पिंपरी-चिंचवड: शहराला कॅन्सर हॉस्पिटलची प्रतीक्षा; थेरगाव रुग्णालयाजवळ जागा निश्चित, मात्र विविध कारणांमुळे गती मिळेना

पिंपरी-चिंचवड: शहरात 'पीपीपी' तत्त्वावर होणाऱ्या कॅन्सर हॉस्पिटलची अद्याप प्रतीक्षाच आहे. चार जणांनी हॉस्पिटल उभारण्यासाठी प्रतिसाद दिला आहे. मात्र लोकसभेची आचारसंहिता, निधीची तफावत यासह विविध कारणांनी या कामाला अद्याप गती मिळताना दिसत नाही.

संग्रहित छायाचित्र

पिंपरी-चिंचवड: शहरात 'पीपीपी' तत्त्वावर होणाऱ्या कॅन्सर हॉस्पिटलची अद्याप प्रतीक्षाच आहे. चार जणांनी हॉस्पिटल उभारण्यासाठी प्रतिसाद दिला आहे. मात्र लोकसभेची आचारसंहिता, निधीची तफावत यासह विविध कारणांनी या कामाला अद्याप गती मिळताना दिसत नाही. त्यामुळे कॅन्सर रुग्णांना उपचारासाठी आणखी प्रतीक्षाच करावी लागणार आहे.

पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या वैद्यकीय सुविधा या उच्च दर्जाच्या आहेत. गेल्या काही वर्षांत कॅन्सरग्रस्त रुग्णांची संख्या सातत्याने वाढत आहे. मात्र, कॅन्सरग्रस्त रुग्णांसाठी उपचाराची पालिकेच्या रुग्णालयात सोय उपलब्ध नाही. त्यामुळे पालिकेच्या वतीने गेल्या अनेक वर्षांपासून कॅन्सर रुग्णालय उभारण्याचे नियोजन आहे. थेरगावमध्ये 'पीपीपी' तत्त्वावर रुग्णालय उभारण्याचे नियोजन आहे. शहरातील गोर-गरीब कॅन्सरग्रस्त रुग्णांना अल्प दरात उपचार मिळावेत, या उद्देशाने हे रुग्णालय उभारण्यात येणार आहे. यासाठी पालिकेच्या वैद्यकीय विभागाचे एक पथक सुरत शहरातील पीपीपी (पब्लिक प्रायव्हेट पार्टनरशिप) तत्त्वावर सुरू असलेल्या रुग्णालयाची पाहणी करण्यासाठी गेले होते. मात्र, त्याला अद्याप मुहूर्त मिळालेला नाही.

थेरगाव येथील रुग्णालयाच्या जवळ ३४ ते ३५ गुंठे जागा आहे. या जागेत 'पीपीपी' तत्त्वावर कॅन्सर रुग्णालय उभारण्याचे पालिकेचे नियोजन आहे. यासाठी निविदेची कार्यवाही करण्यात आली आहे. निविदा झाल्यापासून दीड ते दोन वर्षांत रुग्णालय उभारण्याचा मानस वैद्यकीय विभागाचा आहे. रुग्णालय झाल्यानंतर महापालिका ठरवून देईल, त्यानुसारच दर आकारणे बंधनकारक करण्यात येणार आहे. त्यासाठी चार ठेकेदारांनी पुढाकार घेतल्याचे विभागाच्या वतीने सांगण्यात आले आहे. निधीमध्ये तफावत आहे. त्यामुळे हे का काम थांबवण्यात आले आहे. त्याला गती कधी मिळणार हे पाहावे लागणार आहे.

निवडणुकांच्या आचारसंहितेचा अडथळा

सध्या लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे. त्यामुळे आचारसंहिता लागू झाली आहे. परिणामी कॅन्सर हॉस्पिटल उभारण्याची प्रक्रिया रखडली आहे. त्यानंतर विधानसभा आणि महापालिका निवडणुका लागण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. त्यामुळे कॅन्सर हॉस्पिटल उभारण्याला २०२५ चा मुहूर्त लागेल अशी परिस्थिती आहे. 

Join Civic Mirror Whatsapp Group for Latest Update

Share this story

Latest