Pimpri Chinchwad: क्रिएटिव्ह स्कूलचे सीबीएसई 'ना हरकत' प्रमाणपत्र बनावट

पिंपरी चिंचवड: दहावीतील विद्यार्थिनींवर वारंवार बलात्कार केल्याचा धक्कादायक प्रकार क्रिएटिव्ह अकॅडमीच्या (Creative Academy) स्कूलमध्ये उघडकीस आल्यानंतर संबंधितांवर गुन्हा दाखल झाला आहे. मात्र, आकुर्डीमधील क्रिएटिव्ह

संग्रहित छायाचित्र

शिक्षण विभागाच्या आदेशानंतरही रावेत पोलिसांकडून गुन्हा दाखल नाही, पोलीस आणि शिक्षण विभागाची टोलवाटोलवी

पिंपरी चिंचवड: दहावीतील विद्यार्थिनींवर वारंवार बलात्कार केल्याचा धक्कादायक प्रकार क्रिएटिव्ह अकॅडमीच्या (Creative Academy) स्कूलमध्ये उघडकीस आल्यानंतर संबंधितांवर गुन्हा दाखल झाला आहे. मात्र, आकुर्डीमधील क्रिएटिव्ह एज्युकेशनल सोसायटी संचालित पब्लिक स्कूल अॅन्ड ज्युनिअर काॅलेजच्या संस्थाचालकांकडे केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाचे (सीबीएसई) 'ना हरकत' प्रमाणपत्रच बनावट असल्याचे आढळून आले आहे. त्यामुळे क्रिएटिव्ह स्कूलविरोधात गुन्हा दाखल करावा, असे आदेश शासनाच्या शालेय शिक्षण व क्रीडा विभागाने १४ जुलै २०२२ रोजी दिले होते. या आदेशानंतर अठरा महिने उलटले तरीही शाळेविरोधात गुन्हा दाखल झालेला नाही. पालिकेच्या शिक्षण विभागाकडून रावेत पोलिसांकडे गुन्हा दाखल करण्यासाठी गेल्यानंतर केवळ तक्रार अर्ज दाखल करून घेतला आहे. त्यामुळे आता या विषयावर रावेत पोलीस आणि शिक्षण विभागाकडून टोलवाटोलवी सुरू आहे.

आकुर्डी येथील क्रिएटिव्ह एज्युकेशनल सोसायटी संचालित पब्लिक स्कूल अॅन्ड ज्युनिअर काॅलेज हे दहा वर्षांपासून सुरू आहे. पहिली ते बारावी असे प्राथमिक, माध्यमिक आणि ज्युनिअर काॅलेज चालवले जात आहे. त्यात आठवी ते बारावी ही निवासी स्कूल असून ते सीबीएसई पॅटर्ननुसार चालवले जात आहे. मात्र, सदरील स्कूलचे सीबीएसईचे प्रमाणपत्र हे शासनाने दिलेले नाही. त्या संस्थाचालकांकडे असणारे सीबीएसईचे 'ना हरकत' प्रमाणपत्र शासन पडताळणीत बनावट असल्याचे आढळून आले आहे.  

शालेय शिक्षण व क्रीडा विभागाने राज्य मंडळाव्यतिरिक्त इतर मंडळाच्या अभ्यासक्रमाशी संलग्न होणाऱ्या शाळांना 'ना हरकत' प्रमाणपत्र देण्याची कार्यवाही शासन स्तरावरून करण्यात येते. मात्र, काही खासगी व्यक्ती आणि संस्थाचालक यांच्याकडे सीबीएसई शाळेचे 'ना हरकत' प्रमाणपत्र बनावट असल्याचे आढळून आले आहे.

रावेत येथील क्रिएटिव्ह एज्युकेशनल सोसायटी संचालित पब्लिक स्कूल अॅन्ड ज्युनिअर काॅलेजकडील बनावट प्रमाणपत्राच्या  अनुषंगाने अज्ञात व्यक्तीविरोधात एफआयआर पोलीस ठाण्यात दाखल करावा, असे आदेश १४ जुलै २०२२ रोजी शालेय शिक्षण विभागाचे उप सचिव समीर सावंत यांनी दिले होते. 

त्यानंतर पुणे शिक्षण उपसंचालक कार्यालयाकडून पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या शिक्षण प्रशासन अधिका-यांना १० जानेवारी २०२३ रोजी दिलेल्या पत्रानुसार सदरील शाळेच्या विरोधात गुन्हा दाखल करावा, आपल्या स्तरावरून उचित कार्यवाही करण्यात यावी, त्याचा अहवाल व केलेल्या कार्यवाहीचा अहवाल शासन आणि शिक्षण उपसंचालक कार्यालयात पाठवण्यात यावा, असे आदेश शिक्षण उपसंचालक औदुंबर उकिरडे यांनी दिले होते. शासनाने दिलेल्या आदेशानुसार महापालिकेच्या शिक्षण विभागाच्या विभागीय पर्यवेक्षकांकडून शाळेची तपासणी करण्यात आली. त्यानुसार प्रमाणपत्र रद्द ठरवले आहे.

