पिंपरी-चिंचवड: अंमलदारांना पोलीस आयुक्तांकडून शाबासकी

एमआयडीसी भोसरी पोलीस ठाण्याच्या हद्दीत शाहूनगर येथे एका सोसायटीमध्ये आग लागल्याची घटना सोमवारी (२० मे) दुपारी घडली. या घटनेत एमआयडीसी भोसरी पोलीस ठाण्यातील बीट मार्शलवरील दोन पोलिसांनी एका वृद्ध महिलेचे प्राण वाचवले.

पिंपरी-चिंचवड: अंमलदारांना पोलीस आयुक्तांकडून शाबासकी

शाहूनगर येथील आगीच्या दुर्घटनेत वाचवले वृद्ध महिलेचे प्राण; प्रशस्तिपत्र देऊन करण्यात आला दोघांचा सत्कार

एमआयडीसी भोसरी पोलीस ठाण्याच्या (MIDC Bhosari Police Station) हद्दीत शाहूनगर (Shahunagar) येथे एका सोसायटीमध्ये आग लागल्याची घटना सोमवारी (२० मे) दुपारी घडली. या घटनेत एमआयडीसी भोसरी पोलीस ठाण्यातील बीट मार्शलवरील दोन पोलिसांनी एका वृद्ध महिलेचे प्राण वाचवले. याबद्दल पोलीस आयुक्त विनयकुमार चौबे आणि अपर पोलीस आयुक्त वसंत परदेशी यांनी या पोलिसांना शाबासकी दिली. त्यांना प्रशस्तिपत्र देऊन त्यांचा सत्कार करण्यात आला.

सोमवारी दुपारी एक वाजताच्या सुमारास शाहूनगर येथील अरण्यम सोसायटीमध्ये एका सदनिकेत आग लागली. याबाबत नागरिकांनी डायल ११२ वर माहिती देत पोलिसांची मदत मागितली. त्यावेळी शाहूनगर परिसरात बीट मार्शलवर असलेले पोलीस शिपाई तानाजी बनसोडे आणि मच्छिन्द्र टिके यांनी घटनास्थळी धाव घेतली. सोसायटीमध्ये दुसऱ्या मजल्यावर आग लागली होती. आग लागलेल्या सदनिकेच्या खिडकीतून आगीचे लोट व धूर बाहेर येत होता. त्यामुळे बनसोडे यांनी तत्काळ पोलीस नियंत्रण कक्षाशी संपर्क करून अग्निशमन विभाग आणि पोलिसांची अधिकची कुमक मागवली. दरम्यान, दोघांनी सोसायटीत असलेले गॅस कनेक्शन बंद केले. त्यानंतर त्यांना माहिती मिळाली की, सोसायटीच्या आत काही लोक अडकले आहेत. टिके यांनी सोसायटीच्या पार्किंगमधील वाहने आणि जमलेल्या लोकांना सोसायटीमधून बाहेर काढले. बनसोडे स्वतः जिन्याने आग लागलेल्या सदनिकेत गेले. तिथे त्यांना एक वृद्ध महिला मदतीच्या प्रतीक्षेत असल्याचे दिसले. त्यांनी महिलेला खांद्यावर उचलून घेतले. बाहेर पडत असताना आगीच्या ठिकाणी गॅसची एक टाकी दिसली. गॅसची टाकी आगीच्या भक्ष्यस्थानी सापडली तर मोठी दुर्घटना घडण्याची शक्यता लक्षात घेत एका खांद्यावर वृद्ध महिला आणि दुसऱ्या हातात गॅस सिलेंडर घेऊन खाली आले. त्यांनी वृद्ध महिलेला पार्किंगमध्ये सुरक्षित ठिकाणी सोडून तिचे प्राण वाचवले.

आगीच्या भीतीने आणखी काही लोक इमारतीच्या छतावर गेल्याचे त्यांना समजले. त्यामुळे बनसोडे यांनी पुन्हा इमारतीच्या छतावर जाऊन तिथल्या नागरिकांना सुखरूप खाली आणले. दुसरा सिलेंडर देखील बाहेर काढण्यात आला. त्यानंतर अग्निशमन दलाच्या जवानांनी आगीवर पाणी मारून आग विझवली.

बनसोडे आणि टिके यांनी दाखवलेल्या प्रसंगावधानामुळे मोठी दुर्घटना टळली. याबद्दल पोलीस आयुक्त विनयकुमार चौबे यांनी दोन्ही पोलिसांचा प्रशस्तिपत्र आणि पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला.

Join Civic Mirror Whatsapp Group for Latest Update

Share this story

Latest