उड्डाणपुलासाठी तब्बल १४२ झाडांची कत्तल
पुणे-मुंबई जुन्या महामार्गावरून पिंपरी कॅम्प व पिंपरी गावात जाण्यासाठी महापालिकेच्या वतीने मिलिटरी डेअरी फार्म येथे उड्डाणपूल बांधण्यात येत आहे. या कामास अडथळा ठरणारी १४२ जुनी झाडे कापण्यात येणार आहेत. त्यासाठी महापालिका ८ लाख ९४ हजार ९२२ रुपये संरक्षण विभागाकडे भरणार आहे. (Slaughter of trees)
या उड्डाणपुलाचे काम ३१ मार्च २०२३ ला सुरू झाले आहे. या कामासाठी डेअरी फार्मची २४ हजार ११९.२६ चौरस मीटर जागा महापालिकेकडे हस्तांतरित करण्यात आली आहे. त्यासाठी महापालिकेने आवश्यक ते शुल्क संरक्षण विभागाकडे जमा केले आहे. या कामात १४२ झाडांचा अडथळा ठरत आहे. त्याबाबत उद्यान विभागाने परवानगीही दिली आहे. करारानुसार त्या झाडांचे वनपरिक्षेत्र अधिकार्यांनी मूल्यांकन केले आहे. त्यानुसार १४२ झाडांचे मूल्य ८ लाख ९४ हजार ९२२ इतके होते. ती रक्कम संरक्षण विभागाकडे वर्ग केली जाणार आहे. त्यामुळे काम विनाअडथळा सुरू ठेवता येणार आहे. या खर्चास आयुक्त तथा प्रशासक शेखर सिंह यांनी स्थायी समितीची मान्यता दिली आहे. त्यामुळे ती झाडे तोडण्यात येणार आहेत.
त्या बदल्यात संरक्षण विभागात झाडे लावली
डेअरी फार्म उड्डाणपुलासाठी अडथळा ठरणारी १४२ झाडे तोडण्यात येणार आहेत. त्याचे शुल्क संरक्षण विभागाकडे जमा करण्यात येत आहे. त्या बदल्यात महापालिकेने हजारो झाडे लावली आहेत. संरक्षण विभागाच्या दिघी, निगडी, औंध, देहूरोड कॅन्टोन्मेंट बोर्ड या भागांत महापालिकेने हजारो झाडे लावली आहेत.
- प्रमोद ओंबासे, सहशहर अभियंता, महापालिका
पिंपरी डेअरी फार्म येथील उड्डाणपुलाचे काम महापालिकेच्या सुरू केले आहे. या पुलाला अडथळा ठरणाऱ्या तब्बल १४२ झाडांची कत्तल करण्यात येणार आहे. मात्र , ही झाडे खूप जुनी आहेत. त्यामुळेच सर्व झाडांचे पुनर्रोपण करून अन्य ठिकाणी लावण्यात यावी. त्या झाडांवर कु-हाड चालवण्यात येऊ नये, या बाबत मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, पालकमंत्री, जिल्हाधिकारी यांना निवेदन देण्यात आले आहे.
- प्रशांत राऊळ , पर्यावरणप्रेमी नागरिक
© Civic Mirror - Lexicon Broadcasting.
Licensor - Bennet and Coleman Co Ltd.