पिंपरी-चिंचवड: अनधिकृत होर्डिंग प्रकरणी २४ जणांवर गुन्हा दाखल ; खासदार पुत्रासह, म्हाडा तसेच राजकीय व्यक्तींचा समावेश

अनधिकृत जाहिरात फलक धारकांविरोधात पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेने कारवाई करण्या बरोबरीनेच फलक लावणाऱ्यांवर गुन्हे दाखल केले असून यामध्ये खासदार श्रीरंग बारणे यांचा मुलगा प्रताप बारणे, राष्ट्रवादी काँग्रेसचे भाऊसाहेब भोईर यांचा मुलगा हर्षवर्धन भोईर त्याचबरोबर म्हाडा आणि अन्य बांधकाम व्यावसायिक तसेच जाहिरात एजन्सीचा समावेश आहे.

संग्रहित छायाचित्र

आतापर्यंत २० फलकांवर निष्कासनाची कारवाई

अनधिकृत जाहिरात फलक धारकांविरोधात पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेने कारवाई करण्या बरोबरीनेच फलक लावणाऱ्यांवर गुन्हे दाखल केले असून यामध्ये खासदार श्रीरंग बारणे यांचा मुलगा प्रताप बारणे, राष्ट्रवादी काँग्रेसचे भाऊसाहेब भोईर यांचा मुलगा हर्षवर्धन भोईर त्याचबरोबर म्हाडा आणि अन्य बांधकाम व्यावसायिक तसेच जाहिरात एजन्सीचा समावेश आहे. मानवी जीवितास तसेच इतरांच्या सुरक्षेस धोका निर्माण होईल अशा बेदरकारपणे हे फलक लावले म्हणून गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

महापालिकेने नुकत्याच केलेल्या शहरातील अनधिकृत जाहिरात फलक सर्वेक्षणात आढळून आलेल्या २४ बेकायदेशीर जाहिरातफलक धारक, जाहिरात धारक तसेच जागा मालक यांच्यावर भारतीय दंड संहिता १८६० अंतर्गत कलम ३३६, महाराष्ट्र मालमत्ता विरूपणास प्रतिबंध अधिनियम १९९५ अंतर्गत कलम ३, महानगरपालिका अधिनियम १८८८ अंतर्गत कलम २४४ आणि २४५ या कलमांतर्गत पिंपरी पोलीस ठाणे येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. महापालिकेच्या आकाशी न विभागातील अधिकाऱ्याने याबाबत फिर्याद दिली आहे.

जाहिरातफलक धारकांसमवेत झालेल्या बैठकीत आयुक्त शेखर सिंह यांनी अनधिकृत जाहिरात फलक हटवण्यासाठी फलकधारकांना सूचित केले होते. १५ ते २० मे २०२४ या कालावधीत महापालिकेने अनधिकृत जाहिरात फलक सर्वेक्षण केले त्यामध्ये २४ अनधिकृत जाहिरात फलक आढळून आले. महापालिकेने आतापर्यंत केलेल्या निष्कासनाच्या कारवाईमध्ये शहरातील एकूण २० अनधिकृत जाहिरात फलक हटविण्यात आले आहेत. त्यामध्ये ९ फलक महापालिकेच्या वतीने निष्कासित करण्यात आले असून ११ अनधिकृत फलक स्वत: फलक धारकांच्या वतीने हटविण्यात आले आहेत.

आयुक्त शेखर सिंह म्हणाले, सर्वेक्षणामध्ये आढळून आलेल्या सर्व अनधिकृत फलकधारकांवर गुन्हे दाखल करण्यात आले असून सर्व अनधिकृत फलक निष्कासित करण्याची कारवाई सुरू आहे. महापालिकेच्या वतीने फलकधारकांसाठी नवीन स्ट्रक्चरल ऑडिट फॉरमॅट लागू करण्यात येणार आहे. यामुळे जाहिरातफलक धारक शासनाने दिलेल्या नियमांचे पालन करू शकतील आणि सुरक्षित जाहिरात फलक उभारण्याची जबाबदारी टाळू शकणार नाहीत. जाहिरातफलकांचे नियमित सर्वेक्षण आणि अनधिकृत फलकांवर होणारी कारवाई ही निरंतर प्रक्रिया असून ती पुढेही सुरूच राहणार आहे. तशा कारवाई सूचना सर्व क्षेत्रीय अधिकाऱ्यांना देण्यात आल्या आहेत. सह आयुक्त चंद्रकांत इंदलकर म्हणाले, अनधिकृत फलक निष्कासित करणे आणि फलक धारक, जाहिरात धारक तसेच जागा मालकांवर गुन्हा दाखल करणे हे शहरातील नागरी सुव्यवस्था आणि सुरक्षितता टिकवून ठेवण्यासाठी महापालिकेच्या वतीने उचलण्यात आलेले महत्वपुर्ण पाऊल आहे.

२४ अनधिकृत जाहिरात फलकांसोबत वाढीव ३४१ जाहिरात फलकही सर्वेक्षणात आढळून आले आहेत. या जाहिरात फलक धारकांना फलकाचे आकारमान सुधारण्याबाबत नोटीसा देण्याची प्रक्रिया आजपासून सुरू करण्यात आली असून फलकाचे आकारमान नियमानुसार बदलले नाही तर फलक हटविण्याची कार्यवाही केली जाणार आहे, अशी माहिती उप आयुक्त संदीप खोत यांनी दिली. दरम्यान, मागील आठवड्यात १६ मे रोजी मोशी येथे होर्डिंग कोसळल्यानंतर महापालिकेच्या वतीने एमआयडीसी भोसरी पोलिस ठाण्यात दोन व्यक्तींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला होता.

... अन्यथा होणार कायदेशीर कारवाई

जागामालक, जाहिरातधारक यांनी कोणत्याही खासगी जागेमध्ये किंवा सार्वजनिक ठिकाणी लोखंडी स्ट्रक्चरवर होर्डिंग बसवताना जाहिरातफलक धारकाच्या हलगर्जीपणामुळे कोणतीही जिवीत किंवा वित्तहानी होणार नाही याची काळजी घ्यावी. तसेच जाहिरात धारकाने महानगरपालिकेच्या हद्दीमध्ये जाहिरातफलक बसवताना आकाशचिन्ह व परवाना विभागाकडून रितसर परवानगी घेतलेली आहे की नाही याची खातरजमा करावी. परवानगी घेतली नसल्यास किंवा नियमांचे उल्लंघन केलेले आढळल्यास संबंधित जाहिरात धारक, जागामालक तसेच फलकधारकावर कायदेशीर कारवाई केली जाईल.

गुन्हा दाखल झालेल्यांची नावे

वाघेरे प्रमोटर्स, जे के बिल्डर्स, व्ही अपटाउन, सुखवानी अरतूज, यशोधन पब्लिसिटी, शुभांगी ॲडव्हर्टायझिंग, शिवशंकर ॲडव्हर्टायझिंग, जे.के. बिल्डर्स, म्हाडा (ताथवडे वाकड), हॉटेल कामत, आनंद पब्लिसिटी (३ ठिकाणे), निनावी, शुभांगी ॲडव्हर्टायझिंग, बालाजी फर्निचर, धनंजय काळभोर, स्पाईन सिटी, झरेकर, कॅस्टर गेट, प्रताप बारणे, गणेश इंटरप्राईजेस (२ ठिकाणे), हर्षवर्धन भोईर.

Join Civic Mirror Whatsapp Group for Latest Update

Share this story

Latest