पिंपरी-चिंचवड: बंड शमवण्यात अजित पवार अपयशी; शहर दौऱ्यानंतर विविध ठिकाणी लागले बंडाचे फ्लेक्स!

पिंपरी-चिंचवड: महायुतीतील बंड शमवण्यात उपमुख्यमंत्री तथा पालकमंत्री अजित पवार यांना अपयश आल्याचे चिंचवडमध्ये दिसून येत आहे. शहरातील विविध विकास कामांचे उद्घाटन आणि भूमिपूजन करण्यासाठी अजित पवार यांनी बुधवारी (९ ऑक्टोबर) दौरा केला.

Civic Mirror, सीविक मिरर, Pune Mirror, Pune Times Mirror, Pune, Pune News

बंड शमवण्यात अजित पवार अपयशी; दौऱ्यानंतर विविध ठिकाणी लागले बंडाचे फ्लेक्स!

पिंपरी-चिंचवड: महायुतीतील बंड शमवण्यात उपमुख्यमंत्री तथा पालकमंत्री अजित पवार यांना अपयश आल्याचे चिंचवडमध्ये दिसून येत आहे. शहरातील विविध विकास कामांचे उद्घाटन आणि भूमिपूजन करण्यासाठी अजित पवार यांनी बुधवारी (९ ऑक्टोबर) दौरा केला. त्यानंतर त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकारी-कार्यकर्त्यांची बैठक घेत महायुतीच्या उमेदवारांना विजयी करण्याबाबत सूचना केल्या. मात्र अजित पवार यांची पाठ वळताच त्यानंतर काही तासांतच चिंचवड विधानसभेतील इच्छुक उमेदवार नाना काटे यांनी ठिकठिकाणी फ्लेक्स लावत आपली बंडखोरी कायम ठेवली आहे.

चिंचवड विधानसभा मतदारसंघात भाजपचे विद्यमान आमदार आहेत. त्याचबरोबर गेल्या २२ वर्षांपासून दिवंगत लक्ष्मण जगताप कुटुंबीयांकडे आमदारकी आहे. दीड वर्षांपूर्वी जगताप यांचे निधन झाल्यानंतर पोटनिवडणुकीत जगताप यांच्या पत्नी अश्विनी जगताप या भाजपच्या चिन्हावर निवडून आल्या आहेत. पोटनिवडणुकीपूर्वी २०१९ मध्ये नाना काटे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसकडून चिंचवड विधानसभा निवडणूक लढवली होती. त्यात त्यांना पराभव पत्करावा लागला होता. त्यानंतर झालेल्या पोटनिवडणुकीत त्यांनी राष्ट्रवादीकडूनच निवडणूक लढवली मात्र अश्विनी जगताप यांचा विजय झाला होता.

आता पुन्हा नाना काटे चिंचवड विधानसभा निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक आहेत. दोन वेळा पराभव झाल्याने नाना काटे यांना उमेदवारी देण्याऐवजी राष्ट्रवादीमधूनच अन्य व्यक्तीला उमेदवारी द्यावी यासाठी काही नगरसेवक एकत्रित आले आहेत. या नगरसेवकांनीही वेळप्रसंगी महायुतीशी बंड करण्याचे जाहीर केले आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी नगरसेवक भाऊसाहेब भोईर हेही निवडणूक लढवण्यावर ठाम आहेत. बुधवारी शहरातील विविध विकासकामांचे उद्घाटन करतानाच पिंपळे सौदागर ते पिंपरीला जोडणाऱ्या नदीवरील पुलाचे लोकार्पण अजित पवार यांच्या हस्ते झाले यावेळी नाना काटे तेथे उपस्थित होते. सांगवी येथील निळू फुले सभागृहात अजित पवार यांनी बैठक घेत सगळ्यांना एकत्र आणले होते. चिंचवडमधून नाना काटे, पिंपरीमधून काळूराम पवार हे माजी नगरसेवक विधानसभा लढवण्यासाठी इच्छुक आहेत. पिंपरीत अण्णा बनसोडे हे राष्ट्रवादीचे आमदार आहेत, तर भोसरीसह चिंचवडमध्ये भाजपचे विद्यमान आमदार आहेत. भोसरीमध्ये सध्या तरी महायुतीमधून कोणी बंडखोरी करण्याची शक्यता दिसत नाही. परंतु, भोसरी विधानसभेमध्ये इच्छुक उमेदवार असणारे अजित गव्हाणे यांनी अजित पवार यांच्या गटाचे शहराध्यक्षपद सोडून राष्ट्रवादी शरद पवार गटात प्रवेश केला आहे, तर दुसरीकडे चिंचवड आणि पिंपरी विधानसभेत स्व-पक्षासह महायुतीमधून बंडखोरी होण्याची शक्यता आहे. वेळप्रसंगी महायुतीमधील इच्छुक महाविकास आघाडीत प्रवेश करीत निवडणूक लढवण्याची दाट शक्यता आहे. काटे हे स्वतः आता मी तुतारी फुंकणार असल्याचे सांगू लागले आहेत.

भोसरीतही फ्लेक्स वॉर
भोसरी विधानसभा मतदारसंघातही चिंचवडप्रमाणे फ्लेक्स वॉर पाहायला मिळत आहे. विद्यमान आमदार महेश लांडगे यांनी दहा वर्षांत काहीच काम केले नाही असे सांगत इच्छुक उमेदवार अजित गव्हाणे समर्थकांनी अनेक ठिकाणी फ्लेक्स लावले आहेत, तर याला प्रत्युतरात फ्लेक्स लावत मागील दहा वर्षातील केलेल्या कामांची यादी प्रसिद्ध केली आहे.

पिंपरीत महाविकास आघाडीत बिघाडी
शिवसेना उद्धव ठाकरे गटातून माजी नगरसेवक जितेंद्र ननावरे, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटातून माजी नगरसेविका सुलक्षणा शिलवंत यांच्यासह अन्य अनेक माजी नगरसेवक आणि अन्य पदाधिकारी इच्छुक आहेत. तर भाजपा माजी नगरसेविका सीमा साळवे या शरदचंद्र पवार गटातून इच्छुक असून, त्यांनी शरद पवार यांची नुकतीच भेट घेतली आहे.

Share this story

Latest