तिसऱ्या अपत्यामुळे पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या सहायक आयुक्ताने गमावली नोकरी
पिंपरी-चिंचवड महापालिकेचे सहायक आयुक्त श्रीनिवास दांगट यांना सेवेतून बडतर्फ करण्यात आले आहे. लहान कुटुंबाचे प्रतिज्ञापत्र सादर करण्यास त्यांनी टाळाटाळ केली. विभागीय चौकशीत त्यांना तीन अपत्ये असल्याचे स्पष्ट झाले. त्यामुळे त्यांना सेवेतून बडतर्फ करण्यात आले. पालिका आयुक्त तथा प्रशासक शेखर सिंह यांनी ही कारवाई केली. दांगट यांचा कार्यकाल २८ फेब्रुवारी २०२५ ला संपणार होता. मात्र निवृत्तीला दीड महिन्यांचा कालावधी शिल्लक असताना त्यांच्यावर बडतर्फीची कारवाई झाली आहे.
श्रीनिवास दांगट हे पिंपरी-चिंचवड महापालिकेत लिपिक या पदावर रुजू झाले होते. सरळसेवा भरतीद्वारे त्यांना महापालिका आस्थापनेवरील प्रशासन अधिकारी या गट ‘ब’ या पदावर नियुक्ती देण्यात आली होती. त्यावेळी त्यांनी लहान कुटुंबाचे प्रतिज्ञापत्र सादर करणे आवश्यक होते. त्याबाबत त्यांना वारंवार कळवले गेले. मात्र त्यांनी कोणतेही प्रतिज्ञापत्र सादर केले नाही.
दरम्यान, दांगट यांच्याबाबत तक्रार प्राप्त झाली. त्यानंतर त्यांची विभागीय चौकशी करण्यात आली. या चौकशीत दांगट यांना तीन अपत्ये असल्याचे निष्पन्न झाले. त्यांनी शासनाच्या लहान कुटुंबाच्या नियमांचे उल्लंघन केल्याचे या चौकशीत उघड झाले. त्यावर पालिका आयुक्त तथा प्रशासक शेखर सिंह यांनी दांगट यांना सेवेतून बडतर्फ करण्याचा निर्णय घेतला.
दरम्यान, आपली बाजू प्रशासनाने ऐकून घेतली नाही. ही कारवाई अन्यायकारक असून त्याविरोधात उच्च न्यायालयात जाणार असल्याचे दांगट यांनी सांगितले.