पिंपरी-चिंचवड : जागतिक पर्यावरणदिनी भाजपने लावली ७ हजार देशी झाडे
विकास शिंदे :
पिंपरी-चिंचवडकरांच्या अवतीभवती सदा वृक्षराजी बहरलेली असावी, यासाठी भाजप शहराध्यक्ष शंकर जगताप यांच्या संकल्पनेतून जागतिक पर्यावरणदिनानिमित्त बुधवारी ५ जून रोजी शहरात ७ हजार झाडे लावण्यात आली. पक्षाच्या प्रत्येक बूथ प्रमुखाच्या माध्यमातून त्या-त्या भागात पाच झाडांची लागवड करून हा वृक्षारोपणाचा कार्यक्रम घेण्यात आला. शहरात शुद्ध हवा आणि ऑक्सिजनचे प्रमाण वाढविण्यासाठी वड, पिंपळ, चिंच, कडुनिंब, उंबर यांसारख्या देशी झाडांची लागवड करून ते झाड बूथप्रमुखांनी दत्तक घेतले, अशी माहिती शंकर जगताप यांनी दिली.
जल, जमीन आणि जंगल हे पर्यावरणाचे कान, नाक आणि डोळे आहेत. यापैकी कोणत्याही घटकाला झालेली इजा पर्यावरणासाठी घातक ठरत आहे. वातावरणातील कार्बन डायऑक्साइड, कार्बन मोनॉक्साइड व मिथेन या वायूच्या प्रमाणात वाढ झाली आहे. पर्यावरण ही आज जगासमोरील ज्वलंत समस्या बनली आहे. निसर्ग संपत्तीचा ऱ्हास, पर्यावरण ऱ्हास, महापूर, चक्रीवादळे, दुष्काळ, जंगलातील वणवे, समुद्राच्या पाण्याच्या पातळीतील होणारी वाढ, ऋतुचक्रातील बदल, विविध प्रकारची महामारी अशा भयानक संकटांनी अनेक वनस्पती, पशू-पक्षी यांच्या जाती नष्ट होत असून, त्याची भयानकता मानवाच्या अस्तित्वावरही घाला घालत आहे. या निसर्गाची ‘इकोसिस्टीम’ पुन्हा एकदा प्रस्थापित करण्याचा संकल्प गरजेचा आहे. त्याचाच एक भाग म्हणून पिंपरी-चिंचवड भारतीय जनता पार्टीच्या वतीने जागतिक पर्यावरण दिनानिमित्त बुधवारी (५ जून) संपूर्ण शहरात ७ हजारहून अधिक झाडांची लागवड केली, असे शहराध्यक्ष शंकर जगताप यांनी सांगितले. शहरात विविध ठिकाणी झालेल्या या उपक्रमामध्ये सोसायटीधारक, ज्येष्ठ नागरिक संघ, महिला तसेच शहर भाजपाचे पदाधिकारी यांनी उत्स्फूर्त सहभाग घेतला.
देशी झाडांची लागवड…
शहरात भाजपचे १ हजार ४५० बूथप्रमुख आहेत. या प्रत्येक प्रमुखामार्फत त्या त्या भागात प्रत्येकी पाच झाडांची लागवड करण्यात आली. शहरात शुद्ध हवा आणि ऑक्सिजनचे प्रमाण वाढविण्यासाठी फक्त देशी झाडांचीच लागवड करण्यात आली. त्यामध्ये वड, पिंपळ, चिंच, कडुलिंब, उंबर यांसह अन्य देशी झाडांचा समावेश आहे. हवा शुद्ध करून ऑक्सिजनचे आणि पावसाचे प्रमाण वाढविण्यामध्ये देशी झाडांचा उपयोग होतो. त्यामुळे सर्व बूथप्रमुखांमार्फत देशी झाडे लावण्यात आली. तसेच या झाडांची लागवड करून बूथप्रमुखच ते दत्तक घेऊन संगोपन करणार असल्याचेही जगताप यांनी सांगितले.
© Civic Mirror - Lexicon Broadcasting.
Licensor - Bennet and Coleman Co Ltd.