संग्रहित छायाचित्र
विकास शिंदे
महापालिका हद्दीत महिलांच्या नावाने असलेल्या निवासी मिळकतींवर सामान्य करात ३० टक्के, दिव्यांगाना ५० टक्के सवलत देण्यात येणार आहे. माजी सैनिकांना १०० टक्के सवलत लागू आहे. यापूर्वी लाभ घेतलेल्या महिला, दिव्यांग आणि माजी सैनिकांना नव्याने अर्ज करण्याची गरज नाही. तसेच २०२४-२०२५ या आर्थिक वर्षाच्या अवघ्या दीड महिन्यात २५ टक्के मालमत्ताधारकांनी दोनशे कोटी रुपयांचा कर महापालिका तिजोरीत जमा केला आहे. त्यामुळे नागरिकांनी ३० जूनपर्यंत विविध मालमत्ताकर सवलतीच्या लाभ घ्यावा, असे आवाहन आयुक्त तथा प्रशासक शेखर सिंह यांनी केले आहे.
पिंपरी चिंचवड शहरात निवासी, व्यावसायिक, औद्योगिक, मोकळ्या जमीन, मिश्र अशा ६ लाख २८ हजार मालमत्ता आहेत. नागरिकांना मालमत्ताकराचा घरबसल्या भरणा करता यावा, यासह सर्व सेवा सुविधा ऑनलाइन उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. ३० जूनपर्यंत कराचा भरणा करणाऱ्या नागरिकांसाठी विविध सवलती जाहीर करण्यात आल्या आहेत. गतवर्षाप्रमाणे यंदाही महापालिकेने महिला बचत गटामार्फत बिलांचे वेळेत वाटप केले आहे. मालमत्ताधारकांना बिल मिळताच कर भरण्यास ते प्राधान्य देत आहेत. त्यामुळेच अवघ्या दीड महिन्यात १ लाख ८१ हजार ९६८ मालमत्ताधारकांनी तब्बल दाेनशे काेटी ३९ लाख रुपयांचा कर भरणा केला आहे.
या आहेत 'कर सवलत योजना'
पर्यावरणपूरक सोसायट्यांनी लाभ घ्यावा
शहरातील पर्यावरणपूरक हौसिंग सोसायट्यांनी सवलतीचा लाभ घेण्यासाठी लवकर अर्ज करावेत. जेणेकरून अशा सोसायट्यांना आगाऊ कर भरण्याचा आणि पर्यावरणपूरक सवलतीचा एकत्र लाभ घेता येईल.
२०२४- २०२५ या आर्थिक वर्षात २५ टक्के मालमत्ताधारकांनी तब्बल दाेनशे काेटी रुपयांचा कर भरणा केला आहे. तसेच मालमत्ताधारकांनी ३० जूनपर्यंत संपूर्ण कराचा भरणा केल्यास किमान दहा टक्के व कमाल २० टक्के सवलत देण्यात येत आहे. या सवलतींचा मालमत्ताधारकांनी लाभ घ्यावा. त्यानंतर लागणारे महिना दोन टक्के विलंब शुल्क टाळण्यासाठी नागरिकांनी आगाऊ कराचा भरणा करून महापालिकेला सहकार्य करावे.
- शेखर सिंह, आयुक्त, पिंपरी-चिंचवड महापालिका
गतवर्षी २०२३-२०२४ च्या पहिल्या तिमाहीत पन्नास टक्क्यांपेक्षा अधिक मालमत्ताधारकांनी विविध कर सवलतींचा लाभ घेत तब्बल ४४७ कोटी रुपयांचा कर भरणा केला होता. यंदाही दीड महिन्यात १ लाख ८१ हजार ९६८ जणांनी विविध कर सवलतींचा लाभ घेत कर भरला आहे.
- नीलेश देशमुख, साहाय्यक आयुक्त, कर आकारणी व कर संकलन विभाग
© Civic Mirror - Lexicon Broadcasting.
Licensor - Bennet and Coleman Co Ltd.