पिंपरी-चिंचवड: अवकाळी पावसामुळे प्रशासनाची तारांबळ

पिंपरी-चिंचवड शहरात मंगळवारी रात्री उशिरा कोसळलेल्या वादळी पावसाने विविध ठिकाणी २९ हुन अधिक झाडे उन्मळून पडली. परिणामी, कासारवाडी, भोसरी, पिंपळे सौदागर, चिंचवड आणि दापोडी या परिसरात प्रचंड वाहतूक कोंडी झाली.

पिंपरी-चिंचवड: अवकाळी पावसामुळे प्रशासनाची तारांबळ

शहरात विविध ठिकाणी पोहोचण्यासाठी महावितरण आणि अग्निशमन दलाची दमछाक

पंकज खोले
पिंपरी-चिंचवड शहरात मंगळवारी रात्री उशिरा कोसळलेल्या वादळी पावसाने विविध ठिकाणी २९ हुन अधिक झाडे उन्मळून पडली. परिणामी, कासारवाडी, भोसरी,  पिंपळे सौदागर, चिंचवड आणि दापोडी या परिसरात प्रचंड वाहतूक कोंडी झाली. त्याचवेळी ठिकठिकाणी वीज पुरवठा खंडित झाला. या सर्व ठिकाणी पोचण्यासाठी महापालिकेचा अग्निशमन दल आणि महावितरण कर्मचाऱ्यांची दमछाक झाली. याचा फटका सर्वसामान्य नागरिकांना बसला असून, कोणी वाहतूक कोंडीत तर कोणी भर पावसात अडकले.

शहरातील प्रामुख्याने मोठी वर्दळ असणार जुना पिंपरी-चिंचवड मार्ग आणि भोसरी-चिखली या रस्त्यावर वादळी पावसामुळे वाहतूक मंदावली होती. त्याचवेळी वादळामुळे विविध ठिकाणी २९ झाडे उन्मळून पडली. त्यातील काही झाडे रस्त्यामध्ये कोसळल्याने वाहतुकीला अडथळा झाला.  तर, मुख्य चौकात मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी झाल्याने वाहतूक पोलिसांची तारांबळ उडाली. अनेक ठिकाणी वाहतूक पोलीस उशिरा पोहोचल्याने वाहनाच्या मोठ्या रांगा लागल्या होत्या.

अचानक आलेल्या पावसामुळे काही नागरिक रस्त्यातच अडकून पडले. तर, विक्रेते, हात गाडी चालक आणि दुकानदारांची धावपळ उडाली. त्यातच पावसापासून बचाव करण्यासाठी वाहन चालकांनी रस्त्यावरच आडोसा घेतला. परिणामी, वाहतूक कोंडीत आणखीनच भर पडली होती.  दरम्यान, एकीकडे वादळी पावसाने झाडे कोसळली तर, दुसरीकडे वीज पुरवठा खंडित झाल्याने त्या ठिकाणी पोचण्यासाठी महावितरण कर्मचाऱ्यांची धावपळ उडाली होती. काळेवाडी, चिंचवड, याचबरोबर एमआयडीसी परिसरात देखील वीज पुरवठा खंडित झाला होता. तर, पिंपरी-चिंचवड शहराला जोडणाऱ्या हिंजवडी, मारुंजी, माळुंगे, देहू रोड, किवळे या भागात देखील वीज नव्हती.

या ठिकाणी कोसळली झाडे

पिंपरी-चिंचवड शहरातील पिंपळे गुरव, कासारवाडी, पिंपळे सौदागर, केशवनगर, दापोडी, संत तुकाराम नगर, नवी सांगवी या परिसरातील २९ नागरिकांचे कॉल प्राप्त झाले होते. तर, झाडाच्या फांद्या रस्त्यात पडल्याने वाहतुकीला अडथळा झाला होता.

वाहनांचे नुकसान अन् कोंडीत अडकले नागरिक

कासारवाडीवरून नाशिककडे जाताना रस्त्यावर झाडे उन-मळून पडल्याने दोन किलोमीटरच्या वाहनांच्या रांगा लागलेल्या होत्या. एमआयडीसीतील वाहतूक टेल्को मार्गे तर वळवण्यात आली मोठया  ट्रक, टेंपो, मोटार, रिक्षा यावर झाडे कोसळली होती. त्यामुळे या वाहनांचे नुकसान झाले.

भोसरी येथून अंदाजे साडेपाचच्या सुमारास निघालो होतो. सांगवीत घरी पोचण्यासाठी साडे आठ वाजले. पण, संपूर्ण नवी सांगवीचा वीज पुरवठा खंडित झाला होता. महावितरणला फोन केला पण , काम चालू असल्याचे नेहमीप्रमाणे उत्तर ऐकायला मिळाले.
- अण्णा जोगदंड, रहिवासी , सांगवी

शहरातील वीजपुरवठा खंडित झाल्यानंतर तातडीने फॉल्ट काढण्यात आला. पोल पडणे अथवा मोठी घटना घडली नाही. संध्याकाळपर्यंत सर्व ठिकाणचा वीज पुरवठा सुरळीत झाला होता. सर्व अधिकारी व कर्मचारी घटनेबाबत नजर ठेवून होते.
-सोमनाथ मुंडे, कार्यकारी अभियंता , महावितरण 

Join Civic Mirror Whatsapp Group for Latest Update

Share this story

Latest