Crime in Pimpri-Chinchwad: पिंपरी-चिंचवडमध्ये वर्षभरात १५ हजार ९०९ गुन्ह्यांची नोंद; गतवर्षीपेक्षा ५६८ ने घटले गुन्हे

पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालया अंतर्गत २३ पोलीस ठाण्याच्या हद्दीत गेल्या वर्षभरात खून, दरोडा, चोर्‍या, लुटमार, फसवणूक, वाहनचोरी, बलात्कार, विनयभंग अशा तब्बल १५ हजार ९०९ गुन्ह्यांची नोंद झाली.

  • By PuneMirror Bureau
  • Reported By Desk User
  • Wed, 8 Jan 2025
  • 03:36 pm
Civic Mirror, सीविक मिरर, Pune Mirror, Pune Times Mirror, Pune, Pune News

संग्रहित छायाचित्र

पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालया अंतर्गत २३ पोलीस ठाण्याच्या हद्दीत गेल्या वर्षभरात खून, दरोडा, चोर्‍या, लुटमार, फसवणूक, वाहनचोरी, बलात्कार, विनयभंग अशा तब्बल १५ हजार ९०९ गुन्ह्यांची नोंद झाली. गेल्या पाच वर्षांत तब्बल ५ हजार ७६ ने गुन्ह्यांमध्ये वाढ झाली आहे. मात्र, गेल्या दोन वर्षांत पोलीसांनी राबवलेल्या विविध उपाययोजनांमुळे आयुक्तालय हद्दीतील गुन्ह्यांमध्ये तब्बल ५६८ ने घट झाली आहे.

पोलीस आयुक्त विनयकुमार चौबे यांनी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. यावेळी अपर पोलीस आयुक्त वसंत परदेशी, पोलीस उपायुक्त संदीप डोईफोडे, विवेक पाटील उपस्थित होते. पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयाअंतर्गत पिंपरी, निगडी, चिंचवड, भोसरी, एमआयडीसी-भोसरी, सांगवी, हिंजवडी, वाकड, दिघी, चिखली, चाकण, आळंदी, देहूरोड, तळेगाव - दाभाडे, तळेगाव एमआयडीसी, शिरगाव, रावेत, म्हाळूंगे आणि नव्याने निर्माण झालेल्या काळेवाडी, बावधन, दापोडी, संत तुकारामनगर आणि सायबर सेल अशा २३ पोलीस ठाण्यांचा समावेश आहे.

औद्योगिक कारखाने, आयटी पार्क यामुळे शहरात रोजगार मोठ्या प्रमाणात उपलब्ध असल्याने नोकरी-धंद्यानिमित्त येणार्‍या चाकरमान्यांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे. शहराची लोकसंख्या झपाट्याने वाढत असताना विस्तारही वाढत आहे. स्वतंत्र पोलीस आयुक्तालय सुरू झाले असले तरी संख्याबळ मात्र अपुरेच ठरत आहे. शहराचा विकास होताना तो नियोजनपुर्वक न झाल्याने दाट लोकवस्तीसह झोपडपट्ट्यांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे. याचा परिणाम गुन्हेगारीचे प्रमाणही प्रचंड आहे. हिंजवडी हद्दीत मोठी गावे असून आयटी पार्कसह औद्योगिक परिसरही असल्याने मजुरांची संख्या अधिक आहे. ऑनलाइन फसवणूक, अपघात, वाहनचोरीच्या गुन्ह्यांचे प्रमाण मोठे आहे. पिंपरीत मिश्र लोकवस्ती असून झोपडपट्टीची संख्याही अधिक आहे. गुन्हेगारी घटनांसह आपापासातील  भांडणातून गुन्हे दाखल होत असतात. टोळक्याकडून तोडफोडीच्या घटनाही घडल्या आहेत. वाकड हद्दीत मोठमोठ्या सोसायट्यांसह चार झोपडपट्टी आहेत. मारहाण, कौटूंबिक हिंसाचार, वाहनचोरी, फसवणूक यासारख्या गुन्ह्यांचे प्रमाण अधिक आहे. चाकण, महाळूंगे हा औद्योगिक परिसर असल्याने कंपन्यांची संख्याही अधिक आहे.

परराज्यातील लोक मोठ्या प्रमाणात वास्तव्यास असून कामगारांची संख्याही जास्त आहे. या ठाण्याच्या हद्दीत लूटमार, किरकोळ कारणांसह जमिनीच्या वादातून भांडण असे प्रकार वारंवार घडत असतात. सन २०२० मध्ये जानेवारी ते डिसेंबर या वर्षभराच्या कालावधीत खून, दरोडा, चोर्‍या, लुटमार, फसवणूक, वाहन चोरी, बलात्कार, विनयभंग, कौटूंबिक हिंसाचार अशा विविध तब्बल १० हजार ८३३ गुन्ह्यांची नोंद झाली. सन २०२३ मध्ये वर्षभरात गुन्ह्यांची संख्या १६ हजार ४७७ एवढी होती. म्हणजेच २०२० च्या तुलनेत २०२३ मध्ये ५ हजार ६४४ ने गुन्ह्यांची संख्या वाढल्याचे आकडेवारीवरून दिसून येत आहे. मात्र, पोलीस आयुक्त विनयकुमार चौबे यांनी १४ डिसेंबर २०२२ रोजी पदभार स्विकारल्यानंतर आयुक्तालय हद्दीतील गुन्हेगारांना दणका देण्यास सुरूवात केली. मोक्कांतर्गत ९९ टोळ्यांमधील सुमारे ६०० गुंडांना अटक केली. ४११ अग्निशस्त्रे व १६३३ धारदार शस्त्रे जप्त केली. ५५५ गुन्हेगारांना तडीपार करून ४७ संशयितांवर स्थानबद्धतेची कारवाई केली. 

वाहनचोरीच्या घटना रोखण्यासाठी ज्या ठिकाणी वाहनचोरीचे प्रमाण जास्त आहे अशा ठिकाणी कर्मचार्‍यांची गस्त वाढवली. सीसीटीव्ही बसवण्यावर भर दिला. त्यामुळे गेल्या वर्षीच्या तुलनेत वाहनचोरीच्या गुन्ह्यातही ८९ ने घट झाली. एकंदरीत पोलीसांनी राबवलेल्या विविध उपाययोजनांमुळे गेल्या दोन वर्षात आयुक्तालय हद्दीतील गुन्ह्यांमध्ये तब्बल ५६८ ने घट झाली आहे.

पिंपरी-चिंचवड आयुक्तालयाचा पदभार स्विकारल्यानंतर शहरातील वाढती गुन्हेगारी रोखणे हे आपले उद्दीष्ट होते. गेल्या वर्षभरातील आकडेवारी पाहिल्यास आयुक्तालय हद्दीतील दरोडा, जबरी चोरी, घरफोडी, वाहनचोरी अशा गंभीर गुन्ह्यांच्या संख्येत घट झाली आहे. बालगुन्हेगारी रोखण्यासाठी सर्व बालगुन्हेगारांचा एक डेटा तयार करून दिशा उपक्रमाअंतर्गत गुन्हेगारीतून त्यांचे लक्ष विचलीत करून त्यांना खेळाकडे आकर्षित केले आहे.
- विनयकुमार चौबे, पोलीस आयुक्त, पिंपरी-चिंचवड

Share this story

Latest