वाकड-दत्तमंदिर रस्त्याने घेतला मोकळा श्वास
वाकड- दत्तमंदिर काॅक्रीट रस्त्याचे काम अतिक्रमणांमुळे काम रखडले आहे. स्थानिक जागामालकांना महापालिकेने ९५ टक्के मोबदला दिला. परंतू, तेथील जागेवरचे अतिक्रमण काढले जात नव्हते. याबाबत 'सीविक मिरर'ने स्थानिक सोसायटीधारकांच्या प्रश्नावर सातत्याने आवाज उठवून प्रशासनाला जाब विचारला होता. यामुळे महापालिकेचे आयुक्त शेखर सिंह यांच्या आदेशाने ६ व ७ जानेवारीला अतिक्रमण विभागाकडून कारवाई करण्यात आली. रस्त्याच्या दुर्तफा असलेली पत्राशेड, आरसीसी बांधकाम अशी सगळ्या अतिक्रमणे जमिनदोस्त करत रस्त्यावर अतिक्रमण काढले आहे.
याबाबत वाकड-दत्त मंदिर रस्त्याच्या प्रश्नावर 'सीविक मिरर'ने सातत्याने आवाज उठवून महापालिका प्रशासनाला धारेवर धरले होते. तसेच रस्त्याचे काम लवकर पुर्ण करण्यासाठी बातम्यांच्या माध्यमातून पाठपुरावा सुरू होता. त्यामुळे सोसायटीधारकांमधून समाधान व्यक्त होत असून नागरिकांनी त्याबद्दल कृतज्ञता व्यक्त केली आहे.
वाकड-दत्तमंदिर रस्त्याच्या काँक्रीटीकरणाचे काम गेल्या चार वर्षांपासून संथ गतीने सुरु आहे. रस्त्यांचे केवळ ६० टक्के काम पुर्ण झाले आहे. महापालिकेने संबंधित जागामालकांना ९५ टक्के मोबदला दिला होता. महापालिकेकडून जागेचा मोबदला घेवूनही रस्त्यावर ताबा स्थानिक जागा मालकांनी सोडत नव्हते. त्यामुळे रस्त्याचे काम रखडले आहे. पर्यायाने वाहतुकीला अडथळा निर्माण होत आहे. स्थानिक सोसायटीधारकांना दररोज सायंकाळी वाहतूक कोंडीच्या समस्येला सामोरे जावे लागत होते. तेथील नागरिक हैराण झाले आहेत. अतिक्रमण काढण्यासाठी सोसायटी फेडरेशनकडून आयुक्त, स्थापत्य विभाग, 'ड' क्षेत्रीय अधिकाऱ्यांकडे वारंवार पत्रव्यवहार करुनही अतिक्रमण काढले जात नव्हते. प्रशासनाविरोधात स्थानिक नागरिकांतून तीव्र नाराजी व्यक्त होत आहे.
याबाबत महापालिकेने वाकड - दत्तमंदिर रस्ता ४५ मीटर रुंद होईल, असे सांगितले होते. मात्र, प्रत्यक्षात काही ठिकाणी ३० मीटर रुंदीचाच रस्ता वाहनचालकांना उपलब्ध करून दिला जात होता. त्यामुळे या भागातील एकूण २७ सोसायट्यांनी पालिका प्रशासनाकडे लेखी तक्रारी केल्या होत्या.
वाकड-दत्तमंदिर रोड रुंदीकरणाबाबत स्थानिक सोसायटीधारकांनी आक्षेप घेतले होते. विकास आराखड्याप्रमाणे हा रस्ता ४५ मीटर होणे अपेक्षित आहे. प्रभाग क्रमांक २५ मध्ये असलेल्या वाकड- दत्तमंदिर रोडचे रुंदीकरण विकास आराखड्यातील नियोजनाप्रमाणे झाले पाहिजे. ही नागरिकांची मागणी होती.
