भाविकांसाठी वल्लभनगर आगारातून जादा बसची सुविधा
येत्या आषाढी वारीनिमित्त देहू-आळंदीमध्ये जाणाऱ्या भाविकांसाठी वल्लभनगर आगारातून जादा बसची सुविधा उपलब्ध केली आहे. दरवर्षीप्रमाणे पाच जादा बसची सुविधा आगाराकडून २६ जूनपासून उपलब्ध करून दिली आहे. त्यामुळे भाविकांची, प्रवाशांची होणारी गैरसोय टळणार आहे. दरवर्षी पुणे-स्वारगेटपासून विविध आगार प्रमुखांना त्याबाबत सूचना करण्यात येतात.
आषाढी वारीनिमित्त राज्यभरातून वारकरी देहू, आळंदीमध्ये दाखल होतात. पिंपरी-चिंचवडमधून देखील मोठ्या प्रमाणात नागरिक देहू, आळंदीकडे दाखल होतात. त्या पार्श्वभूमीवर येणाऱ्या भाविकांची, प्रवाशांची गैरसोय होऊ नये म्हणून वल्लभनगर आगाराच्या वतीने जादा बसची सुविधा दिली आहे. आगारातून या बस दोन्ही मार्गांवर रवाना होणार आहेत. अगोदरच नोंदणी करण्याची कोणतीही अट नाही. दिवसभर या बस दोन्ही मार्गांवर धावणार आहेत. त्यामुळे प्रवाशांची गैरसोयदेखील टळणार आहे. तसेच कमी दरात देहू आणि आळंदीला जाण्याची सुविधा मिळणार आहे.
जादा बसच्या या सुविधेचा लाभ घ्यावा, असे आवाहन आगाराच्या वतीने करण्यात आले आहे. एसटी बसची संख्या दिवसेंदिवस घटू लागली आहे. त्यात सध्या धावणाऱ्या बस या वारीनिमित्त देण्यात येणार आहेत. त्यामुळे प्रवाशांची गैरसोय होणार आहे. मात्र एसटी प्रशासनाने वारकरी व भाविकांसाठी त्या बस उपलब्ध करून देण्याचा निर्णय घेतल्याचे सांगण्यात आले.
भाविकांना देहू, आळंदीसाठी यंदा पाच जादा बसची सुविधा उपलब्ध केली आहे. २६ जूनपासून ही सुविधा आगाराच्या वतीने दिलेली आहे. नागरिकांनी याचा अधिकाधिक वापर करावा. आवश्यकता भासल्यास आणखी फेऱ्या वाढवण्यात येतील.
- संजय वाळवे, आगारप्रमुख, पिंपरी-चिंचवड
© Civic Mirror - Lexicon Broadcasting.
Licensor - Bennet and Coleman Co Ltd.