पिंपरी-चिंचवड महापालिका मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेअंतर्गत शहराच्या हद्दीतील ४४ झोपडपट्ट्यांमध्ये राहणाऱ्या एकूण ३१ हजार ४०० हून अधिक कुटुंबांचे सर्वेक्षण पूर्ण केले आहे. घरोघरी जाऊन केलेल्या या सर्वेक्षणामुळे पीसीएमसीच्या हद्दीतील युवकांची लोकसंख्या, कौशल्ये आणि करिअरची उद्दिष्टे याबाबत महत्त्वपूर्ण डेटा महापालिकेने गोळा केला आहे. या डेटावर आधारित कौशल्य विकास आणि रोजगार कार्यक्रम महापालिकेकडून तयार केले जाणार आहेत.
सर्वेक्षणातून गोळा केलेल्या डेटाच्या मदतीने पीसीएमसीमधील तरुणांसाठी नोकरीच्या संधी उपलब्ध करण्यात महापालिकेला मदत होणार आहे. याबरोबरच तरुणांसाठी जागरुकता मोहिमा, विशेष प्रशिक्षण कार्यक्रम आणि पीसीएमसीमधील उद्योगांच्या मदतीने वेगवेगळे उपक्रम राबवण्यातही मदत होणार आहे. सर्वेक्षणाच्या माहितीवर आधारीत अनेक उपाययोजना करण्यात येत आहेत. त्यामध्ये कौशल्य विकास कार्यक्रम, आयटी, आरोग्यसेवा आणि उत्पादन क्षेत्रातील उद्योगांच्या गरजांनुसार विशेष अभ्यासक्रम तयार केले जाणार आहेत. सर्व युवकांना या कार्यक्रमांमध्ये सामील होण्यासाठी प्रभावी मोहिमा आखल्या जाणार आहेत. तसेच करिअर मार्गदर्शन सत्रांमध्ये युवकांना योग्य निर्णय घेण्यासाठी मार्गदर्शन देण्यात येणार आहेत.
काय सांगतो सर्वेक्षणाचा अहवाल?
या सर्वेक्षणामध्ये ४४ झोपडपट्टी वस्ती, ३१,४०० कुटुंबे, १८ ते ३५ वयोगटाच्या आत असलेले १८,००० युवक असल्याची माहिती महापालिकेला मिळाली. यामध्ये दहावीपर्यंतचे शिक्षण अपूर्ण असलेले २४ टक्के, बारावी उत्तीर्ण असलेले ३४ टक्के आणि पदव्युत्तर अथवा डिप्लोमा पूर्ण असलेले २ टक्के युवक असल्याचे निष्पन्न झाले. यापैकी २१ टक्के युवकांनी व्यवसायिक प्रशिक्षण पूर्ण केले आहे आणि १६ टक्के युवक पाच किंवा अधिक नोकरीच्या संधींबद्दल जागरूक आहेत.
या सर्वेक्षणाच्या निष्कर्षांमुळे आम्हाला पीसीएमसीमधील तरुणांच्या गरजा पूर्ण करण्यासाठी स्पष्ट दिशा मिळाली आहे. भविष्यातील उपक्रमांना प्रभावी स्वरूप देण्यासाठी हे निष्कर्ष उपयुक्त ठरले आहेत. आम्ही तरुणांच्या कौशल्यविकास, करिअर मार्गदर्शन आणि रोजगार निर्मिती यावर विशेष लक्ष केंद्रीत करत आहोत.
- शेखर सिंह, आयुक्त तथा प्रशासक, पिंपरी-चिंचवड महापालिका