पिंपरी-चिंचवड: नदीकाठच्या लोकांना निवास आणि जेवणाची व्यवस्था

पिंपरी-चिंचवड: शहर परिसरात मुसळधार पाऊस सुरू असून शहरातील विविध भागात पाणी साचल्याच्या घटना घडत आहेत. त्या ठिकाणी महापालिकेची आपत्कालीन यंत्रणा युध्दपातळीवर काम करीत आहे.

  • By PuneMirror Bureau
  • Reported By Vikas Shinde
  • Fri, 26 Jul 2024
  • 01:49 pm
Pimpri-Chinchwad, PCMC, Pimpri-Chinchwad Rains, Shekhar Singh

संग्रहित छायाचित्र

आपत्कालीन यंत्रणेसाठी महापालिका अलर्ट, शेकडो घरे, सोसायटीत शिरले पाणी

पिंपरी-चिंचवड: शहर परिसरात मुसळधार पाऊस सुरू असून शहरातील विविध भागात पाणी साचल्याच्या घटना घडत आहेत. त्या ठिकाणी महापालिकेची आपत्कालीन यंत्रणा युध्दपातळीवर काम करीत आहे. नदीकाठी वास्तव्य करणाऱ्या रहिवाशांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला असून धोकादायक स्थळांच्या ठिकाणी वास्तव्यास असणाऱ्या सुरक्षित स्थळी स्थलांतरित करण्यात आले असून तेथे भोजनासह आवश्यक सुविधा देखील उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत, अशी माहिती आयुक्त शेखर सिंह यांनी दिली. सखल भागात साचलेल्या पाण्याचा निचरा करण्यासाठी पाणी उपसा यंत्रणा वाहन पाठवून कार्यवाही करण्यात येत आहे. तसेच ध्वनिक्षेपक द्वारे नागरिकांना सतर्क राहण्याच्या सूचना दिल्या जात असल्याची माहितीही आयुक्त सिंह यांनी दिली.

आपत्कालीन परिस्थिती हाताळण्यासाठी अग्निशमन दलासह महापालिकेने मुख्य कार्यालय आणि सर्व क्षेत्रीय कार्यालयांमध्ये आपत्कालीन नियंत्रण कक्ष पूर्ण क्षमतेने कार्यान्वित केले असून आपत्कालीन यंत्रणांशी तत्काळ समन्वय साधून परिस्थिती हाताळण्यात येत आहे. आयुक्त शेखर सिंह यांनी सर्व परिस्थितीवर बारकाईने लक्ष ठेवले असून सर्व घटनांचा ते आढावा घेत आहेत. आपत्कालीन परिस्थितीने गंभीर स्वरूप धारण केल्यास अशी परिस्थिती हाताळण्यासाठी एनडीआरएफ, बॉम्बे इंजिनिअरिंग ग्रुप, औंध ब्रिगेड यांच्याशी आयुक्त शेखर सिंह यांनी प्रत्यक्ष संपर्क साधला आहे. त्यामुळे या यंत्रणांना देखील सज्ज ठेवण्यात आले आहे. शहरात उद्भवणाऱ्या सर्व परिस्थितींची माहिती मुख्यमंत्री कार्यालय, उपमुख्यमंत्री कार्यालय, पुणे जिल्हा पालकमंत्री तसेच जिल्हाधिकारी कार्यालय यांना वेळोवेळी देण्यात येत असून आवश्यक उपाययोजना करण्यासाठी प्राप्त मार्गदर्शक सूचनांची अंमलबजावणी केली जात आहे.

महापालिकेत अतिवृष्टी नियंत्रण कक्ष सुरू

अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर महापालिका मुख्यालयात नियंत्रण कक्ष कार्यान्वित करण्यात आला असून याठिकाणी अतिरिक्त आयुक्त चंद्रकांत इंदलकर, उप आयुक्त विठ्ठल जोशी, नीलेश भदाणे, आपत्ती व्यवस्थापन अधिकारी ओमप्रकाश बहिवाल, विशेष अधिकारी किरण गायकवाड आदी अधिकाऱ्यांचे पथक शहरातील आपत्कालीन परिस्थितीचा आढावा घेत असून आवश्यक सूचना नियंत्रण कक्षामार्फत संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या जात आहेत

आपत्ती नियंत्रण कक्षावर तक्रारींचा पाऊस

भोसरी येथील पांजरपोळ समोरील पुणे-नाशिक महामार्गावर दोन्ही बाजूने पाणी भरून वाहात असून त्यामुळे वाहतूक खोळंबली होती. मदर तेरेसा होम परिसरात मेहता हॉस्पिटलजवळ पावसाचे पाणी साठले होते. भोसरीत लांडगेनगर येथे मोकळ्या जागेत इंद्रायणीनगरकडे जाणाऱ्या रस्त्याच्या कडेला पाणी साचले. चिखली घरकुल परिसरात पाणी साचल्याची तक्रार प्राप्त झाली. पाणी उपसा यंत्रणा वाहन घटनास्थळी पाठवण्यात आले असून पाण्याचा निचरा करण्याचे काम सुरू आहे. अभिनवनगर जुनी सांगवी येथील कन्नडवस्ती आंबेडकरनगर मधील झोपड्यांमध्ये नदीचे पाणी शिरले, सांगवी, मधुबन सोसायटी परिसरात पाणी शिरले आहे. काही भागात झोडपट्टीत पाणी शिरले.  पुनावळे रस्ता येथील भुयारी मार्ग, मोरवाडी लालटोपीनगर परिसर, औंध रावेत बीआरटी मार्ग आदी ठिकाणी पाणी साचल्याच्या घटना घडल्याची आहेत. या सर्व ठिकाणी महापालिकेचे पथक युद्धपातळीवर काम करत आहे. थेरगाव गॅस दाहिनी येथे पाण्याची पातळी वाढल्याने तेथील वीजपुरवठा बंद करण्यात आला आहे.

Join Civic Mirror Whatsapp Group for Latest Update

Share this story

Latest