संग्रहित छायाचित्र
विकास शिंदे
शहरातील सोनोग्राफी व गर्भपात केंद्रातून (Abortion Centers) मूल नकोय म्हणून बेकायदेशीर गर्भपात केले जाऊ नयेत. केंद्रातील रजिस्टर, सर्व कागदपत्रे फेरफार होऊ नयेत, याकरिता महापालिका वैद्यकीय विभागाकडून स्वतंत्र पथक तयार करून दर तीन महिन्यांतून अचानक केंद्राची तपासणी करण्यात येणार आहे, अशी माहिती आरोग्य वैद्यकीय अधिकारी डाॅ. लक्ष्मण गोफणे यांनी दिली.
पिंपरी-चिंचवड महापालिका (Pimpri-Chinchwad Municipal Corporation) हद्दीत वैद्यकीय विभागाच्या आकडेवारीनुसार सुमारे ५०० हून अधिक हॉस्पिटल नोंदणीकृत आहेत. यामध्ये महापालिकेकडे नोंदणीकृत २३६ सोनोग्राफी केंद्र व १४० गर्भपात केंद्र उपलब्ध आहेत. केंद्रांना गर्भधारणापूर्व व प्रसवपूर्व निदान तंत्र (लिंग निवडीस प्रतिबंध) आहे. तरीही बेकायदेशीरपणे गर्भपात व सोनोग्राफी करण्यात येत आहे, पण याबाबत समोर कोणी येऊन तक्रार करत नाही. त्यामुळे ह्या घटना उघड होत नाहीत.
राज्यात ० ते ६ वर्षे वयोगटातील नागरी नोंदणी जन्माच्या वेळी लिंग गुणोत्तर प्रमाणात एक हजार मुला मागे ९१८ मुलींचा जन्म झाला आहे. त्यामुळे मुलीची जन्मदर कमी झाल्याची गंभीर बाब निदर्शनास आली आहे.
या तपासणी मोहिमेत सोनोग्राफी केंद्राने कायद्याचा भंग केल्याचे निदर्शनास आल्यास पीसीपीएनडीटी कायद्यानुसार (PCPNDT Act) त्यांचे रजिस्ट्रेशन रद्द करण्यात यावे. तसेच, गर्भपात केंद्र तपासणीत त्रुटी आढळून आल्यास वैद्यकीय गर्भपात कायदा १९७१ नियम २००३ नुसार केंद्राची मान्यताही रद्द करण्यात येणार आहे. याबाबत महापालिकेच्या डाॅक्टराच्या स्वतंत्र पथक तयार करून त्यांच्याकडून सर्व सोनोग्राफी व गर्भपात केंद्राची तपासणी करण्यात येईल. त्या डाॅक्टराकडून अहवाल मागवून त्रुटी असणा-यांना नोटीस देखील बजावण्यात येणार आहे, असेही डॉ. गोफणे यांनी सांगितले.
कायद्यानुसार सेवांची तपासणी...
शहरातील दवाखाने व रुग्णालयांची बॉम्बे नर्सिंग होम रजिस्ट्रेशन कायदा, गर्भपात प्रतिबंधक कायदा १९७१, पीसीपीएनडीटी ॲक्ट, मानवी अवयव प्रत्यारोपण कायदा, अन्न व औषध प्रतिबंधक कायदा, महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण कायदा, अग्निशमन नियमन कायदा या कायद्यानुसार शहरातील सुमारे ५०० हून अधिक रुग्णालयांची रुग्णांस दिलेल्या गर्भपात सेवा, गर्भाचे लिंग निदान, अवयव दान, औषधांच्या परवानगी, बायोमेडिकल वेस्ट, अग्निशमन विभागाचा ना हरकत दाखला याबाबत तपासणी होणार आहे.
शहरातील विविध रुग्णालयात सोनोग्राफी व गर्भपात केंद्र कार्यरत आहेत. त्या केंद्रातून बेकायदेशीर गर्भपात होऊ नयेत म्हणून महापालिका वैद्यकीय तपासणी पथकाद्वारे दर तीन महिन्यांतून एकदा अचानक जाऊन तपासणी केली जाणार आहे. तसेच पीसीपीएनडीटी कायद्याबाबत नागरिकांमध्ये देखील जनजागृती करणार आहे. पीसीपीएनडीटी कायद्यांतर्गत कोणत्याही नोंदणीकृत केंद्रातील डॉक्टर किंवा अन्य कोणी प्रत्यक्ष, अप्रत्यक्ष कायद्याचे उल्लंघन केल्याचे निदर्शनास आल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल.
- डॉ. लक्ष्मण गोफणे, आरोग्य वैद्यकीय अधिकारी,महापालिका, पिंपरी-चिंचवड
© Civic Mirror - Lexicon Broadcasting.
Licensor - Bennet and Coleman Co Ltd.