संग्रहित छायाचित्र
(विकास शिंदे)
पिंपरी चिंचवड: जळीतग्रस्तांवर तातडीने उपचार व पुनर्वसन करण्यासाठी महापालिकेच्या वतीने जळीत कक्ष जुन्या तालेरा रुग्णालयात (Talera Hospital) उभारण्यात येणार आहे. त्यासाठी जळीत कक्षाचा दर्जा, क्षमता आणि सोयींसुविधांबाबत आराखडा तयार करण्यासाठी अनुभवी तज्ज्ञांची मदत घेतली जात आहे. हा कक्ष अत्याधुनिक सुविधांनी सुसज्ज असणार आहे. बर्न वाॅर्ड चिंचवडमधील जुन्या तालेरा रुग्णालयात उभारण्यात येईल, अशी माहिती आयुक्त तथा प्रशासक शेखर सिंह यांनी शनिवारी (३ फेब्रुवारी) पत्रकार परिषदेत दिली. (Pimpri Chinchwad News)
महापालिकेच्या वतीने घेतलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी जनसंपर्कचे विशेष कार्यकारी अधिकारी किरण गायकवाड, सुरक्षा विभागाचे मुख्य अधिकारी उदय जरांडे आदी उपस्थित होते. आयुक्त शेखर सिंह म्हणाले की, जळीत कक्षाच्या जागेसाठी महापालिका वैद्यकीय अधिकारी आणि तज्ज्ञांमार्फत महापालिकेचे आकुर्डी रुग्णालय, यशवंतराव चव्हाण स्मृती रुग्णालय, थेरगाव रुग्णालय तसेच जुन्या तालेरा रुग्णालयाची पाहणी करण्यात आली. या पाहणीदरम्यान जुन्या तालेरा रुग्णालयाची जागा प्राथमिकदृष्ट्या योग्य वाटली असून त्यादृष्टीने विचार सुरू आहे.
जळीत कक्षाची रचना आणि तेथील अत्याधुनिक सोयीसुविधा, मनुष्यबळ आदींबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली. जळीत कक्षासाठी महापालिका रुग्णालयाच्या संरचनेमध्ये फेरबदल, नूतनीकरण किंवा सुधारणा करण्यात येणार आहे. तसेच अत्याधुनिक उपचारांसोबत प्लास्टिक सर्जरीची सुविधाही पीडितांना उपलब्ध करून देण्याचा मानस आहे, जुन्या तालेरा रुग्णालयात बर्न वाॅर्ड उभारण्याची तयारी अंतिम टप्प्यात आहे. बर्न वॉर्डात जंतुसंसर्ग नियंत्रण यंत्रणा असते. त्यामुळे इतर रुग्णांना त्यांचा संसर्ग होऊ नये म्हणून या रुग्णालयात बर्न वाॅर्ड तयार करण्यात येत आहे. याकरिता पुरुष आणि महिला स्वतंत्र कक्ष असणार आहेत. त्यात १८ जनरल बेड आणि ६ आयसीयू बेड असणार आहेत, असेही सिंह म्हणाले.
वायसीएममध्ये लवकरच व्यवस्थापकाची नेमणूक
महापालिकेच्या प्रशासकीय तसेच रुग्णालयीन कामकाजाच्या सोयीच्या दृष्टीने सध्या बदल करण्यात आले आहेत. वायसीएम रुग्णालयात (YCM Hospital) लवकरच व्यवस्थापनासाठी व्यवस्थापकाची नेमणूक करण्यात येणार आहे. वायसीएमच्या कामांमध्ये सुसूत्रता यावी, यासाठी महापालिकेचे अतिरिक्त आरोग्य वैद्यकीय अधिकारी यांना विभागाचे प्रमुख म्हणून जबाबदारी देण्यात आली आहे. मात्र, अधिष्ठात्यांचे काम वाईट आहे, असे अजिबात नाही. त्यांना पदव्युत्तर विभागात संपूर्ण लक्ष देण्यात यावे, यासाठी हे बदल करण्यात आले आहेत. तिथे काही दैनंदिन कामकाज पाहण्यासाठी पालिकेच्या वतीने व्यवस्थापक दर्जाचे पद निर्माण करून तशी नेमणूक करण्याचा विचार असल्याचे आयुक्त शेखर सिंह यांनी सांगितले.
© Civic Mirror - Lexicon Broadcasting.
Licensor - Bennet and Coleman Co Ltd.