शाळेच्या बनावट प्रमाणपत्राच्या अनुषंगाने अज्ञात व्यक्तीविरोधात रावेत पोलिसांकडे प्रथम माहिती अहवाल (एफआयआर) दाखल करण्यास सहायक प्रशासन अधिकारी रजिया खान या गेल्या होत्या. त्यांनी रावेत पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक यांना १६ मे २०२३ रोजी तक्रारी अर्ज दिला. त्यात तक्रारी अर्जाद्वारे गुन्हा दाखल करण्याची मागणी केलेली आहे. या मागणीलाही आठ महिने होऊन गेले आहेत. रावेत पोलीस स्टेशनच्या वरिष्ठ पोलीस अधिका-यांनी साधा एफआयआर नोंदवलेला नाही. उलट सहायक प्रशासन अधिकारी यांच्याकडून केवळ तक्रारी अर्ज दाखल करून घेतला आहे. 

क्रिएटिव्ह पब्लिक इंग्लिश मिडियम स्कूलचे 'ना हरकत' प्रमाणपत्र बोगस असतानाही पोलिसांनी अद्याप गुन्हा दाखल केलेला नाही. तसेच महापालिकेच्या शिक्षण विभागाकडून तक्रार अर्ज दिल्यानंतर त्यांनी प्रकरणाचा गुन्हा दाखल करण्यास पाठपुरावा घेतलेला नाही. त्यामुळे महापालिका शिक्षण विभाग आणि रावेत पोलिसांकडून संबंधित संस्थेविरोधात गुन्हा दाखल करण्यास एकमेकांवर टोलवाटोलवी करू लागल्याचे दिसून येत आहे.  

मान्यता रद्द प्रस्ताव सादर करणार

दहावीतील विद्यार्थिनीवर वारंवार बलात्कार केल्याचा धक्कादायक प्रकार क्रिएटिव्ह स्कूलमध्ये उघडकीस आला. त्यामुळे महापालिका शिक्षण विभाग खडबडून जागे झाले आहे. शिक्षण विभागाचे प्रशासन अधिकारी संजय नाईकडे यांनी शनिवारी (३ फेब्रुवारी) स्कूलमध्ये प्रत्यक्षात जाऊन स्थळपाहणी पंचनामा करण्यात आला. त्यात अनेक त्रुटी आढळून आल्या आहेत. सदर शाळेची मान्यता काढण्यासाठी चार जणांची समिती नियुक्त करून त्याचा अहवाल तयार करण्यात येत आहे. रावेत पोलिसांकडून गुन्हा दाखल झालेली एफआयआर, यापूर्वी घडलेल्या लैंगिक घटनांचा आढावा घेतला आहे. तेथील निवासी मुलींचे जाब-जबाब घेण्यासाठी तीन महिला शिक्षकांची समिती करून त्यांचे अहवाल घेतले जात आहेत. लैंगिक अत्याचाराची घटना, शाळेची इमारत दाखवून तिसऱ्या मजल्यावर मुलींचे वसतिगृह सुरू केले आहे. त्यासाठी शिक्षण विभागाची परवानगी घेतलेली नाही. फायर ऑडिट सर्टीफिकेट नाही. खुले मैदान नाही. वर्ग खोल्या कमी आहेत. हे सर्व एकत्रित करून गुन्हा दाखल केलेले कागदपत्र, अहवाल घेऊन शाळा मान्यता रद्द करण्याचा प्रस्ताव शिक्षण उपसंचालक, पुणे यांच्याकडे मंगळवारी (६ फेब्रुवारी) सादर करणार आहे, अशी माहिती पिंपरी चिंचवड महापालिकेच्या शिक्षण विभागाचे प्रशासन अधिकारी संजय नाईकडे यांनी दिली. क्रिएटिव्ह स्कूल वसतिगृहात राहणा-या मुलींच्या काही पालकांनी मुलींना घरी घेऊन जाणार असल्याचे सांगितले आहे. जेव्हा परीक्षा असेल, तेव्हा त्या मुली केवळ परीक्षेला येणार आहेत. शाळेच्या बनावट प्रमाणपत्रासंदर्भात संबंधितांवर गुन्हा दाखल करण्यासाठी रावेत पोलिसांना अजून एक पत्र देणार असल्याचेही  संजय नाईकडे म्हणाले आहेत.

Join Civic Mirror Whatsapp Group for Latest Update

Share this story

Latest