शहरातील बीआरटी मार्गांवर सिग्नलची 'ऐशी की तैशी' - पीएमपी चालकांकडून बिनदिक्कतपणे होतेय सिग्नलचे उल्लंघन, नियमभंग करण्याचे प्रमाण वाढले
पंकज खोले
पिंपरी-चिंचवड शहरातील चार बीआरटी (Pimpri Chinchwad BRT Route) मार्गांवर पीएमपीएमएल सेवा सुरू आहे. मात्र , या मार्गावर बहुतांश बस वाहतूक नियमांचे पालन करताना दिसून येत नाही. मुख्यत्वे चौकातील सिग्नल आणि वळण घेत असताना घ्यावयाची काळजी याचे पालन होत नाही. विशेष म्हणजे एरवी सामान्य नागरिकांवर कारवाईसाठी तत्पर असलेला वाहतूक विभागही याकडे दुर्लक्ष करतो.
वाहतूक नियमांचे पालन प्रत्येक वाहनचालकाने करणे गरजेचे आहे. मात्र, अलीकडच्या काळात पीएमपीएमएल (PMPML) बसचालकांकडून वाहतूक नियमन होताना दिसून येत नाही. शहरात तिन्ही मुख्य रस्त्यांवर बीआरटी मार्ग सुरू आहे. त्यामुळे पीएमपीएमएल बस याच मार्गातून ये-जा करते. पिंपरी-चिंचवडमध्ये जवळपास दिवसाकाठी जवळपास ७०० बस धावतात. त्यापैकी अगदीच हाताच्या बोटावर मोजण्याइतके वाहनचालक वाहतुकीच्या नियमांचे पालन करत असतात.
दरम्यान, शहरातील काही प्रमुख चौकात पाहणी केली असता, बसेस सिग्नलची पर्वा न करता थेट वाहन चालवत असल्याचे निदर्शनास आले. त्यापैकी काळेवाडी फाटा, डांगे चौक, किवळे आणि पिंपरी चौक या प्रमुख ठिकाणी बसचालक वाहतूक नियमांचे सर्वाधिक उल्लंघन करीत असल्याचे पाहणीतून समोर आले आहे. पीएमपीएमएल बहुतांश बसेस या खासगी ठेकेदाराच्या वतीने चालवण्यास दिले आहे. त्यामुळे त्यांच्याकडून कोणत्याही प्रकारची शिस्त पाळली जात असल्याचे पीएमपीएमएल प्रशासनाकडून सांगण्यात आले. त्याचप्रमाणे यावर वेळोवेळी कारवाई देखील केली जाते.
बीआरटी मार्गामध्ये सध्या खासगी वाहनांचा मोठ्या प्रमाणात वापर वाढला आहे. मात्र, त्यावर उपाययोजना करण्यामध्ये प्रशासन कमी पडत आहे. यापूर्वी लावण्यात आलेले सीसीटीव्ही कॅमेरे , बूम बॅरियर हे सर्व निष्क्रिय ठरले. प्रत्यक्षात पीएमपीएमएल बसचालकांकडून देखील बीआरटी अंतर्गत असलेले कोणतेच नियम पाळले जात नाही. त्यामुळे नागरिक, पोलीस आणि महापालिका देखील यावर कारवाईसाठी पत्रव्यवहार करत असते.
बीआरटीचे सिग्नल शोभेलाच
बीआरटी मार्गावर चौकात सिग्नल यंत्रणा उभारण्यात आलेली आहे. या मार्गात बसल्यानंतर ही यंत्रणा कार्यान्वित होते. मात्र, अनेक ठिकाणी ही यंत्रणा बंद असल्याचे दिसून येते. केवळ पाच ते दहा सेकंद देण्यात आली आहेत. मात्र, या काळात बस लवकर पास होत नसल्याने बसच्या पाठीमागून येणाऱ्या अन्य बस चालकांकडून तो नियम पाळला जात नाही.
बसचालकांकडून नियम तोडल्यास अथवा सिग्नल जम्पिंग प्रकरणी वाहतूक पोलिसांकडून प्रशासनास पत्र मिळते. त्यानुसार पुढील कारवाई केली जात असते.
- सतीश गाटे, जनसंपर्क अधिकारी, पीएमपीएमएल
© Civic Mirror - Lexicon Broadcasting.
Licensor - Bennet and Coleman Co Ltd.