संग्रहित छायाचित्र
आर्थिक वर्ष संपण्यास अवघे तीन महिने बाकी असतानाही अद्यापपर्यंत शहरातील अनेक भागांतील नागरिकांना मालमत्ताकराची बिलेच मिळालेली नाहीत. पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या कर संकलन विभागाचा कारभार आता ढेपाळला आहे. त्यामुळे अनेक नागरिकांना किती मालमत्ताकर भरायचा आहे, याची माहितीच नाही.
दरम्यान, कर संकलन विभागाने मालमत्ताकराची बिले घरोघर पोहचिवण्याचे महिला बचत गटांना दिले आहे. मात्र, या वर्षी या गटांकडून बिले वाटप करण्यात दिरंगाई होत असल्याचे समोर आले आहे. महिला बचत गटांच्या माध्यमातून महापालिकेच्या करसंकलन विभागाकडून घरोघरी, दुकाने व आस्थापनांवर जाऊन मालमत्ताकरांची बिले वाटण्यात येतात. त्यासाठी एका बिलामागे महापालिका बचत गटांना २० रुपये मिळतात.
या कामाचे बचतगटाच्या महिलांना प्रशिक्षणदेखील देण्यात आले आहे. एप्रिल व मे २०२४ या दोन महिन्यांत १०० टक्के बिल वाटप झाल्याचा दावा करसंकलन विभागाने केला आहे. मात्र, सन २०२४ - २५ या आर्थिक वर्षांतील नऊ महिने संपत आले तरी, अद्याप मालमत्ताधारकांना बिले मिळालेली नाहीत. त्यामुळे नेमके किती बिल आहे, हे संबंधित नागरिकांना समजले नाही.
हे कमी म्हणून की काय करसंकलन विभागाकडून दररोज एसएमएसचा मारा केला जात आहे. या माध्यमातून नागरिकांकडून बिलांची मागणी केली जात आहे. दरम्यान, मालमत्ताधारकांच्या मोबाईलवर बिल भरा, विलंब दंड टाळा, बिल न भरल्यास जप्तीपूर्व नोटीस दिली जाईल. मालमत्ता जप्त केली जाईल, असे संदेश मोबाईलवर येत आहेत. मात्र, हातात बिल नसल्याने ते नागरिकांना भरता येत नाहीत. या संदर्भात तक्रारी करूनही त्यांना बिले दिले जात नसल्याने संताप व्यक्त केला जात आहे.
बचत गट काय करत आहेत?
महापालिकेने मालमत्ताकराची सहा लाख बिले छापली आहेत. ही बिले घरोघरी वाटपाची कामे बचत गटांच्या माध्यमातून केले जाते. एका बिलामागे बचत गटाला वीस रुपये दिले जातात. प्रत्येक बिलामागे बचत गटांना चांगले शुल्क देण्यात येत असूनही बिले का वाटप झाली नाहीत, असा प्रश्न पडला आहे. तसेच बचत गटांनी एवढ्या महिन्यांत बिलांचे वाटप का केले नाही, हाही प्रश्न उपस्थित केला जात आहे.
या भागांत बिलांचे वाटप रखडले...
शहरातील पिंपरी, निगडी, वाकड परिसरात बिलांचे वाटप झाले आहे. मात्र, चिंचवड स्टेशन, पिंपळे गुरव भागांतील नागरिकांना अद्याप छापील बिल मिळालेले नाही, असे नागरिक सांगत आहेत.
चिंचवड स्टेशन येथील डिलक्स थिएटर परिसरातील घरांना अद्याप मालमत्ताकराची बिले मिळालेली नाहीत. तसेच, गेली तीन वर्षे झाले मला घरी बिल आलेले नाही. त्यामुळे मला किती मालमत्ताकर भरायचा आहे, हे समजले नाही. त्या संदर्भात मी संबंधित विभागीय कार्यालयाकडे तक्रार केली आहे. मात्र, त्याची कोणी दखल घेत नाही. केवळ मोबाईलवर सारखे एसएमएस येत आहेत. - विशाल कसबे, सदनिकाधारक
घरी बिल आले नसेल तर, मालमत्तेचा मिळकतकर क्रमांक माहीत असल्यास महापालिकेच्या www.pcmcindia.gov.in संकेतस्थळावर जाऊन लगेच बिल उपलब्ध होते. ऑनलाइन बिल भरणे सुलभ व सुरक्षित आहे. बिल भरल्यानंतर एसएमएस येत असतील, तर त्याची तपासणी करू. अपवादात्मक परिस्थितीत असे होत असेल. एकाच वेळी बल्कमध्ये एसएमएस पाठविले जात असल्याने असे होत असेल.
- अविनाश शिंदे, साहाय्यक आयुक्त, करसंकलन विभाग.