संग्रहित छायाचित्र
विकास शिंदे :
लैंगिक छळ प्रकरणी बंद असलेल्या रावेतमधील क्रिएटिव्ह पब्लिक स्कूलमधील आर्थिक दुर्बल घटकातील आरटीई प्रवेश घेतलेल्या ४२ पैकी ४० विद्यार्थ्यांचे शिक्षण संचालकांच्या मान्यतेने इंग्रजी, सीबीएसई विविध शाळांमध्ये समायोजन करण्यात आले आहे. राज्य शासन व शिक्षण विभागाच्या सकारात्मक निर्णयामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान टळले आहे. त्या विद्यार्थ्यांचे आरटीई अंतर्गत किवळे, रावेत आणि चिंचवड महापालिकेच्या दळवीनगर इंग्रजी माध्यमाच्या शाळेत समायोजन करण्यात आले आहे.
रावेतमधील क्रिएटिव्ह पब्लिक स्कूलमधे २०२०-२२ पासून विद्यार्थ्यांना बालकांचा मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा कायदा (आरटीई) नुसार प्रवेश देण्यात आले होते. मात्र, विद्यार्थ्यांच्या लैंगिक छळ प्रकरणी शाळा बंद करण्याचा निर्णय शिक्षण विभागाने घेतला. त्यामुळे मागील वर्षी आरटीई अंतर्गत प्रविष्ट इयत्ता दुसरी व सातवीमध्ये शिक्षण घेणार्या ४२ विद्यार्थ्यांच्या पुढील शिक्षणाचा प्रश्न निर्माण झाला होता. त्यामुळे पालकांनी आपल्या मुलांचे आरटीई अंतर्गत विविध शाळांमध्ये समायोजन करण्याची मागणी केली होती.
त्यानुसार महापालिकेच्या शिक्षण विभागाने शिक्षण संचालकांकडे विनंती केली होती. संबंधित क्रिएटिव्ह पब्लिक स्कूलमधील आरटीई प्रवेशित ४२ विद्यार्थ्यांच्या प्रवेशासाठी प्रक्रिया पूर्ण करण्यास शिक्षण संचालकांनी मान्यता दिली होती. त्यानंतर प्रशासन अधिकारी संगीता बांगर यांनी शहरात आरटीई अंतर्गत असणार्या शाळांमधील वर्गनिहाय रिक्त पदांचा अहवाल शिक्षण विभागाला पाठविला होता. त्याची छाननी केल्यानंतर समायोजन प्रस्ताव सादर करण्यात आला होता.
समायोजन करावयाच्या प्रस्ताव आणि शासनाच्या धोरणानुसार पालकांच्या उपस्थितीत सोडत काढण्यात आली. त्यानुसार शहरातील एसबी पाटील स्कूल, डी.वाय.पाटील स्कूल अशा नामांकित इंग्रजी माध्यमाच्या आणि महापालिकेच्या इंग्रजी माध्यमाच्या शाळांमध्ये विद्यार्थ्यांचे समायोजन करण्यात आले.
© Civic Mirror - Lexicon Broadcasting.
Licensor - Bennet and Coleman Co Ltd.