पिंपरी-चिंचवड: परवान्यांच्या चाचणीसाठी अर्जदारांच्या 'चकरा'; वाहन चाचणी दुसरीकडे हलवल्याने नागरिकांना नाहक त्रास

पिंपरी-चिंचवड प्रादेशिक परिवहन विभागाने (आरटीओ) वाहन चालवण्याच्या (अनुज्ञप्ती) चाचणीचे स्थळ बदलले आहे. यापूर्वी आरटीओपासून हाकेच्या अंतरावर असलेले स्थळ आता कासारवाडी आयडीटीआरला जोडले आहे.

संग्रहित छायाचित्र

मोशी आरटीओ ते कासारवाडी दरम्यान मारावे लागताहेत हेलपाटे,

पिंपरी-चिंचवड प्रादेशिक परिवहन विभागाने (आरटीओ) वाहन चालवण्याच्या (अनुज्ञप्ती) चाचणीचे स्थळ बदलले आहे. यापूर्वी आरटीओपासून हाकेच्या अंतरावर असलेले स्थळ आता कासारवाडी आयडीटीआरला जोडले आहे. मात्र, यामुळे प्रामुख्याने अर्जदारांचा संपूर्ण दिवस वाया जात असून, मोशी आरटीओ ते कासारवाडी अशा चकरा माराव्या लागत आहेत. या दरम्यान तो त्रास वाचावा यासाठी पुन्हा पूर्वीच्याच ठिकाणी चाचणी घ्यावी, अशी मागणी आता शहरातील मोटर ड्रायव्हिंग असोसिएशनने केली आहे, तर अर्जदारांनीदेखील हेलपाटे कमी व्हावे, अशी आशा व्यक्त करीत आहेत.

पिंपरी-चिंचवड आरटीओकडून दिवसाकाठी जवळपास तीनशे ते साडेतीनशे चाचण्या घेण्यात येतात. ५ एप्रिलपर्यंत आरटीओच्या जवळ असलेल्या महालक्ष्मी ट्रॅफिक पार्कमध्ये अनुज्ञप्ती चाचणी घेतली जात होती. मात्र अचानक उपप्रादेशिक परिवहन अधिकारी अतुल आदे यांनी ८ एप्रिलपासून ते स्थळ नाशिक फाटा येथील आयडीटीआरला हलवले. तसे  परिपत्रक देखील काढले. त्यानुसार सोमवारपासून अनुज्ञप्ती चाचणी आयडीटीआरमध्ये सुरू झाली आहे. पण, अनेक अर्जदारांना अद्याप याची माहिती पोहोचली नसल्याने ते आरटीओ कार्यालयात येत आहेत. त्यामुळे पुन्हा तेथून त्यांना नव्या ठिकाणी जाण्याची वेळ येते. तर, कागदपत्रांची पूर्तता व प्रक्रियेसाठी मोशी आरटीओ येथे यावे लागते. तेथून पुन्हा आयडीटीआरमध्ये पोहोचावे लागते. अशाप्रकारे अर्जदारांना एकाच दिवशी हेलपाटे मारावे लागतात. परिणामी, त्यांचा संपूर्ण दिवस या कामासाठी लागत आहे. यासाठी शहरातील काही मोटर ड्रायव्हिंग असोसिएशन संस्था आरटीओ अधिकाऱ्यांकडे पुन्हा पूर्वीच्या ठिकाणी अनुज्ञप्ती चाचणी घेण्याची मागणी करत आहेत.

महालक्ष्मी ट्रॅफिक पार्कमध्ये चाचणी देताना 'ट्रॅक फी'च्या नावाखाली परवाना काढण्यास आलेल्यांकडून दुचाकीसाठी २० रुपये, तीनचाकी ३० रुपये आणि खासगी चारचाकीसाठी २०० रुपये आकारले होते. यानंतर आता ड्रायव्हिंग स्कूल चालकांकडूनही शुल्क आकारण्याची सुरुवात करण्यात येणार होती. त्यामुळे हे चाचणी केंद्र हलवण्यात आल्याचे सांगण्यात येते. मात्र त्याचा त्रास अर्जदारांना होत आहे.

वाहन चाचणी घेण्यासाठी नेहमीप्रमाणे मोशी आरटीओचे गेलो होतो. तेथून पुन्हा नाशिक फाटा येथील आयडीटीआरमध्ये जाण्यास सांगितले. त्यामुळे वेळ आणि पैशाचा देखील अपव्यय झाला.
— शिवानंद चौगुले, अर्जदार

आरटीओ येथे सर्व कामकाज असल्याने अर्जदार ठिकाणी येतात. पुन्हा त्यांना तिथे घेऊन जावे लागते. पैसे देऊनही त्रास वाढला आहे. कार्यालयाशेजारी असल्यामुळे पूर्वीच्या ठिकाणीच पुन्हा अनुज्ञप्ती चाचणी घेण्यात यावी. अशी आमच्या सगळ्याच ड्रायव्हिंग स्कूल चालकांची मागणी आहे.
— सुनील बर्गे, अध्यक्ष, न्यू मोटर ड्रायव्हिंग असोसिएशन, पिंपरी-चिंचवड

वाहन परवान्यासंदर्भात सर्व प्रक्रिया ही ऑनलाइन असल्याने अर्जदारांना त्यासाठी मोशी कार्यालयात येण्याची गरज नाही. त्यांना थेट वाहन चाचणी केंद्रावर जाता येईल.
— अतुल आदे, उपप्रादेशिक परिवहन अधिकारी, पिंपरी-चिंचवड

Join Civic Mirror Whatsapp Group for Latest Update

Share this story

Latest