Pimpri-Chinchwad | शहरात एक हजार ४१३ मालमत्ता सील; कारवाईस पथक पोहोचताच १३ कोटी ७२ लाखांचा भरणा...

पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या कर संकलन विभागाकडून १ लाखांपेक्षा अधिक थकबाकी असलेल्या मालमत्ता जप्तीची कारवाई तीव्र करण्यात आली आहे.

  • By PuneMirror Bureau
  • Reported By Desk User
  • Wed, 8 Jan 2025
  • 03:33 pm
Pimpri-Chinchwad Municipal Corporation,

प्रातिनिधिक छायाचित्र....

महापालिकेकडून थकबाकीदारांवरील मोहिमेस गती...

Pimpri-Chinchwad | पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या कर संकलन विभागाकडून १ लाखांपेक्षा अधिक थकबाकी असलेल्या मालमत्ता जप्तीची कारवाई तीव्र करण्यात आली आहे. आतापर्यंत एक हजार ४१३ मालमत्ता जप्त करण्यात आल्या आहेत. तर, जप्ती कारवाईच्या वेळी ५५६ मालमत्ताधारकांनी १३ कोटी ७२ लाख २९ हजार ७९१ रूपयांचा भरणा केला आहे.

महापालिकेच्या वतीने थकबाकीदारांच्या मालमत्ता जप्तीची कारवाई २८ डिसेंबर २०२४ पासून सुरू करण्यात आली आहे. मालमत्ता सील करून ती जप्त केली जाणार आहे. त्यानंतर त्या मालमत्तांचा लिलाव केला जाणार आहे. कर संकलन विभागाच्या १८ विभागीय कार्यालयाच्या पथकाकडून एमएफएस जवानांच्या बंदोबस्तात ही कारवाई केली जात आहे. आतापर्यंत एकूण १ हजार ४१३ मालमत्ता सील करून जप्त करण्यात आल्या आहेत. त्यात बिगरनिवासी व औद्योगिक मालमत्तांची संख्या सर्वाधिक आहे. त्या थकबाकीदारांकडून एकूण ३० कोटी ७४ लाख ८९ हजार २४१ रूपये थकबाकी आहे.

कारवाईस पथक पोहचल्यानंतर ५५६ मालमत्ताधारकांनी तात्काळ बिलाचा भरणा केला आहे. त्यांनी रोख, डीडी, एनईएफटी आणि धनादेशाद्वारे एकूण १३  कोटी ७२ लाख २९ हजार ७९१ रूपयांचा भरणा केला आहे. आत्तापर्यंत एकूण १ हजार ९६९ मालमत्तांवर कारवाई करण्यात आली आहे. त्यांच्याकडे तब्बल ४४ कोटी ४७ लाख १९ हजार ३२ रूपयांची थकबाकी आहे.

चिखलीतील सर्वांधिक २१७ मालमत्ता सील

कर संकलन विभागाच्या चिखली विभागीय कार्यालयाने आत्तापर्यंत सर्वांधिक २१७ मालमत्ता सील केल्या आहेत. वाकड कार्यालयाने १२२ , थेरगाव कार्यालयाने ११७, पिंपरी गाव कार्यालयाने १०१, चिंचवड कार्यालयाने ९२, भोसरी कार्यालयाने ९१ मालमत्ता सील केल्या आहेत. सांगवी कार्यालयाने ८२ , मोशी कार्यालय ७०, तळवडे व किवळे कार्यालय प्रत्येकी ६८, महापालिका कार्यालय ६६, दिघी-बोपखेल ५६, फुगेवाडी-दापोडी ५३ , कस्पटे वस्ती कार्यालय ५१, आकुर्डीत ४९, पिंपरी कॅम्प ३४, निगडी-प्राधिकरण कार्यालयाने ३० मालमत्ता सील केल्या आहेत.

हे आहेत थकबाकीदार

पिंपरी-चिंचवड शहरात निवासी व बिगरनिवासी असा एकूण ६ लाख ३० हजार २९४ मालमत्ता आहेत. त्यात सदनिका, बंगलो, बैठ घर हे मालमत्ताकर भरत नाहीत. तसेच, शहराबाहेर राहणारे मालमत्ताधारक कर भरण्यास दुर्लक्ष करीत असल्याचे चित्र आहे. रूग्णालय, शैक्षणिक संस्था, बांधकाम व्यावसायिक, चित्रपटगृह, व्यापारी संकुल, कंपन्या, वर्कशॉप, लघुउद्योग, दुकानदार, हॉटेल, बँका, पतसंस्था तसेच, शासकीय व सहकारी संस्था व कार्यालयाकडेही मोठी थकबाकी आहे. काही नामवंत कंपन्यांकडे कोट्यवधींची थकबाकी आहे.

जप्तीची कारवाई कायम सुरु राहणार

थकबाकीदारांना जप्तीपूर्व नोटीस बजावण्यात आल्या आहेत. नोटीस मिळवूनही मुदतीमध्ये थकबाकी न भरणार्‍या मालमत्ता जप्त करून त्या सील करण्यात येत आहे. ही कारवाई सुरू आहे. ती अधिक तीव्र केली जाणार आहे. जप्त केलेल्या मालमत्तांचा नियमानुसार लिलाव केला जाणार आहे, असे महापालिकेच्या कर संकलन विभागाचे सहाय्यक आयुक्त अविनाश शिंदे यांनी सांगितले.

Share this story

Latest