तसेच रस्त्यावर काही ठिकाणी अनिकृत बांधकामे आहेत. त्याला प्रशासनाकडून अभय दिल्याचा आरोप नागरिकांकडून केला होता. अनेक ठिकाणी रस्त्याची रुंदी अगदी ३० मीटरपर्यंतच ठेवण्यात आली होती. रस्त्याच्या दोन्ही बाजुंना अनधिकृत बांधकामे आहेत. त्यामुळे रस्त्यांची रुंदी कमी झाली होती. विकास आराखड्यात मंजूर असलेल्या नियोजनाप्रमाणे सदर रस्त्याचे काम करावे, अशी परिसरातील सोसायटीधारकांनी ही मागणी लावून धरली होती. त्यामुळे जागेचा मोबदला घेतलेली रस्त्यावरील सर्वच अतिक्रमणे काढण्यात येत आहेत. पत्राशेड, दुकाने, आरसीसी बांधकामे पाडण्यात येत आहेत. मागील दोन दिवसात रस्त्यावर सगळीच अतिक्रमण पुर्णपणे काढण्यात आली आहे. त्यामुळे रस्ता प्रशस्त झाला असून विकास आराखड्यानूसार पुर्ण होईल, अशी नागरिकांची अपेक्षा आहे.
View this post on Instagram
आयुक्तांनी दिली ग्वाही
वाकड-दत्तमंदिर रस्ता ४५ मीटर रुंद होईल, असे सांगितले जात होते. मात्र, प्रत्यक्षात काही ठिकाणी ३० मीटर रुंदीचाच रस्ता वाहनचालकांना उपलब्ध करून दिला जात होता. त्यामुळे या भागातील एकूण २७ सोसायट्यांनी महापालिका आयुक्तांकडे लेखी तक्रारी केल्या होत्या. त्यावेळेला वाकड-दत्तमंदिर रस्ता विकास आराखड्या प्रमाणेच विकसित केला जाईल. ४५ मीटर रस्ता रुंदीकरणासाठी अतिक्रमण हटवून जागा ताब्यात घेण्यात येईल, असे आश्वासन आयुक्त तथा प्रशासक शेखर सिंह यांनी दिले होते. ते आश्वासन देवूनही रस्त्याचे काम रखडले होते. रस्त्यावरच अतिक्रमणावरदेखील कारवाई होत नव्हती. त्यानंतर 'सीविक मिरर'ने आयुक्तांच्या दिलेल्या आश्वासनाबाबत प्रश्न उपस्थित केले. नागरिकांना दिलेल्या आश्वासनांची आयुक्तांना आठवण करून दिली. त्यामुळे आयुक्तांनी या रस्त्यावरील अतिक्रमण हटवण्यासाठी कारवाई सुरु केली.
ठेकेदार ब्लॅकलिस्टमध्ये कधी जाणार?
विकास आराखड्यानूसार वाकड- दत्त मंदिर रस्ता अर्बन स्ट्रीट डिझाईननूसार ४५ मीटर विकसित करण्यात येत आहे. महापालिकेने सदर रस्त्याच्या कामाची निविदा नोटीस क्रमांक ५४/०२/ २०२१-२०२२ मध्ये काढण्यात आली होती. सदर रस्त्यावर पालिकेकडून सुमारे ६१ कोटी रुपये खर्च करत हे काम मे. अजवाणी इन्फ्रास्ट्रक्चर प्रा. लि. या ठेकेदारास २५ जानेवारी २०२२ रोजी दिले. या कामाला ३० महिन्याच्या मुदतीत निविदेचे काम २५.७५ टक्के कमी दराने पुर्ण करण्याच्या अटी व शर्तीवर आदेशानुसार दिले होते. वाकड-दत्तमंदिर रस्ता विकास आराखड्यानूसार पालिका स्थापत्य प्रकल्प विभागाने ४५ मीटर रस्ता नागरिकांना उपलब्ध करुन देणे अपेक्षित आहे. परंतू, विकास आराखाड्यानूसार रस्त्याचे काम होत नाही. रस्त्याचे काम अत्यंत संथ गतीने सुरु आहे. रस्त्याच्या दिरंगाईमुळे वाकड परिसरातील रहिवाशी दररोज वाहतूक कोंडीने हैराण झाले आहेत. तसेच विहीत मुदतीत काम पुर्ण झालेले नाही. त्यामुळे संबंधित ठेकेदारावर दंडात्मक कारवाई सुरु आहे. परंतू, त्या ठेकेदारावर ब्लॅकलिस्टची कारवाई करावी, अशी मागणी नागरिकांतून होत आहे.
