पिंपरी-चिंचवड : बायोमेडिकल वेस्ट थेट नाल्यावर!
विकास शिंदे :
वाल्हेकरवाडी येथील हाॅटेल रानमळा रस्त्यावरील नाल्यालगत बायोमेडिकल वेस्ट मोठ्या प्रमाणात टाकला जात आहे. हा घातक कचरा उघड्यावर टाकला जात असून काही बायोमेडिकल कचरा नाल्यात पडत आहे. त्या नाल्याचे पाणी थेट पवना नदीत मिसळत असल्याने नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे.
महापालिका हद्दीतील वाल्हेकरवाडी या ठिकाणच्या हाॅटेल रानमळा रस्त्यावर नाल्यालगत मोठ्या प्रमाणात बायोमेडिकल कचरा टाकण्यात आला आहे. या ठिकाणी गोळ्या, औषधे, इंजेक्शन असा कचरा टाकला गेला आहे. हा कचरा मेडिकल दुकानांचा आहे अथवा रुग्णालयांतील आहे, याबाबत तर्कवितर्क लढवले जात आहेत. शहरातील रुग्णालये, दवाखाने येथील 'बायोमेडिकल वेस्ट' दररोज मोठ्या प्रमाणात निघत आहे. मात्र, हा घातक कचरा उघड्यावर किंवा रस्त्यालगत कुठेही टाकला जात असल्याचे दिसत आहे. महापालिकेने रुग्णालये, दवाखाने या ठिकाणचा बायोमेडिकल कचरा गोळा करण्यासाठी ठेकेदार नियुक्त केला आहे. आरोग्य वैद्यकीय विभागाने १५ वर्षांसाठी संबंधित ठेकेदाराला काम दिले आहे. शहरातील कचरा संकलन करून शास्त्रशुद्ध पद्धतीने हा नष्ट करण्याची जबाबदारी या ठेकेदारावर आहे. परंतु अनेकदा छोट्या क्लिनिक्समधील 'बायोमेडिकल वेस्ट' उघड्यावर सापडत असल्याचे स्पष्ट झाले आहे. गेल्या काही महिन्यांपासून हा प्रकार सर्रास सुरू आहे.
महापालिका हद्दीत अनेक रुग्णालय, दवाखाने, मेडिकल परिसरात फेरफटका मारला तर अनेक ठिकाणी बायोमेडिकल वेस्ट उघड्यावर टाकला जात दिसून येईल. त्यामुळे बायोमेडिकल वेस्ट कचरा संकलन करणाऱ्या ठेकेदाराच्या कामावरदेखील प्रश्नचिन्ह निर्माण होत आहे. वास्तविक महापालिकेने बायोमेडिकल वेस्टसाठी खासगी ठेकेदार कंपनीला काम दिले आहे. असे असतानाही रुग्णालये, दवाखाने या ठिकाणचा कचरा उघड्यावर पडल्याने ठेकेदाराचा निष्काळजीपणा समोर येऊ लागला आहे. बायोमेडिकल वेस्ट उघड्यावर फेकला जात असल्याने परिसरातील नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे.
याबाबत महापालिकेच्या आरोग्य विभागाकडून तत्काळ पाहणी करून संबंधितांवर योग्य कारवाई करण्यात येईल, असे अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आले.
रात्री टाकला जातो कचरा
महापालिकेच्या वैद्यकीय विभागाअंतर्गत नागरिकांना वैद्यकीय सुविधा पुरवण्यासाठी शहरात ३२ दवाखाने, तर आठ रुग्णालये आहेत. या रुग्णालयांमधील जैव-वैद्यकीय कचऱ्याची विल्हेवाट लावली जाते. त्यासाठी खासगी संस्थेची नियुक्ती केली आहे, पण खासगी रुग्णालयांकडून जैव-वैद्यकीय कचऱ्याची विल्हेवाट शास्त्रोक्त पद्धतीने लावली जात नाही. वाल्हेकरवाडी परिसरातील खासगी रुग्णालयांकडून उघड्यावर कचरा टाकला जातो. रात्रीच्या वेळी हा कचरा रस्त्यावर टाकण्यात येत असल्याचे दिसत आहे.
कचरा संकलनाकडे दुर्लक्ष
महापालिका ठेकेदार कंपनीच्या माध्यमातून शहरातील रुग्णालये, दवाखान्यातून बायोमेडिकल वेस्ट संकलनासाठी शुल्क आकारते. शुल्काची आकारणी दवाखान्यात बेडच्या संख्येनुसार केली जाते. परंतु, रुग्णालये, दवाखान्यातील घातक कचरा नियमित उचलला जातो, की नाही यावर मात्र महापालिकेच्या आरोग्य वैद्यकीय विभागाचे लक्ष नसल्याचे दिसून येत आहे
© Civic Mirror - Lexicon Broadcasting.
Licensor - Bennet and Coleman Co Ltd.