटताना 'अ' क्षेत्रीय कार्यालयाच्या स्थापत्य कार्यकारी अभियंता राजेंद्र शिंदे (Rajendra Shinde) यांनी आयुक्त शेखर सिंह (Shekhar Singh) यांनी केलेल्या तोंडी आदेशानूसार हे कार्यालय बांधले असल्याचे सांगितले. पण, हे कार्यालय बांधताना बांधकाम विभागाची कुठलीही परवानगी घेतली नसून परवानगीसाठी आम्ही प्रस्ताव पाठविणार असल्याचेही त्यांनी सांगितले. याबाबत आपत्ती व्यवस्थापन व नियंत्रण कक्षाचे सह आयुक्त चंद्रकांत इंदलकर यांच्यासह शहर अभियंता हे पार्किंगमधील अनधिकृत कार्यालयाबाबत बोलण्यास नकार देत आहेत.

प्रशस्त कार्यालय हवे म्हणून ...
महापालिकेच्या उपहारगृहासमोर आपत्ती व्यवस्थापन व नियंत्रण कक्षाचे स्वतंत्र कार्यालय आहे. त्या कार्यालयात आपत्ती व्यवस्थापन अधिकारी ओमप्रकाश बहिवाल हे गेल्या सात ते आठ वर्षांपासून मानधनावर कार्यरत आहे. त्यांसह एक लिपिक, शिपाई, वाहनचालक आणि फिरण्यासाठी दिमती स्वतंत्र वाहनाची व्यवस्था केलेली आहे. एवढे सगळे असताना त्यांना प्रशस्त आणि स्वतंत्र फर्निचर सह कार्यालयाची आवश्यकता लागली. त्यानूसार आता चोवीस तास कार्यालयात कार्यरत राहून शहरातील परस्थितीवर नियंत्रण ठेवावे लागेल, असे सांगून महापालिकेच्या प्रवेशद्वारासमोर थेट पार्किंगमध्ये अनधिकृतपणे आपत्ती व्यवस्थापन व नियंत्रणाचे दूसरे कार्यालय थाटले जात आहे. त्यामुळे आपत्ती व्यवस्थापनाच्या नावाखाली लाखो रुपयांची उधळपट्टी हे मानधनावरील अधिकारी करु लागले आहेत.

Join Civic Mirror Whatsapp Group for Latest Update

Share this story

Latest