रस्त्यांचे सीओईपी यंत्रणेकडून चौकशी कधी?
सोसायटीधारक, नागरिकांनी कामाची संथगती आणि निकृष्ट दर्जाबाबत पालिका अधिकारी यांच्याकडे तक्रार दिलेल्या आहे. तरीही संबंधित अधिकारी हे रस्त्याच्या कामाकडे लक्ष दिले नाही. निविदेनुसार रस्त्याच्या कामाला तीन-चार वर्षे पूर्ण होऊनही रस्त्याचे काम ६० टक्के ही पुर्ण झालेले नाही. रस्त्यावर काही ठिकाणी २४ मीटर तर काही ठिकाणी ४५ मीटर रस्ता विकसित करण्यात आल्याचे समजते आहे. संपुर्ण रस्ता अर्बन स्ट्रीट डिझाईननूसार विकसित करण्याचे आदेश दिलेले असताना ४५ मीटरऐवजी काही ठिकाणी २४ मीटर रस्ता रुंदीकरण करण्यात येत आहे. मूळ निविदा रक्कम कमी करण्यात आली आहे का? अशी शंका आहे.दरम्यान, रस्त्याचे काम मूळ निविदेतील अटी व शर्थी नुसार विहित मुदतीत पुर्ण करण्यात आले नाही. सदर रस्त्याचे काम निकृष्ट दर्जाचे असल्याचे निदर्शनास येत असून रस्त्याच्या कामाच्या गुणवत्तेची टाटा कन्सल्टंसी किंवा काॅलेज आॅफ इंजिनिअरींग पुणे (सीओईपी) या त्रयस्थ यंत्रणेकडून सखोल चौकशी करावी, अशी मागणी माजी आमदार आश्विनी जगताप यांनी केली होती. त्यावर रस्त्याची चौकशी अद्याप पुर्ण झालेली नाही, असे अधिकाऱ्यांनी सांगितले आहे.
वाकड-दत्त मंदिर रस्त्याच्या प्रश्नावर सातत्याने 'सीविक मिरर'ने नागरिकांच्या प्रश्नाची दखल घेवून आवाज उठवला. महापालिका प्रशासनाने रस्त्याच्या कामाकडे केलेल्या दुर्लक्षावर बोट ठेवून वारंवार पाठपुरावा करण्यासाठी वृत्तमालिका प्रसिध्द केली. त्यामुळे रखडलेल्या रस्त्याचे काम आणि अतिक्रमण हटवण्यासाठी मोलाची मदत 'सीविक मिरर'ने केली आहे. त्याबद्दल वाकड परिसरातील सोसायटीधारकांच्या वतीने तुमचे मनापासून आभार
- सचिन लोंढे, स्थानिक नागरिक, वाकड
वाकड-दत्तमंदिर रस्त्यावर अतिक्रमण केलेली सर्व पत्राशेड, घरे, दुकाने, व्यावसायिक गाळे, हाॅस्पीटल, माॅल यांना मागील आठवड्यात चार दिवस स्पीकरद्वारे अतिक्रमण कारवाई होणार असल्याची पुर्वकल्पना देण्यात आली. त्या सगळ्यांना रितसर नोटीस बजावण्यात आली. त्यानंतर सोमवार, मंगळवार अशा दोन दिवसांत अतिक्रमण पथकाद्वारे कारवाई करुन सगळी अतिक्रमणे जमीनदोस्त करण्यात आली आहेत.
- मनोज लोणकर, उपायुक्त, अतिक्रमण विभाग, महापालिका